Saturday, March 22, 2025
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीऋतुराजाच्या आवर्त लहरी

ऋतुराजाच्या आवर्त लहरी

ऋतुराज – ऋतुजा केळकर

जिंदगी एक सफर हैं सुहाना…
यहाँ कल क्या हो किसने जाना…”
हे गीत कानावर पडले आणि मन कुठेतरी आठवणींच्या मोहळात अडकून पडले. ‘बालपणीचा काळ सुखाचा’ आठवला! आठवले ते बेधडक, यशाच्या दिशेने झेप घेणारे, वेळ पडली तर झुंझारपणे लढणारे, संकटांची वादळे अंगावर घेणार तरुणपण! खरंच स्मृतींची पाखरे कधी कधी आयुष्याच्या सांजवेळी मनाच्या अंगणात उतरतात आणि कातरवेळी संकल्प – विकल्पांच्या खिंडीत अडवून धरतात.

अध्यात्मिकदृष्ट्या पहायचे झाले तर ‘स्मृती’ या शब्दामध्ये ‘आत्मस्मृती’ आणि ‘प्रभूस्मृती’ असे दोन प्रकार आहेत. यातही आत्मस्मृतीमध्ये नेहमीच चांगल्या आठवणी नेहमीच चिरतरुण असतात आणि वाईट आठवणींचे कसे आहे ना एखाद्या स्टेशनला तोडून टाकलेल्या डब्यासारख्या पण तरीही पुनःपुन्हा आयुष्याच्या प्रवासात परत परत आपल्या वाटेत आडव्या येणाऱ्या.

‘आत्मस्मृती’ म्हणजे आणखी एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे ‘मी’ कोण आहे?’ याची जाणीव असणे. त्यातही कुणाचे तरी पाय चाटण्यात, जी हुजुरी करण्यात आपल्यातला ‘मी’ संपवला तर ती ‘आत्मस्मृती’ काय कामाची?
म्हणूनच जीवनात ‘प्रभूस्मृती’ अंगी बाळगणे तितकेच महत्त्वाचे आहे. आपली कर्तव्य करत असताना आपले स्वत्त्व किंवा साध्या सोप्या शब्दात सांगायचे झाले तर आपली प्रतिष्ठा गमावणे हे आपल्या मनाला पटणारे नक्कीच नाही मग त्याचीच जाण ही प्रभूस्मृतीने राहाते.

परवा ज्ञानदानासारख्या पवित्र क्षेत्रात काम करणाऱ्या बदलापूरच्या संस्थेत घडलेला विनयभंगासारखा भयानक निंदनीय प्रसंग आणि त्या गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचा जो आकांत वरिष्ठांकडून चालला होता तो अर्थातच त्यांच्या आत्मस्मृतीला लागलेल्या गंजाचेचं ढळढळीत उदाहरण आहे.

म्हणूनच आपल्या प्रत्येक कृतीने, आपल्या प्रत्येक शब्दाने इतकेच नव्हे तर आपल्या प्रत्येक विचारांनी असे काहीतरी करावे ज्यामुळे आपली स्मृती ही दैवी बनेल किंबहुना ते करणे हेच मानवाचे आद्यकर्तव्य आहे असे मी म्हणेन.

आपला मृत्यू हा जीवनाच्या कुठल्या वळणावर कुठल्या रूपात दबा धरून बसलेला आहे ते आपल्यातील कुणालाही माहिती नसते. गळक्या भांड्यातून थेंब थेंब गळाला तसा आयुष्याचा एक एक क्षण वाहून जात असतो. मग आपल्या देहात घोंघावणाऱ्या वासनांचे वादळ हे सत्य – असत्य, भास – आभास आणि माया – चिद् विलास यात नेमके कुठे बंद करायचे जेणेकरून आपल्या स्मृती या मंत्रोच्चारासम पवित्र होतील हे ज्यांचे त्याने ठरवायचे असते.

भूमी कन्या सीतेला क्षणिक दिसलेल्या कांचन मृगाच्या स्मृतीमुळे रामायण घडले. तर ब्रह्मदेवालाही देव असूनही स्वतःच्या पुत्रीचा मोह पडून ‘मी कोण?’ या आत्मस्मृतीचा विसर पडला, तर तिथे आपल्यासारख्या कर्मकुसुमांच्या ओंजळींची जपणूक करणाऱ्या मर्त्य मानवांचे काय?

स्मृतींचे बकुळ गंध जर दे भावाचे लाघवी, घरंदाज चाळ आत्म्याच्या लहरबाज दीपशिखेला काबू करू शकत नसतील तर मग माणूस त्याच्या स्वार्थ परायण, वासनांकित आणि पशुतुल्य जीवनाच्या मूलभूत गरजा बदलूच शकणार नाही.

जनावरांना भूक नसेल तर ती कधीच अन्न खात नाहीत पण, माणसाचे तसे नसते त्याला त्याच्या भावनांवर नियंत्रण नसते. तसेच जसे वाळवी लागलेले लीलीचे झाड ॲसिडच्या पावसाने जळून जाते तसेच आत्म्याच्या वात्सल्याच्या गोधडीला आवर्ताची – विवर्ताची चक्रव्यूह तार तार करतात.

मग अशावेळी शकुन – अपशकुनांच्या घोळात अडकून राहण्यापेक्षा जीवनाच्या वेल्लार, रेशमी रंग शाळेत कर्तृत्वाच्या इंद्रधनुष्यी सैलसर मुठीतून सुटणाऱ्या ईश्वरचिंतनाच्या आणि अनन्य भक्तीच्या वैकुंठी वैभवातून जीवनाची रांगोळी नखशिखांत दीपवून टाकणाऱ्या मोरगौंदणी रंगांनी अशी रंगवा जेणेकरून,
‘कर्मसुमनांच्या क्रियाशक्तीची…
गोंदण शिल्पे…
ऋतुराजाच्या अंगणी …
आपल्या पाऊलखुणांच्या…
आवर्त लहरी उमटवत जातील…

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -