श्रावणाचा आनंद ठेवा म्हणजे मंगळागौर. दै. प्रहारनेही हा ठेवा जपत डोंबिवलीकरांसाठीही आज मंगळागौरीचं आयोजन केलं आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहितेने लग्नानंतर पहिली ५ वर्षे हा सण साजरा करायाचा असतो. यासाठी नवविवाहितांना बोलावून एकत्रित साजरी होणार आहे, एक आगळी-वेगळी मंगळागौर; त्यािनमित्ताने हा लेख…
वर्षा हांडे- यादव
हसरा नाचरा
जरासा लाजरा
सुंदर साजिरा
श्रावण आला
आषाढ संपून श्रावण मास सुरू होईपर्यंत पावसाचा जोर कमी व्हायला लागतो. निसर्ग हिरवेपणा घेऊन श्रावणाच्या स्वागतासाठी सज्ज होतो. सर्व महिन्यांचा राजा श्रावण, सर्व सणांचा राजा श्रावण आणि या श्रावणाचा आनंद ठेवा म्हणजे मंगळागौर. महाराष्ट्राची कला व संस्कृती जतन करण्याचा उत्तम- अप्रतिम प्रयत्न म्हणजे मंगळागौर. श्रावण महिन्यात अनेक विधी, पूजा आणि सण साजरे केले जातात. नव्या नवरीचा साजरा करण्यात येणारा असाच एक सण म्हणजे मंगळागौर होय.
मंगळागौर हे हिंदू धर्मातील एक व्रत आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित महिलेने लग्नानंतर पहिली पाच वर्षे करावयाचे असते. यासाठी अशाच इतर नवविवाहितांनाही बोलावून सकाळी एकत्रित पूजा करतात त्यानंतर रात्री जागरण करतात. मंगळागौरची पूजा करताना महिला उपवास करतात. महिला आपल्या पतीला सुखी व निरोगी आयुष्य मिळावं म्हणूनही हे व्रत करतात. सर्वप्रथम पार्वतीची धातूची मूर्ती पूजेसाठी मांडण्यात येते. त्याच्या शेजारी महादेवाची पिंडही पूजायला ठेवण्यात येते. पूजा झाल्यानंतर कथा सांगून पिठाच्या किंवा पुरणाच्या दिव्यांनी मंगळागौरची आरती करण्यात येते.पंचपक्वांनाचे जेवण व सवाषणींना वाण देण्याची प्रथा आहे. सर्व पूजा झाल्यानंतर मंगळागौरची आरती म्हणण्यात येते. जय देवी मंगळागौरी। ओवाळीत सोनीया ताटी।। रत्नाचे दिवे। माणिकांच्या वाती। हिरे या ज्योती।।धृ।। ही आरती पूर्ण म्हटली जाते. श्री शिव आणि पार्वती हे आदर्श पती – पत्नी म्हणून गृहस्थाश्रमाचे प्रतीक मानण्यात येते. या मागचा उद्देश्य असतो.
जागरणाच्या वेळी विविध खेळ खेळण्याचा प्रघात आहे. खेळामध्ये परंपरागत चालत आलेली गाणीही म्हणतात.मंगळागौरचे खेळ खूपच प्रसिद्ध आहेत. हल्ली तर खास मंगळागौरीच्या खेळाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. ‘लाट्या बाई लाट्या सारंगी लाट्या अठूड केलं गठूड केल’ आदी गाणी म्हणण्यात येतात. नऊवारी साडी, नाकात नथ, पांरपरिक दागिने घालून हे खेळ खेळण्यात येतात. मंगळागौरमध्ये फुगडी हा खेळ खूपच प्रसिद्ध आहेत. झिम्मा व इतर खेळ गाण्यासह मजेशीर असतात. सूप, लाटणं, कळशी इत्यादी साहित्यांचा वापर केला जातो. ११० खेळांचा यामध्ये समावेश आहे. साधारण नवऱ्याचे नांव घेऊन उखाणेही घेतले जातात. गौरी मंदी गवर बाई मंगळागौर असं गाणं सगळे गुणगुणत असतात. लग्न झाल्यापासून पाचव्या वर्षी श्रावणातील शेवटच्या मंगळवारी या व्रताचे उद्यापन करण्यात येते. अन्नपूर्णा देवतेच पूजनही केले जातात.
मंगळागौर खेळामध्ये आध्यात्म व त्याचबरोबर विज्ञानही आहे. स्त्रीयांच्या शरीराला जो व्यायाम आवश्यक आहे तो या खेळामुळे मिळतो. शरीराच्या प्रत्येक अवयवाला व्यायाम मिळतो. प्रत्येक खेळ हे वेगळ्या पद्धतीने खेळले जातात. झिम्मा, फुगडी आदी खेळांमधून सहकार्य, एकता, आपुलकी दिसून येते. विविध खेळ, खेळून महिलांमध्ये उत्साह वाढतो, मानसिकता बदलते. म्हणून मुलींचा व स्त्रीयांचा सर्वात आवडता खेळ म्हणजे मंगळागौर. मराठी चित्रपट व मालिकांमधेही मंगळागौर दाखविली जाते. सर्व महिला वर्ग मोठ्या आवडीने ते बघत असतात. विविध स्पर्धा व कार्यक्रमांमध्ये मंगळागौर खेळण्यासाठी महिला सहभाग घेत असतात.