Friday, March 28, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यसमस्या सोडवता येतात; संयम ठेवा! (भाग पहिला)

समस्या सोडवता येतात; संयम ठेवा! (भाग पहिला)

अनेकदा आपण म्हणतो की, आयुष्यातील कोणताही प्रश्न, कोणतीही समस्या अशी नाही ज्यावर उत्तर नाही. प्रयत्न करा, विचार करा, योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. संयम ठेवा, धीर धरा, मार्ग निघतोच. कोणतीही समस्या मग ती घरगुती असो, कौटुंबिक असो, सामाजिक असो, राजकीय असो, धार्मिक असो वा अगदी गाव, शहर, जिल्हा, देश-पातळीवरील असो एकीच बळ आणि एकमेकांमधील संवाद, विश्वासच तिथे कामी येतो.

फॅमिली काऊन्सलिंग – मीनाक्षी जगदाळे

खूपदा आपण बघतो की, वर्षानुवर्षे काही समस्या तशाच पडून असतात. अगदी देशाच्या पातळीवर जरी विचार केला तरी काही प्रश्न असे असतात जे कितीही सरकार बदलले आले गेले तरी त्यांनी ते सोडवलेले नसतात. राज्याच्या पातळीवर, शहराच्या स्तरावर पण आपण बघतो की पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्षे एखादा प्रश्न, समस्या तशीच पडून आहे. कितीही नेते बदलले, कितीही अधिकारी आले-गेले, कितीही सुधारणा झाल्या, बदल झाले, निधी आले, खर्च झाले पण ठरावीक काही जागा, ठिकाण मात्र कधीच विकसित झाली नाहीत किंवा ठरावीक प्रश्न कधीच सुटले नाहीत. आपल्याला मग हे देखील ऐकू येते की, अरे अमुक एकाने मग तो राजकीय नेता असो, प्रशासकीय अधिकारी असो अथवा सर्वसामान्य नागरिक असो त्याने हे करायचा, बदलण्याचा प्रयत्न केला होता पण त्याची बदली झाली, त्याला बडतर्फ करण्यात आलं, त्याच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आला, त्याने राजीनामा दिला, तो सेवानिवृत्त झाला म्हणजेच जो तिथे बदल घडवायला गेला तो तिथून पायउतार झाला, त्याला जाणीवपूर्वक लांब करण्यात आले. अशाच प्रकारे आपल्याकडे समुपदेशनाला आलेल्या अनेक प्रकरणातून हेच लक्षात येते की, घरोघरी मातीच्या चुली. या उक्तीनुसार, प्रत्येकाला काहीना काही समस्या असतेच. कधी कधी लोक पटकन स्वतःची चूक स्वतः स्वीकारून, मान्य करून स्वतःमध्ये बदल घडवून आणतात आणि चांगलं आयुष्य सुरू करतात, तर कधी कधी कोणाला थोडं फार घरच्या लोकांनी रागावणं, फटकारणं, धाक दाखवणं, वडीलधाऱ्यांनी जरा दमात घेणं असं केलं की ते मार्ग बदलतात आणि योग्य दिशेने वाटचाल करतात. कधी कोणाला थोडंफार कायदेशीर मार्गाने नेल्यावरच सरळ रस्ता समजतो, तर कधी कोणाला पोलिसी खाक्या जागेवर आणतो. शेवटी एखाद्याच आयुष्य बदलायचं म्हणजे साम-दाम-दंड-भेद जे काय वापरता येईल ते सर्वच आपल्याला वापरावं लागतं.

आपलं वय कितीही असो, आपल्याला चुकलो तिथे बोलणार, सांगणार, समजावणार कोणी तरी असतंच आणि त्याचं आपण ऐकणं आपलं कर्तव्य असतं. कारण त्यातच आपलं भलं असतं. आपण आपलं सुख पाहत असतो पण सांगणारा आपलं हित पाहत असतो आणि हे ज्याला कळतं तो कधीच वाट चुकत नाही. घरच्या माणसांकडून जेव्हा ऐकलं जात नाही, त्यांच्या सांगण्यापलीकडे गोष्टी गेलेल्या असतात, बिघडलेल्या असतात त्यावेळी समुपदेशनाची मदत घेऊन त्या सोडवल्या जातात आणि समुपदेशक प्रकरणाचा सर्वांगीण अभ्यास करून कोणता मार्ग यासाठी उपयुक्त ठरेल हा निर्णय संबंधित व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबातील व्यक्ती, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, ओळखीचे, सहकारी यांच्याशी बोलून घेत असतो. जास्तीत जास्त यश मिळेल यासाठी घरातले, जवळचे, नात्यातले सगळेच मिळून प्रयत्न करतात. कारण त्यांना त्यांचा माणूस, त्यांचं आयुष्य, त्याचं भविष्य, त्याचं आरोग्य, त्यांची सामाजिक प्रतिष्ठा, त्याचं नाव, त्यांचा प्रपंच सगळंच जपणं खूप खूप महत्त्वाचं वाटतं असतं. शेवटी घरातील एक माणूस जरी भरकटला, दिशाहीन झाला तर सगळ्या कुटुंबाची दुर्दशा होणार, सगळ्यांना त्याचे परिणाम भोगावे लागणार हे निश्चित असतं. त्यामुळे प्रत्येकजण हा विषय सोडवूनच द्या, आम्हाला यातून बाहेर काढा यासाठी आग्रही असतो.

अनेक कुटुंबातील लोक स्वतःचे सर्व प्रयत्न पणाला लावताना दिसतात. जे जे शक्य आहे, जे जे करता येईल, ज्याला कोणाला भेटता येईल तिथे सगळीकडे ते फिरून आलेले असतात. कारण त्यांना तो प्रश्न सोडवायचा असतो. काही अपवादात्मक ठिकाणी मात्र हे जाणवत की, अनेक घरात वर्षानुवर्षे कितीही गंभीर समस्या असली, त्याचे कितीही गंभीर परिणाम होत असतील किंवा भविष्यात होण्याची शक्यता असेल तरी कोणालाच ते प्रश्न सोडवण्यात काहीही रस नसतो. कोणीही मुळात ती समस्या आहे, ते चुकीचं आहे, अयोग्य आहे, त्रासदायक आहे हेच मान्य केलेलं नसतं आणि तसंच त्या परिस्थितीसोबतच दिवसेंदिवस वर्षानुवर्षे लोक आयुष्य काढत असतात. घरातील ज्याने कोणी हे न् पटल्यामुळे आवाज उठवलेला असतो, विरोधात गेलेला असतो अथवा परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केलेला असतो त्याला सगळ्यांनी जाणीवपूर्वक लांब केलेलं असतं, बदनाम केलेलं असतं अथवा तो काहीच करू शकणार नाही इतपत त्याच्या विरोधात सगळ्यांनी एकी केलेली असते. असे का होते? चुकीच्या वातावरणात, चुकीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा, चुकीच्या व्यक्तीसोबत पण लोकं कसे राहू शकतात किंवा का राहतात? यामध्ये प्रेम माया जवळीकता नातं त्याग तडजोड हीच भावना दरवेळी असते का? आपला माणूस आहे, नातं आहे भावना गुंतल्या आहेत तोडता येत नाही म्हणून त्याच चुकत असलं तरी मन जपत राहायचं, त्याच नुकसान होत आहे तरी होवू द्यायचे, त्याच आयुष्य भविष्य बरबाद होत आहे तरीही गप्प बसायचं आणि जो बदलण्याचा प्रयत्न करतोय त्याला बडतर्फ करायचं हे प्रेम असते का? तर अजिबात नाही. अनेकदा लक्षात येते इथे दडलेला असतो फायदा स्वार्थी पणा स्वतःचा लाभ. त्यामुळे तेरी भी चूप मेरी भी चूप.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -