कल्याण : बदलापूरमध्ये (Badlapur Crime) शाळेतील दोन चिमुरड्यांवर लैंगिक शोषण प्रकरणामुळे देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. अशातच याप्रकरणातील एक अपडेट समोर आले आहे. बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर घटनेच्या पार्श्वभूमीवर आज आरोपीला कल्याण कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी कोर्ट परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सरकारी वकील अश्विनी भामरे पाटील यांनी पीडितेची बाजू मांडली. विशेष महिला न्यायाधीश व्ही.ए. पत्रावळे यांच्या कोर्टात अक्षय शिंदे याला हजर केले.
बदलापूर येथील एका नामांकित शाळेमध्ये दोन चिमुकलींवर सफाई कर्मचारी असलेल्या अक्षय शिंदेने अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्याला मुलींच्या टॉयलेट सफाईचे काम देण्यात आले होते. यावेळी त्याच्याकडून चिमुकलींवर लैंगिक अत्याचार झाला आहे. या प्रकरणी दोन चिमुकल्या मुलींनी पालकांना याची माहिती दिली आणि त्याचं वाईट कृत्य समोर आले.
सदर प्रकरणी बदलापूरमध्ये मंगळवारी उद्रेक पाहायला मिळाला होता. या प्रकरणावरून लोकांमध्ये संतापाची लाट आहे. आरोपीने अश्या प्रकारचं अजून काही लैंगिक शोषण किंवा कृत्य केल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांनी पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी केली होती. तर मुलींना आरोपी काय बोलायचा, त्यांच्यावर कसा अत्याचार करायचा या संदर्भात चौकशीसाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती. पोलिसांच्या या मागणीनंतर कोर्टाने २६ तारखेपर्यंत अक्षय शिंदे याला पोलीस कोठडी सुनावली आहे
आरोपीची माहिती
आरोपी अक्षय शिंदे याचं वय २४ वर्षांचे असून त्याला सफाईसाठी नेमलेल्या कंपनीने कामावर ठेवलं होतं. आरोपी अक्षय शिंदे १ ऑगस्टला शाळेत कामावर लागला होता. अक्षय शिंदे हा सफाई कर्मचारी होता. अक्षयने १२ तारखेला एका मुलीचा विनयभंग केला त्यानंतर त्याने ४ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केले. पीडित मुलीने प्रायव्हेट पार्टमध्ये दुखत असल्याचे घरच्यांना सांगितलं, त्यानंतर पालक तिला डॉक्टरकडे घेऊन गेले, तेव्हा डॉक्टरांनी मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर इजा झाल्याचं सांगितले. असे प्रकरण उघडकीस आले.