नवी दिल्ली: कोलकाताच्या आरजी कर मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये महिला ट्रेनी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार तसेच हत्या प्रकरणात गेल्या एक आठवड्यापासून निदर्शने सुरू आहे. यामुळे आरोग्य सेवांवर परिणाम झाला आहे. कोलकाता, दिल्ली, मुंबई, चंदीगढसहित सर्व प्रमुख शहरांतील सरकारी रुग्णांलयांमध्ये डॉक्टर्स आपली सुरक्षा आणि पिडितेला न्याय देण्याच्या मागणीवरून आंदोलने करत आहेत.
महिला डॉक्टरसोबत बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या विरोधात कोलकाता तसेच पश्चिम बंगालमधील अनेक भागांमध्ये शेकडो महिलांनी रविवारी रात्री रिक्लेम द नाईट अभियान राबवले. यावेळे पीडित मुलीला न्यायाची मागणी केली.
सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
सर्वोच्च न्यायालयात आज २० ऑगस्टला कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणी सुनावणी होत आहे. सीबीआय आरोपीच्या पॉलिग्राफ टेस्टची तयारी करत आहे. याच्या माध्यमातून हत्या आणि या दुष्कर्माचे गुपित समोर येईल. आरोपीच्या सासूने त्याला फाशीची शिक्षा दिली जावी अशी मागणी केली आहे.
केंद्र सरकारच्या रुग्णालयांमध्ये वाढणार २५ टक्के सुरक्षा
कोलकाता प्रकरणाविरोधात देशभरात ठिकाठिकाणी मोर्चे, निदर्शने, आंदोलने केली जात आहेत. यातच केंद्र सरकारने आपल्या अखत्यारित येणाऱ्या रुग्णालयांमध्ये २५ टक्के सुरक्षा वाढवण्यास मंजुरी दिली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सर्व केंद्रीय सरकारी रुग्णालयांमध्ये लागू केल्या जाणाऱ्या सुरक्षा उपायांची यादी जाहीर केली. यात एंट्री आणि एक्झिटवर कडक नजर तसेच रात्रीच्या वेळेस महिला हेल्थकेअर वर्कर्सना एस्कॉर्ट प्रदान करणे यांचा समावेश आहे.