नवी दिल्ली : भारतात गेल्या वर्षभरात ७.३ कोटी नव्या इंटरनेट ग्राहकांची भर पडली आहे. देशात मार्च २०२३ मध्ये ८८.१ कोटी इंटरनेट ग्राहक होते. तर मार्च २०२४ मध्ये ही संख्या ९५.४ कोटी झाली. गेल्या एका वर्षात तब्बल ८.३० टक्के इंटरनेट ग्राहक वाढले आहे. भारतीय दूरसंचार नियमक प्राधिकरणाच्या (ट्राय ) वार्षिक अहवालात ही माहिती पुढे आली आहे.
या अहवालात विविध सेवांमधील लक्षणीय वाढीचा कल आणि प्रमुख मापदंड अधोरेखित करण्यात आले आहेत. भारतात दूरध्वनी जोडण्यांचे एकूण प्रमाण मार्च २०२३ च्या अखेरीस ८४.५१ टक्के होते ते मार्च २०२४ अखेरपर्यंत १.३९ टक्क्यांच्या वार्षिक दराने ८५.६९ टक्क्यांपर्यंत वाढल्याचे या अहवालात दिसून आले आहे. यासोबतच ब्रॉडबँड सेवांनी त्यांचा चढता कल कायम राखला आहे, ब्रॉडबँड ग्राहकांची संख्या मार्च २०२३ मधील ८४.६ कोटींवरून मार्च २०२४ मध्ये ९२.४ कोटीपर्यंत वाढली असून हा मजबूत वाढीचा दर ९.१५ टक्के आहे. देशातील दूरध्वनी ग्राहकांची संख्या मार्च २०२३ अखेर ११७.२ कोटी होती ती मार्च २०२४ अखेरीस ११९.९ कोटीपर्यंत वाढली, हा वार्षिक वाढीचा दर २.३० टक्के इतका आहे. दरमहा प्रति ग्राहक सरासरी मिनिटे वापर हा २०२२- २३ या वर्षातील ९१९ वरून २०२३- २४ मध्ये ९६३ पर्यंत वाढला आणि हा वाढीचा दर ४.७३ टक्के आहे. यासोबतच समायोजित सकल महसूल देखील २०२२-२३ मधील २,४९,९०८ कोटी रुपयांवरून २०२३- २४ मध्ये २,७०,५०४ कोटी रुपयांपर्यंत वाढला असून हा वाढीचा दर ८.२४ टक्के आहे.