भाईंदर : मीरा भाईंदर शहरातील ऐतिहासिक घोडबंदर किल्यावर सुरक्षा रक्षक नसल्यामुळे वाढलेल्या असामाजिक लोकांच्या वावरामुळे किल्ल्याचे पावित्र्य धोक्यात आले आहे. यासाठी आंदोलनाला बसलेल्या गडप्रेमींना पोलिसांनी नोटीस बजावल्याने अनेक सामाजिक संस्था, राजकीय नेते, पत्रकार यांनी गडप्रेमींना पाठिंबा दर्शवत आंदोलनाच्या ठिकाणी एकच गर्दी केली आहे.
मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात असलेला घोडबंदर किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद स्पर्शाने पावन झालेला किल्ला असल्याची नोंद इतिहासात आहे. पुरातत्व विभागाने सुरक्षा आणि संवर्धन करण्यासाठी हा किल्ला महापालिकेकडे सोपवला आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेला हा किल्ला महापालिकाकडे आल्यावर प्रशासनाने त्याची सुरक्षा देखभाल करण्यासाठी सुरक्षा रक्षक तैनात करणे तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आवश्यक होते. परंतु प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे किल्ल्यावर असामाजिक लोकांचा वावर वाढला आहे.
किल्ल्यावर मद्यपानाच्या बाटल्या, नशेच्या बाटल्यांचा खच पडू लागला आहे. त्यामुळे किल्ला जतन समितीच्या वतीने रोहित सुवर्णा आणि समिती सदस्यांनी महापालिका आयुक्त संजय काटकर यांची भेट घेऊन त्यांना किल्यावर सुरक्षा रक्षक नेमणे आणि सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबतचे निवेदन दिले होते. परंतु गड- प्रेमींची मागणी पुर्ण करण्यास आयुक्तांनी असमर्थता दर्शविली. त्यामुळे गडप्रेमींनी सोमवारपासून भाईंदर पश्चिम येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानात बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते.
मंगळवारी सकाळी भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६८ प्रमाणे गडप्रेमी आंदोलकांना नोटीस बजावली आहे. सदर बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि गडप्रेमींना पाठिंबा दर्शविण्यासाठी अनेक सामाजिक संस्था, राजकीय नेते, पत्रकार यांनी आंदोलनाच्या ठिकाणी एकच गर्दी केली आहे.