कुर्स्क : युक्रेनच्या सैन्याने रशियाच्या कुर्स्क प्रांतातील आणखी एक महत्त्वाचा पूल उद्ध्वस्त केला आहे. हा हल्ला युक्रेनच्या हवाई दलाचे कमांडर मायकोला ओलेशचूक यांनी पुष्टी करत एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या पुलाच्या नष्टतेमुळे रशियाच्या पुरवठा साखळीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे, कारण हा पूल धोरणात्मक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा होता. रशियामध्ये युक्रेनच्या लष्कराने उद्ध्वस्त केलेला हा दुसरा पूल आहे. यापूर्वी दोन दिवसांपूर्वी, युक्रेनने कुर्स्कमधील ग्लुश्कोवो येथे सीम नदीवरील एक पूल उद्ध्वस्त केला होता, जो युक्रेनियन सीमेपासून फक्त १५ किलोमीटर अंतरावर होता.
या हल्ल्यानंतर, कुर्स्क प्रांतात तीन पुलांपैकी आता फक्त एकच पूल शिल्लक राहिला आहे, ज्यामुळे रशियाला या भागात पुरवठा आणि हालचालींमध्ये अडथळे येऊ शकतात. या कारवाईमुळे युक्रेनच्या लष्कराने रशियाला धोरणात्मक दृष्टिकोनातून मोठा फटका दिला आहे.युक्रेनने बेलारूसच्या सीमेवरही सैन्य तैनात करण्यात मोठी वाढ केली आहे. जुलै महिन्यात १,२०,००० सैनिक तैनात केल्यानंतर आता या संख्येत आणखी वाढ झाल्याचा दावा बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी केला आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी कुर्स्क प्रांताला बफर झोन बनवण्याचे उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले आहे, त्यामुळे या भागातील हल्ले अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
युक्रेनच्या सैन्याने कुर्स्कमधील सुदजा शहरातही मोठी कारवाई केली आहे, ज्यात त्यांनी रशियन गॅस पाईपलाईन स्टेशन असलेल्या या शहरावर नियंत्रण मिळवले आहे. सुदजा हे युक्रेन सीमेपासून फक्त १० किलोमीटर अंतरावर आहे. या भागात लष्करी कमांड केंद्र स्थापन करून युक्रेनने आपली पकड आणखी मजबूत केली आहे. युक्रेनने रशियामध्ये सुमारे ३५ किलोमीटर आत घुसून ८२ गावे ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे.