आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात
मुंबई : सध्या देशभरातून बदलापूर (Badlapur Crime) अत्याचार प्रकरणाबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. बदलापूरची ही घटना ताजी असताना आता मुंबईतही (Mumbai) अशीच एक घटना आजीच्या प्रसंगावधानामुळे थोडक्यात टळली. मुंबईतील खारदांडा परिसरात एका नराधमाने दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी खार पोलिसांनी नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान पोलीस याबाबत अधिक तपास करत असून परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अमन सिंग हा दोन्ही अल्पवयीन मुलींच्या घराशेजारी राहत आहे. तर अल्पवयीन मुलींमधील एक मुलगी १२ तर दुसरी ६ वर्षांची आहे. या नराधमाने काल सहा वर्षीय मुलीला चिडवत व खेळायचे नाटक करत घरी घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी घरात असणाऱ्या मुलीच्या आजीने आरडा ओरड केल्यानंतर त्याला बाहेर काढले. परंतु यावेळी आरोपीने त्यांना धमकावले. तसेच मागील शनिवारी देखील बारा वर्षीय मुलीला खिडकीतून डोकावत इशारे केले होते. परंतु त्यावेळी आरोपीच्या वागण्याकडे दुर्लक्ष केले. पण सातत्याने त्याचे असे वागणे पाहून अल्पवयीन मुलींच्या आईवडिलांनी खार पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दिली.
दरम्यान, खार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि पॉस्को अंतर्गत आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तात्काळ अमन सिंग या आरोपीला अटक केली. याप्रकरणी खार पोलीस अधिक तपास करत आहेत.