परंतु या निर्णयानंतरही विद्यार्थी आंदोलनावर ठाम; नेमकी काय मागणी?
पुणे : आयबीपीएस (IBPS) आणि एमपीएससीची (MPSC) या दोन्ही राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा एकाच दिवशी म्हणजे २५ ऑगस्ट रोजी ठेवण्यात आल्या होत्या. या निर्णयाविरोधात पुण्यातील विद्यार्थ्यांनी मोठं आंदोलन केलं. त्यांच्या या आंदोलनाला आता यश आलं आहे. आज एमपीएससीच्या झालेल्या बैठकीत २५ ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असे ट्विट करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ही घोषणा केली आहे.
एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली असली तरी लोकसेवा आयोगाने या परिक्षेत कृषी विभागाच्या २५८ जागांचा देखील समावेश करावा. या २५८ जागांसाठी परिक्षा घेण्याचे नोटिफिकेशन काढावे अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा विद्यार्थ्यांचा निर्णय आहे. कृषी विभागाच्या जागांबाबत जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार आहे, असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.
कृषी सेवेतील २५८ पदांचा समावेश पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षेत करण्याची स्पर्धा परीक्षार्थ्यांची मागणी आहे. मात्र, या परीक्षेसंदर्भात २९ डिसेंबर, २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध होईपर्यंत एमपीएससीकडे महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा २०२४ साठीचे मागणीपत्र शासनाकडून प्राप्त न झाल्याने त्याचा समावेश जाहिरातीमध्ये करणे शक्य झालं नाही. आता या परीक्षेची तयारी झाली असून, कृषी सेवेच्या मागणीपत्रातील पदांच्या भरती प्रक्रियेबाबत पुढील नियोजन लवकरात लवकर करण्यात येईल, असे एमपीएससीने स्पष्ट केले.
कधीपासून सुरु होतं आंदोलन?
आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांना एका परीक्षेला मुकावे लागणार होते. त्यामुळे एक परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, या मागणीसाठी ‘एमपीएससी’ विद्यार्थ्यांनी मंगळवारी रात्रीपासून पुण्यातील शास्त्री रोडवर आंदोलन सुरू केले होते. अखेर आता एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.