Friday, March 28, 2025
Homeब्रेकिंग न्यूजRatnagiri airport : रत्नागिरी विमानतळामुळे कोकणाच्या पर्यटनाला चालना मिळेल

Ratnagiri airport : रत्नागिरी विमानतळामुळे कोकणाच्या पर्यटनाला चालना मिळेल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास

रत्नागिरी : रत्नागिरीच्या विमानतळामुळे (Ratnagiri airport) कोकणाच्या पर्यटनाला (tourism in konkan) चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला.

रत्नागिरी विमानतळाच्या (Ratnagiri airport) नवीन प्रवासी टर्मिनल इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. त्यावेळी ते बोलत होते. या इमारतीचे भूमिपूजन म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याच्या पर्यटनाचे नवे दार खुले करण्याचा श्रीगणेशा आहे. रत्नागिरी जिल्हा पर्यटनासाठीचे केंद्र (Tourist destination) झाले पाहिजे. त्यासाठी हा विमानतळ महत्त्वाचा ठरेल, असेही मुख्यमंत्री म्हणीले.

मुख्यमंत्री म्हणाले, ‘रत्नागिरीमध्ये मोठी क्षमता असून, तिचा वापर झाला पाहिजे. जगातल्या नामांकित पर्यटनस्थळांशी स्पर्धा करतील अशी इथली पर्यटनस्थळे आहेत. देशाच्या प्रगतीसाठी, तसेच महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट गाठायचे असेल, तर उद्योग आणि पर्यटन या बाबी महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी रस्ते चांगले असण्यासोबतच परदेशी प्रवासी येण्यासाठी हवाई मार्गही महत्त्वाचा आहे. प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड झाले पाहिजे, अशी माझी संकल्पना आहे. कारण अत्यवस्थ रुग्णांना झटपट मोठ्या शहरात उपचारांसाठी नेण्यासाठी, तसेच अन्यही अनेक ठिकाणी त्याचा उपयोग होईल. वैष्णोदेवीसारख्या ठिकाणी पर्यटकांसाठी हेलिकॉप्टर सेवा आहे. तसे पर्यटनाचे सर्किट तयार केले पाहिजे. या सगळ्यामुळे स्थानिक सुशिक्षित तरुणांना आपल्या आई-वडिलांसह इथेच राहून रोजगार मिळेल.

राज्यातील सर्व विमानतळांमध्ये हवाईपट्टी परिपूर्ण असली पाहिजे, नाइट लँडिंग सुविधा सगळीकडे असली पाहिजे, यावर भर द्यावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी या वेळी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेडच्या उपाध्यक्षा स्वाती पांडे यांना केल्या. त्यात काही अडचणी येत असतील, तर त्या दूर करण्यासाठी सरकार प्रयत्न करील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

महाराष्ट्र हे आता उद्योगासाठी मैत्रिपूर्ण वातावरण असलेले राज्य झाले आहे. दावोसच्या जागतिक आर्थिक फोरममध्ये पाच लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले आणि त्यातील ७० ते ८० टक्के करार अंमलबजावणीच्या टप्प्यापर्यंत आले आहेत. अंबानींनी संरक्षण क्षेत्रातल्या सुट्या भागांच्या निर्मितीसाठी कोकणात १० हजार कोटी रुपयांचा उद्योग उभारण्यासाठी रस दर्शवला आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगारांना १० हजार रुपयांपर्यंत विद्यावेतन देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. त्यातून कुशल मनुष्यबळ तयार करण्याचा हेतू आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्यानुसार, बांबू लागवड आणि त्याच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठीही सरकार शेतकऱ्यांना मदत देत असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, कोकणपट्टीतल्या या महत्त्वाच्या, छोट्या विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी दोन महिन्यांपूर्वीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी टर्मिनल इमारतीकरिता १०० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. येत्या दीड वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच उपस्थितीत या विमानतळावरच्या पहिल्या विमान उड्डाणाचा प्रारंभ होईल, असा विश्वास मला वाटतो. रत्नागिरीच्या पर्यटनात आणि सौंदर्यामध्ये भर घालण्याच्या दृष्टीने आजचा कार्यक्रम महत्त्वाचा असून, मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार बांबूवर प्रक्रिया केलेले फर्निचर या इमारतीमध्ये असेल, असेही सामंत यांनी सांगितले.

यावेळी आमदार शेखर निकम, रवींद्र फाटक, सिंधुरत्न समृद्ध समितीचे विशेष निमंत्रित किरण सामंत, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेडच्या उपाध्यक्षा स्वाती पांडे, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार आदी मान्यवर उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -