मुंबई : काही दिवसांपूर्वीच म्हाडाकडून (Mhada Lottery) मुंबईतील अँटॉप हिल, गोरेगाव, विक्रोळी कन्नमवार नगर या आणि इतर काही भागांमधील सदनिकांमध्ये असणाऱ्या घरांसाठीची योजना जाहीर केली. गणेशोत्सवादरम्यान म्हाडाच्या या सोडतीची घोषणा होणार असल्यामुळे नागरिकांमध्ये आनंद आणि अतिउत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच सिडकोकडूनही (CIDCO Lottery) एक आनंदाची बातमी समोर आली आहे. येत्या काही दिवसांत सिडको देखील मुंबईत घरांची सोडत काढणार आहे. त्यामुळे मुंबईत स्वत:च्या घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी असणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिडको महामंडळाच्या वतीने कृष्णजन्माष्टमीच्या मुहूर्तावर ९०२ घरांसाठी योजना जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या २७ ऑगस्ट रोजी ही योजना जाहीर होणार असून या योजनेअंतर्गत कळंबोली, खारघर आणि घणसोली नोडमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ३८ आणि सर्वसामान्य गटासाठी १७५ अशा एकूण २१३ सदनिका या योजनेचा भाग असतील. त्यासोबत खारघरमध्ये सिडकोच्याच स्वप्नपूर्ती आणि वास्तुविहार सेलिब्रेशन संकुलातील ६८९ घरांचाही या योजनेमध्ये समावेश असणार आहे.
दरम्यान, सिडकोची ही घरे रेल्वे स्थानके, मेट्रोसेवा अशा अनेक सुविधांनी परिपूर्ण असणाऱ्या परिसरांमध्ये असणार आहे. त्याचबरोबर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील या संकुलांपासून जवळ आहे. त्यामुळे लाभार्थी उमेदवारांची ही चांगली सोय होणार आहे.