मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांवर गंभीर आरोप
मुंबई : बदलापूरमधील आदर्श विद्यालय शाळेत शिशू वर्गातील दोन विद्यार्थिंनीवरील कर्मचाऱ्याच्या कथित अत्याचाराच्या घटनेनंतर, नागरिकांनी मंगळवारी जोरदार आंदोलन केले. यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की, “कालचे आंदोलन हे राजकारणाने प्रेरित होते, असे माझे म्हणणे आहे. या छोट्या बच्चूसोबत घडलेल्या घटनेचे राजकारण करता, खरे तर ज्यांनी केले त्यांना लाज वाटायला हवी, शरम वाटायला हवी. विरोधकांना माझे केवळ एवढेच सांगणे आहे की, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेमुळे जो काही पोटशूळ उठला आहे, तो कालच्या आंदोलनातून दिसला,” असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “दुर्दैवाने लाखो रेल्वे प्रवाशांना काल त्रास झाला. ८ ते ९ तास रेल्वे बंद होती. असे व्हायला नको होते. बदलापूरची घटना देखील दुर्दैवी आहे. पण जी रेल्वे अडवून ठेवली त्या रेल्वेत लाखो प्रवासी होते. त्यातही मुलं होती, त्यातही महिला होत्या, त्यातही ज्येष्ठ नागरिक होते. परंतु कालचे जे आंदोलन होते, ते राजकारणाने प्रेरित होते, असे माझे म्हणणे आहे. कारण एवढ्या लवकर… जेव्हा आंदोलन होते, त्यात स्थानिक लोक असतात. येथे स्थानिक लोक हाताच्या बोटावर मोजण्याएवढे होते आणि इतर ठिकाणावरून गाड्या भरून भरून त्या ठिकाणी आंदोलक आले होते. मंत्री महोदयांनी त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. तरीही ते हटायला तयार नव्हते. याचा अर्थ त्यांना सरकारची बदनामी करायची होती.”
“खरे तर ८ ते ९ तास रेल्वे रोखणे हे देशाचे नुकसान आहे. रेल्वेच्या संपत्तीचे नुकसान आहे. त्यामुळे एका छोट्या बच्चूचे राजकारण करून… राजकारण करायला तर खूप जागा आहेत. खूप मुद्दे आहेत. तेथे राजकारण करायला हवे,” असेही शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “मी हेही सांगतो की गाड्या भरून-भरून येऊन तेथे आंदोलन करते हे सर्व सीसीटीव्ही फुटेजमध्ये आहे. तुमच्या मीडियामध्ये आहे. जे आले होते, ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे बोर्ड घेऊन आले होते. अशी आंदोलन असतात का की, ताबडतोब बोर्ड छापून आणतात. म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण, ‘लाडक्या बहिणीचे पैसे नको, मुलगी सुरक्षित पाहिजे’, ‘लाडकी बहीण नको, सुरक्षित बहीण पाहिजे’. या राज्यातील बहिणींना सुरक्षा देण्याची जबाबदारी आमची आहे. सरकारची आहे आणि यात, जेजे काही करता येईल कठोर, ते सरकार करेल. कुणालाही सोडणार नाही, कुणालाही पाठीशी घालणार नाही. यात कुणीही आलं तरीसुद्धा यात जे जे दोषी आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. विरोधकांना माझे एवढेच सांगणे आहे की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ही जी काही त्यांच्या जिव्हारी लागली आहे, जी पोटदुखी वाढली आहे. जो काही पोटशूळ उठला आहे, तो कालच्या आंदोलनातून दिसला,” असा टोलाही यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना लगावला.