कोकणात कृषी उत्पन्न बाजार समितीचे मार्केट यार्ड उभारले गेले पाहिजे हा गेले काही वर्षे माजी केंद्रीय मंत्री कोकणचे खा. नारायण राणे यांचा प्रयत्न होता. कोकणातला शेतीमाल आता नांदगावच्या मार्केट यार्डात दाखल होणार. विकासावर केवळ बोलून, चर्चा करून विकास होत नाही. विकास हा कागदावरचा व प्रत्यक्ष साकारलेला, दिसणारा आणि सर्वसामान्यांना लाभ घेता येणारा तो विकास, तर नांदगावच्या मार्केट यार्डच्या निमित्ताने कोकणच्या विकासाला निश्चितच चालना मिळणार आहे.
माझे कोकण – संतोष वायंगणकर
कोणत्याही भागाचा विकास व्हायचा असेल, तर त्या भागाचे नेतृत्व करणाऱ्याकडे व्हीजन असावे लागते. स्वप्न पाहावी लागतात आणि त्या स्वप्नांची पूर्तता होण्यासाठी त्याचा पाठपुरावा करावा लागतो. पश्चिम महाराष्ट्रात विकासाची गती वाढली त्याचे कारण त्या भागातील जनतेनेही नेतृत्वावर विश्वास टाकला, नेहमी सहकार्याचीच भूमिका घेतली. केवळ त्यामुळेच पश्चिम महाराष्ट्रात सहकार रुजला आणि सहकार बहरला. त्यातून साखर उद्योग उभा राहिला. दुधाची क्रांती घडली. प्रत्येक कुटुंबात उदरनिर्वाहाचे साधन निर्माण झाले. हे होत असतानाच तेथे पिकणाऱ्या सर्व फळ आणि भाजीपाल्याला चांगला भाव मिळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांची स्थापना झाली. याच कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनाला चांगला दर मिळू लागला.
मार्केट यार्ड हे पश्चिम महाराष्ट्रात शेतीमाल उलाढालीचे एक फार मोठं माध्यम आहे. कोकणात सहकार आजही चाचपडतोय. सहकारात काम करणाऱ्यांवर लोकांनी विश्वास ठेवला पाहिजे आणि सहकारात काम करणाऱ्यांनी विश्वासार्हता निर्माण करावी लागेल. परस्परांमध्ये हे घडलं पाहिजे. कोकणातही आंबा, काजू, कोकम, जांभूळ, पालेभाज्या मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतात. आंबा इतक्या वर्षांनंतरही नवी मुंबईच्या मार्केटमध्ये रूमाला आडच दलाल त्याचा सौदा करतात. दलाल ठरवणार तोच दर. आंबा, काजू बागायतदाराला त्याची कोणतीही किंमत नाही अशी स्थिती. कोकणातील शेती, बागायतदार कधीच संघटित झाला की त्याने हा विचारही कधी केला नाही. सदासर्वकाळ राजकीय ‘गजाली’मध्ये रमणारा कोकणातील सर्वसामान्य शेतकऱ्यानेही कधीही आपल्याकडे उत्पादित होणाऱ्या कृषीमालासाठी मार्केट यार्डची आवश्यकता आहे हा विचारच कधी केला नाही; परंतु हा विचार मात्र माजी केंद्रीयमंत्री कोकणचे खा. नारायण राणे यांनी केला. कोकणात कृषी उत्पन्न बाजार समितीचे मार्केट यार्ड उभारले गेले पाहिजे हा गेले काही वर्षे त्यांचा प्रयत्न होता. सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुळशीदास रावराणे यांना कोणत्याही स्थितीत मार्केट यार्ड उभं झालं पाहिजे अशी चर्चा होत असताना या मार्केट यार्डला मुहूर्तस्वरूप आणण्यासाठी खास प्रयत्न केले ते आ. नितेश राणे यांनी. मार्केट यार्डसाठी आवश्यक असणारी जागा कशी उपलब्ध करायची अशा अनेक प्रश्नांची मालिका समोर असताना आ. नितेश राणे यांनी कणकवली तालुक्यातील नांदगाव रेल्वे स्टेशन परिसराची जागा निश्चित केली. नांदगाव रेल्वेस्टेशनला रो-रो रेल्वे सेवेचा थांबा आहे. नांदगाव हे त्या अर्थाने मध्यवर्ती आहे. महामार्गाच्या जवळच रेल्वेस्टेशन आहे. नांदगाव-कोल्हापूर रेल्वे वाहतूकही भविष्यात याच रेल्वेस्टेशनने होणारे आहे.
मार्केट यार्ड उभारणीसाठी आर्थिक सहाय्य करणारच; परंतु त्यासाठी जमीन उपलब्ध असणे आवश्यक आहे. यात खऱ्याअर्थाने महत्त्वाची भूमिका बजावण्यात आली ती सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने घेतली. जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, आ.नितेश राणे आणि बँकेच्या सर्व संचालकांनी कृषी उत्पन्न बाजार समिती उभारत असलेल्या मार्केट यार्ड उभारणीसाठी आवश्यक असणारी जमीन खरेदी करण्यासाठी आवश्यक अर्थसहाय्य केले. सिंधुदुर्ग बँकेने खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी उचललेले हे मोठे पाऊल आहे. विकासावर केवळ बोलून, चर्चा करून विकास होत नाही. विकास हा कागदावरचा व प्रत्यक्ष साकारलेला, दिसणारा आणि सर्वसामान्यांना लाभ घेता येणारा विकास, तर नांदगावच्या मार्केट यार्डच्या निमित्ताने कोकणच्या विकासाला निश्चितच चालना मिळणार आहे. या मार्केट यार्डमध्ये जी उभारणी होणार आहे त्यातून आंबा, काजू, भात, मासळी, सुपारी, केळी, कलिंगड, पालेभाज्या, अंडी, कोंबड्या, मेंढ्या, बकरे, बांबू, जळाऊ लाकूड, इमारती व खैराचे लाकूड, भुईमूग, नारळ, कडधान्य, चवळी, हरभरा, तेल आदी अनेक वस्तूंचे नियमन झालेले आहे. कोकणातील उत्पादित होणारा सर्व भागातील शेतीमाल मार्केट यार्डात यावा लागेल. आंबा पिकविण्यासाठी रायपनिंग चेंबर्स, पॅकहाऊस, लीलास्थळ, शितगृह, भात आणि काजू बीकरिता गोदामे असतील. वजन काटे, मासळी व इतर जलचर प्राण्यांसाठी बर्फ कारखाना याशिवाय जनावरांचा बाजारही याठिकाणी असणार आहे. शेतकऱ्यांसाठी निवासी व्यवस्था असणार आहे.
या मार्केट यार्डमध्ये काम करणाऱ्या हमालांसाठी सर्वसोयींनी नियुक्त राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर या मार्केट यार्डमध्ये करण्यात येणार आहे. आजवर आंबा दलाल आणि काजू बी खरेदी करणारे व्यापारी म्हणतील तो दर बागायतदार शेतकऱ्याला दिला जात होता. त्याचबरोबर कोकणात जो शेतकरी शेतीमाल उत्पादित करेल त्यासाठी त्याला विक्री व्यवस्थेच स्वत:च हक्कांच मार्केट सिंधुदुर्गात उपलब्ध होत आहे. आ. नितेश राणे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मार्केट यार्ड उभे राहिले पाहिजे, यासाठी सातत्याने पाठपुरावा करत राहिले. अब्दुल सत्तार यांच्याकडे मागणी करत पाठपुरावा करत राहिले. यामुळे सिंधुदुर्गासाठी मार्केट यार्डला मान्यता देण्यात आली. खरंतर कोणतीही गोष्ट वाटते तेवढी सोपी नसते. दोष दाखवणं फार सोप्प, त्यासाठी काहीच करावं लागत नाही. कोकणात तर त्यात आपला हातखंडाच असतो; परंतु विकासाचा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करण तसं कठीण असतं. कारण प्रोत्साहन देणाऱ्यांपेक्षा सेंटिमीटरने माफ काढणाऱ्यांच्या हो-ला-हो म्हणणारे अधिक; परंतु सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीचे उभं राहणारे मार्केट यार्ड झालं पाहिजे. यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुळशीदास रावराणे हे देखील यासाठी आ. नितेश राणे यांच्यासोबत सतत भेटून प्रयत्न करीत राहिले.
नांदगाव रेल्वेस्टेशन नजीक हे मार्केट यार्ड उभारल्याने सर्व बागायतदार, शेतकऱ्यांसाठी मध्यवर्ती ठिकाण असणार आहे. कोकणातील बागायतदार, शेतकऱ्यांनी या निर्माण होणाऱ्या मार्केट यार्डच्या माध्यमातून आर्थिक समृद्धी आणली पाहिजे. पश्चिम महाराष्ट्र आणि उर्वरित महाराष्ट्रात त्या-त्या जिल्ह्यांच्या असणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या मार्केट यार्डातून शेतमालाच्या विक्री व्यवस्थेमुळेच समृद्धी शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचू शकली. कोकणात सहकार उभा राहात नाही. सहकार्य केलं जात नाही. असं जे काही म्हटलं जातं हे पुसून टाकण्याची मोठी संधी कोकणातील शेतकऱ्यांना या सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डातून निर्माण झाली आहे. परस्परांतील विश्वास आणि सहकार्य यातूनच विकासाची गंगा शेतकऱ्याच्या दारापाशी जाईल. सिंधुदुर्गात आर्थिक समृद्धीचा नवा मार्ग नांदगाव येथील निर्माण होणाऱ्या मार्केट यार्डातूनच गावो-गावी पोहोचू शकेल. फक्त नकारात्मकता फेकून दिली पाहिजे. सकारात्मक विचारानेच हा नवा विकासाचा मार्ग नवी दृष्टी देवो हीच अपेक्षा.