Friday, October 17, 2025
Happy Diwali

Saurabh Katiyar : लाडकी बहीण योजनेंतर्गत मिळणारा निधी बँकांनी कपात करु नये!

Saurabh Katiyar : लाडकी बहीण योजनेंतर्गत मिळणारा निधी बँकांनी कपात करु नये!

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची घोषणा

अमरावती : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ (Mazi Ladki Bahin Yojana) ही महाराष्ट्र शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी योजना असून या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रतिमाह दीड हजार रुपये देण्यात येतात. जिल्ह्यातील अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झालेले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या खात्यात जो निधी जमा झालेला आहे तो निधी कोणत्याही बँकेने कपात करु नये, अशी सूचना जिल्हाधिकारी सौरभ कटियार (Saurabh Katiyar) यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सध्या राज्यात लोकप्रिय योजना म्हणून परिचित असून या योजनेंतर्गत लाडक्या बहिणीच्या खात्यात राज्यस्तरावरुन प्रतिमाह दीड हजार रुपये याप्रमाणे तीन हजार रुपये जमा झालेले आहेत. त्याचबरोबर यापुढेही या योजनेंतर्गत महिलांच्या खात्यात प्रतिमाह दीड हजार रुपये रक्कम जमा होईल. परंतु असे निदर्शनास आले आहे की, काही बँका महिलांकडे असलेल्या इतर कर्जांची हप्ते या रकमेतून कपात करीत आहेत. अशा तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त होत आहेत. त्यामुळे कोणत्याही बँकेने लाडकी बहिण योजनेंतर्गत मिळणाऱ्या निधीतून इतर रकमा कपात करुन नये, अशा प्रकारची कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित बँकेविरुध्द कार्यवाही करण्यात येईल याची सर्व बँकांनी नोंद घ्यावी.

त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांना अद्यापही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत निधी मिळाला नाही त्यांनी आपल्या खाते आधार लिंक करुन घ्यावेत. त्यामुळे लवकरात लवकर त्यांच्या खात्यात निधी जमा होईल. तसेच ज्या पात्र लाभार्थ्यांनी अद्यापही नोंदणी केली नाही त्या लाभार्थ्यांनीही लवकरात लवकर अंगणवाडी सेविकांशी संपर्क करुन आपली नोंदणी करावी. जेणेकरून पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल, असे आवाहन कटियार यांनी केले आहे.

Comments
Add Comment