पुण्याच्या ससून रुग्णालयाचे निघालेले धिंडवडे हे थेट प्रमुखापासून रक्त बदलणाऱ्या वॉर्ड बॉयपर्यंत पोहोचले होते. ललित पाटील पलायन हाही विषय जुना नाही. निवासी डॉक्टरांना मिळणारी अमानवी गलिच्छ निवासी व्यवस्था हा तर त्यांच्या दर दोन वर्षांनी होणाऱ्या संपाचा प्रमुख विषय. यातूनच गेलेले डॉक्टर रुग्णालयांचे प्रमुख बनतात तेव्हा ते का निब्बर बनतात हा खरा प्रश्न. तीच गोष्ट विनयभंग व बलात्काराची. स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांनी बलात्कार झालेल्या पीडितेची तपासणी करताना ‘टू फिंगर टेस्ट’, वापरू नये ती चुकीची आहे असा आदेश कोर्टातर्फे द्यावा लागतो आणि तो अजूनही पाळला जातो की, नाही याची चौकशी अधिकाऱ्यांना माहिती नसते, तर कायदे कसले कसले करणार? आणि ते कोण व कसे राबवणार हा प्रश्न उभा राहतो.
डॉ. श्रीराम गीत – वैद्यकीय अभ्यासक
पुण्यात दोनशे खाटांच्या एका मोठ्या रुग्णालयात ५० वर्षांपूर्वी घडलेल्या एका प्रसंगात टॉन्सिलचे ऑपरेशन करायला चालत नेलेला सहा वर्षांचा मुलगा भूल देताना ऑपरेशन टेबलवर गेला. ही बातमी विभागप्रमुख व रुग्णालय प्रमुखांपर्यंत पाच मिनिटांत पोहोचली. त्यांनी मुलाच्या आई-वडिलांना स्वतः हाताला धरून ऑफिसमध्ये घेऊन नेले. काय घडले, कसे घडले व असे कसे घडू शकते याची योग्य त्या सांत्वनपर शब्दाचा वापर करून माहिती दिली गेली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रसंगामध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये काम करणाऱ्या कोणत्याही ज्युनियर डॉक्टरचा चुकून सुद्धा संबंध त्या दोघांनी येऊ दिला नाही. एक फार मोठी दुर्घटना टाळण्यात या अशा वर्तणुकीचा फायदा झाला.
तीस वर्षांपूर्वी पुण्यातील डेक्कन जिमखान्यावर जवळच असलेल्या शंभर खाटांच्या रुग्णालयात ४० वर्षांचा अपघातात पायाचे हाड मोडलेला रुग्ण सायंकाळी दाखल झाला. हाडाच्या डॉक्टरांना कळविण्यात आले व त्यांनी औषधोपचार सुरू करायला सुचवले होते. ऑपरेशन करायला लागणार असल्यामुळे त्याच्या तपासण्यांची सुरुवातही झाली होती. अचानक रात्री साडेनऊ वाजता रुग्णाला मोठा हृदयविकाराचा झटका आला. ड्युटीवरच्या दोन डॉक्टरांनी प्रयत्न करूनही पाच मिनिटांत रुग्णाचे निधन झाले. या गोष्टीशी रुग्णालयाचा दुरांव्ययानेही संबंध नव्हता. आजार जुना असावा. पाचच मिनिटांत रुग्णालयाचे प्रमुख खोलीत हजर झाले. काय झाले आहे याची ते माहिती घेत असताना बाहेर नातेवाइकांची गर्दी जमलेली होती. त्यातील एक वयस्कर व तीन दांडग्या तरुणांनी रुग्णालय प्रमुखांना खोलीच्या दरवाजात जखडून सांगितले, ‘आता तुझ्याकडे बघतो व तुझ्या सकट हॉस्पिटल जाळून टाकतो’, असे धमकावले. केवळ नशीब जोरावर म्हणून रुग्णालयातील मदतनीसांचा जथ्था तिथे हजर असलेल्या नातेवाइकांपेक्षा जास्त संख्येने होता म्हणून बेदम मार न खाता सुटका झाली. तासाभरात सुमारे २०० जणांचा जमाव रुग्णालयात जमला. तोपर्यंत रुग्णालय प्रमुखांनी घडलेल्या वास्तवाचे सोप्या माहितीतून अंगावर आलेल्या चौघांचे मनाजोगते शंका निरसन केले होते. त्यांनाच बरोबर घेऊन २०० जणांच्या जमावाला ते सामोरे गेले आणि त्याच चौघांनी जमावाला शांत केले. रुग्णालय प्रमुखांना बोलण्याची गरजही पडली नाही. या दोन्ही प्रसंगात मी साक्षी होतो. दोन्ही प्रसंगानंतर आठवडाभर माझी झोपही उडली होती हेही नमूद करायला हवे. स्वाभाविकपणे डॉक्टरांवर, रुग्णालयांवर होणाऱ्या विविध हल्ल्यांच्या संदर्भात कोणतीही घटना पेपरमधे शांतपणे वाचताना, काही वेळा संबंधितांकडून माहिती घेताना याला कायद्याने काही आळा घालता येऊ शकेल का? हा विचार पुन्हा पुन्हा समोर येऊनही त्याचे उत्तर निदान माझ्या पुरते तरी नकारात्मक येते. कारण कोणत्याही प्रसंगात भावनिक कोंडी झालेल्या व्यक्तीची रागाची वाफ स्फोटातून बाहेर पडते. पण त्याच वाफेला रोजच्या वापरातील प्रेशर कुकरसारखे शिट्टी वाजणारे सेफ्टी व्हॉल्व असले तर स्फोट टाळण्याची किमान शक्यता निर्माण होते. टळतोच असे नाही.
कायदा आणि हिंसा
कोलकत्यातील कार रुग्णालयात जे घडले किंवा बदलापूर येथे शाळेतील घटनेतून जे सामोरे आले ते कठोर कायदा करून टळेल हा एक भ्रम ठरणार आहे. लाखो वर्षांत उत्क्रांती होत मानवाचा जन्म झाला तरीही ज्ञात इतिहासात हिंसा नसलेले एकही वर्ष गेलेले नाही. तसेच उत्क्रांतीतील जनुकातून लैंगिक प्रेरणा पिढ्यानपिढ्या चालू राहते हेही वैश्विक सत्य आहे. या दोन्हींवर संस्कारांमुळे थोडीशी मात करता येते एवढेच. पण आदिम प्रेरणा संस्कारांवर कधी मात करेल हे कोणीच सांगू शकत नाही. पोलीस हे संरक्षणाकरता असतात. पण मग लीसकस्टडीत झालेल्या बलात्कार किंवा कैद्यांचा मृत्यू होतो तेव्हा हे गृहीतक खोटे ठरते. अशिक्षित किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसे हैवान बनून बलात्कार करतात, असा समज जेव्हा विविध देशांच्या राष्ट्राध्यक्षांवर असे आरोप केले जातात तेव्हा पूर्णपणे खोटा ठरतो. लैंगिक चाळे, विनयभंग, बलात्कार हे सारे हिंसेचे एक विकृत स्वरूप आहे. पण हिंसा हीच जर आदिम प्रेरणा असेल तर ती कठोर कायद्याने थांबेल हा भाबडेपणाच झाला. पुराणातील कथांपासून आजपर्यंत विनयभंग किंवा बलात्काराच्या घटना घडतात.
युद्धकाळात त्याचे पीक फोफावते. बांगला देशातील आणि हमासने केलेल्या अत्याचारातील घटना सोडून द्या, पण मणिपूरमध्ये काय झाले ते तर विसरू नका. २०१७ सालापासून केरळमधील सिनेसृष्टीत चाललेल्या विनयभंग व लैंगिक अत्याचारांच्या गोष्टीचा अहवाल आजच छापून आला आहे. तरीसुद्धा फास्टट्रॅक खटला व फाशी या गोष्टींचा वारंवार उल्लेख संतप्त जमाव करत राहतो. विनयभंग किंवा बलात्कार याला आता जातीजातीचे परिमाण किंवा धर्माच्या छटा मिळत आहेत ही तर फारच वाईट गोष्ट. लहान मुलांना गुड टच किंवा बॅड टच शिकवा हे वाक्य तसेच. जेव्हा या मुलांना घरातीलच व्यक्तीकडून बॅड टच अनुभवायला मिळतो तेव्हाही खोटे ठरते. अशावेळी मुलांना खोटे ठरवण्याची सरसकट पद्धत घरोघरी रूढ असते. कायदे हे मोडण्यासाठी असतात अशी भारतीय परंपरा आपण स्वातंत्र्य लढ्यापासून शिकलो आहोत.
अपघाती मृत्यूनंतर…
रस्त्यात चारचाकी वा ट्रकचालकाची कोणतीही चूक नसताना झालेल्या अपघातात तो सरसकट मार खातो. ट्रकखाली आल्यामुळे मृत्यू झाल्यास स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ट्रक ड्रायव्हर सरसकट पळून जातात व नंतर पोलीस ठाण्यात हजर होतात. संतप्त झालेल्या व काबूबाहेर गेलेल्या जमावाने पोलीस चौकीवर हल्ला करून पोलिसांना जाळण्याचा प्रयत्न करणे हेही आपण दर आठवड्याला वृत्तपत्रातील फोटोत पाहतो. किमान शंभर पत्रकारांचा दरवर्षीचा मारहाणीत झालेला मृत्यू ही गेल्या दशकाने ठेवलेली नोंद आहे. गेल्या शतकांत वाचलेले एक विधान येथे नमूद करावेसे वाटते. “मोटर खाली एखादी व्यक्ती येऊन एक्सिडेंट झाल्यावर जर ड्रायव्हरचा पाय एक्सिलेटरवर जात असेल तर ती अमेरिका आहे आणि जर त्याने ब्रेक दाबला तर तो देश युरोपमध्ये असावा. “थोडक्यात ज्याला त्याला स्वतःचा जीव प्यारा असतो. थोडक्यात डॉक्टरांवरील हल्ले कठोर कायदा करून कधीच थांबणार नाहीत. पुण्याच्या ससून रुग्णालयाचे निघालेले धिंडवडे हे थेट प्रमुखापासून रक्त बदलणाऱ्या वॉर्ड बॉयपर्यंत पोहोचले होते. ललित पाटील पलायन हाही विषय जुना नाही. निवासी डॉक्टरांना मिळणारी अमानवी गलिच्छ निवासी व्यवस्था हा तर त्यांच्या दर दोन वर्षांनी होणाऱ्या संपाचा प्रमुख विषय.
यातूनच गेलेले डॉक्टर रुग्णालयांचे प्रमुख बनतात तेव्हा ते का निब्बर बनतात हा खरा प्रश्न. तीच गोष्ट विनयभंग व बलात्काराची. स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांनी बलात्कार झालेल्या पीडितेची तपासणी करताना ‘टू फिंगर टेस्ट’, वापरू नये ती चुकीची आहे असा आदेश कोर्टातर्फे द्यावा लागतो आणि तो अजूनही पाळला जातो की नाही याची चौकशी अधिकाऱ्यांना माहिती नसते, तर कायदे कसले कसले करणार? आणि ते कोण व कसे राबवणार हा प्रश्न उभा राहतो. शेवटास एका नॅशनल चॅनलवर २० ऑगस्टला बदलापूर घटनेवर चर्चा करणाऱ्या दोन सुशिक्षित पण ‘असंस्कृत’ महिलांतील झालेल्या भांडणाचा उल्लेख करतो. तीन वर्षे आठ महिने वयाच्या मुलीच्या आतड्यांपर्यंत जखमा झाल्या असे एक महिला दुसरीला खोट्या आक्रोशाने सांगत होती, तर दुसरी महिला तितक्याच आक्रोशाने तिच्यावर तुटून पडत होती. नाही नाही आतड्यापर्यंत आत काही गेले नाही. केवळ चार वर्षांच्या बालिकेच्या अंतर्भागाबद्दलचे हे आमच्या राजकीय स्त्री प्रवक्त्यांचे घोर अज्ञान. तर कायदे काय करणार? वाचकांनीच ठरवावे.