जीवन संगीत – सद्गुरू वामनराव पै
समाजात जो गैरसमज प्रचलित आहे तो म्हणजे जन्ममरणातून सुटका म्हणजे मोक्ष. मात्र तसे प्रत्यक्षात नाही. खरे तर परमेश्वराबद्दलचे अज्ञान, अंधश्रद्धा यातून माणूस जेव्हा मुक्त होईल तेव्हा मोक्षाच्या प्रवासाला सुरुवात होईल.
परमेश्वराबद्दलचे ज्ञान घेतलेच पाहिजे. हे ज्ञान दोन प्रकारचे आहे. एक अनुभवज्ञान व दुसरे शब्दज्ञान. उदाहरण द्यायचे झाले तर निखारा पडलेला असतो व त्याला हात लावू नको असे लहान मुलाला आई सांगते. काय सांगितले असे विचारल्यावर ते मूळ बोबड्या शब्दांत सांगते, निखाऱ्याला हात लावू नको, हात भाजेल. पण हात भाजेल म्हणजे काय हे त्याला माहीत नसते. निखाऱ्याला हात लावला की, हात भाजतो हे त्याला शब्दज्ञानाने माहीत असते. त्याने हात लावला व हात भाजला की आता तो निखाऱ्याला हात पुन्हा लावणार नाही. कारण का? आता त्याला भाजतो म्हणजे काय हे समजले. पूर्वी शब्दज्ञान होते आता आत्मज्ञान झाले. शब्दज्ञान व आत्मज्ञान यात फरक आहे. सद्गुरू तुम्हांला शब्दज्ञानाच्या द्वारे देवाजवळ नेतात, देवाच्या अगदी जवळ नेतात. मागे एकदा प्रवचनातून सांगितले होते की, ८५ टक्के काम हे सद्गुरू श्रवणाने होते बाकीचा जो १५ टक्के भाग आहे आत्मानुभवाचा, आत्मसाक्षात्काराचा तो साधनेने होतो. ८५ टक्के काम हे शुद्ध श्रवणाने होते. शुद्ध श्रवणाने काय होते ते तुकाराम महाराजांनी सांगितले आहे. “शुद्ध श्रवणाची चोखाळली वाट, गेले भेदाभेद निवारोनी”. सद्गुरूमुखातून जे होते ते शुद्ध श्रवण ! इथे पुन्हा सद्गुरू खरे व खोटे असतात.
ज्ञान देणारे सद्गुरू व कर्मकांडे सांगणारे सद्गुरू, यात जमीन अस्मानाइतके अंतर आहे. आज आपण कुणालाही गुरू म्हणतो. पूजाअर्चा करणाऱ्यांना गुरू म्हणतात. संन्यासांना गुरू म्हणतात. सद्गुरूंमध्ये सुद्धा कर्मकांडे सांगणारे जास्त व ज्ञान देणारे सद्गुरू कमीच आहेत. खरे सद्गुरू तुम्हांला जे ज्ञान देतात, शिकवण देतात, वळण देतात त्यातून ते तुम्हाला देवाच्या जवळ नेत असतात. १५ टक्के भाग आहे तो मात्र सद्गुरूंनी सांगितलेल्या साधनेने होतो.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,
मंत्रेची वैरी मरे,
तरी का बांधावी कटयारे
मनाचा मार न करता,
इंद्रिया दुःख न देता
मोक्ष असे आयता श्रवणाची माजी
श्रवणाने मोक्ष मिळतो असे ते म्हणतात. प्रत्यक्षात ८५ टक्के श्रवणाने व १५ टक्के साधनेने हे साध्य होते हे लक्षांत ठेवायचे.