Wednesday, March 19, 2025
Homeताज्या घडामोडीम्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीसाठी आता ५० टक्के प्रतीक्षा यादी

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीसाठी आता ५० टक्के प्रतीक्षा यादी

यंदा १० घरामागे प्रतीक्षा यादीत पाच विजेते जाहीर करणार

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सप्टेंबर २०२४ मध्ये काढण्यात येणाऱ्या सोडतीसाठी अखेर प्रतीक्षा यादीत वाढ करण्यात आली आहे. प्रतीक्षा यादी ५० टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे यंदा १० घरामागे प्रतीक्षा यादीत पाच विजेते जाहीर करण्यात येणार आहेत. मागील वर्षी १० घरामागे एक अशी प्रतीक्षा यादी होती.

म्हाडाच्या सोडत प्रक्रियेत बदल करून आता सोडतीआधीच पात्रता निश्चिती करण्यात येत आहे. त्यामुळे सोडतीनंतर घराचे वितरण करताना मोठ्या संख्येने विजेते अपात्र ठरण्याचा मुद्दा उरत नसल्याचे स्पष्ट करीत प्रतीक्षा यादी रद्द करण्याचा विचार पुढे आला होता. त्यातच प्रतीक्षा यादीवरील घरांच्या वितरणातच सर्वाधिक भ्रष्टाचार होतो असा आरोप करीत प्रतीक्षा यादी रद्द करण्याची मागणी होत होती. मात्र सोडतीआधी पात्र ठरलेले विजेते कोणत्याही कारणाने घरे नाकारू शकतात. त्यामुळे त्या घरांच्या जागी इतरांना संधी मिळावी म्हणून प्रतीक्षा यादी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र प्रतीक्षा यादी कमी करण्याचाही निर्णय घेण्यात आला. त्यानुसार २०२३ च्या सोडतीत केवळ १० टक्के प्रतीक्षा यादी ठेवण्यात आली होती. म्हणजेच १० घरामागे प्रतीक्षा यादीवरील एक विजेता असे त्याचे स्वरुप होते.

मागील सोडतीत प्रतीक्षा यादी कमी असल्याने सामाजिक आरक्षणातील आणि इतर राखीव प्रवर्गातील काही घरे विकली गेली नाहीत. या घरांसाठी मोठ्या संख्येने अर्जदार होते. मात्र प्रतीक्षा यादी कमी असल्याने त्यांनाही घरे मिळू शकली नाहीत. घरे विकली न गेल्याने म्हाडालाही त्याचा फटका बसला. या पार्श्वभूमीवर १३ सप्टेंबर २०२४ च्या सोडतीसाठी प्रतीक्षा यादी १० टक्क्यांवरून ५० टक्के करण्यात आल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे यंदा १० घरामागे प्रतीक्षा यादीत ५ विजेते जाहीर केले जाणार आहेत. गेल्या वर्षी १० घरामागे प्रतीक्षा यादीवरील एक विजेता जाहीर करण्यात आला होता. प्रतीक्षा यादीतील विजेत्यांची संख्या वाढविल्यामुळे घरे विक्रीविना रिक्त रहाण्याचे प्रमाण कमी असेल, असा दावा मंडळाकडून करण्यात आला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -