सेवाव्रती – शिबानी जोशी
१९३५मध्ये, बी. एस. मुंजे यांनी भारतीय संरक्षण या उद्देशाने नाशिक येथे सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि १९३७ मध्ये ‘भोसला मिलिटरी स्कूल’ सुरू केले. ब्रिटिश राजवटीत सैनिकी शिक्षण देणारे संस्था उभं करण्याचं धारिष्ट त्यांनी केलं होतं. त्यांनी उभारलेल्या भोसला मिलिटरी स्कूलसह आज १६५ एकरवर पसरलेल्या राम भूमीमध्ये १८ शैक्षणिक संस्था शिक्षणदानाचं आणि सुदृढ नागरिक बनवण्याचं काम करत आहेत.
भोसला मिलिटरी स्कूलसह (मुले आणि मुलींची) स्टेट बोर्ड, सीबीएसई मराठी, इंग्रजी अशा छोट्या मोठ्या नऊ शाळा, दोन ज्युनिअर, सीनिअर कॉलेज, एक मॅनेजमेंट कॉलेज, नर्सिंग कॉलेज, करिअरविषयी मार्गदर्शन करणारी भोसला करिअर अॅकेडमी, भोसला अॅडव्हेंचर फाऊंडेशन, भोसला इन्स्टिट्युट ऑफ अॅडव्हेंचर अॅन्ड स्पोर्टस्, भोसला रिसर्च सेंटर, रामदंडी मिलिटरी ट्रेनिंग विभाग अशी एकूण अठरा युनिट कार्यरत आहेत. भोसला मिलिटरी स्कूल १९३७ साली सुरू झाले. त्यानंतर नाशिकमध्ये चांगल्या शाळेची गरज लक्षात घेऊन शाळा, कॉलेज, अकादमीनंतर फाउंडेशन तसेच व्यायामाची गरज लक्षात घेऊन स्पोर्ट्स अकादमी सुरू झाली. सुरुवातीला एसएससी बोर्डाची दहावीपर्यंतची शाळा सुरू झाली त्यानंतर कालानुरूप गरज लक्षात घेऊन सीबीएससी बोर्डाच्या मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्या. त्यानंतर जुनियर आणि सीनियर कॉलेजची स्थापना झाली. त्यामुळे एकदा केजीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर तो मुलगा पदवीपर्यंत सहशिक्षण करून सुशिक्षित नागरिक म्हणून बाहेर पडत असे. पदवीनंतर मॅनेजमेंटची पदव्युत्तर पदवी प्रशिक्षणही सुरू केलं. त्याशिवाय महिलांसाठी नर्सिंग कॉलेजही सुरू करण्यात आलं. इथलं शिशुविहार व बालक मंदिर, ५वी ते ७वी मराठी माध्यम शाळा संस्कृती आणि संस्कार जपणारी शाळा म्हणून परिचित आहे. शाळेत ३५० विद्यार्थी सेमी इंग्रजीतून शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचा शाळेचा नेहमीच मानस असतो. अभिव्यक्ती अंतर्गत कौशल्यपूर्ण शिक्षण देणारी तसेच पर्यावरणपूरक उपक्रमातून पर्यावरणाची बांधिलकी जपणारी शाळा अशीही वेगळी ओळख आहे. दृकश्राव्य माध्यमाद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण, संवाद कौशल्य, पाढे पाठांतर, गणितीय संकल्पना, वाचन प्रकल्प असे वेगवेगळ्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शिक्षण, उल्लेखनीय बाब म्हणजे कै. गो. ह. देशपांडे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत शाळेला सलग तिसऱ्यांदा ढाल मिळाली.
विद्या प्रबोधिनी प्रशाला मराठी माध्यम (इ.८वी ते दहावी) ही अशीच एक वेगळी शाळा आहे. इथे पंचकोश विकसनाद्वारे व्यक्तिमत्त्व विकास, मनोमय विकासासाठी पाठांतर, रामरक्षा, गीतेचा बारा, पंधरावा अध्याय, मधुराष्टक शिकवले जाते. सायकल सहल, किल्ले स्वच्छता, मुलींसाठी स्वसंरक्षण कार्यशाळा, करिअर व्याख्यानमाला, पिअर एज्युकेशन, आर्थिक साक्षरता, रामदंडी मिलिटरी प्रशिक्षण यांचा समावेश होतो, शालेय पुस्तके शिक्षणाबरोबर शिष्यवृत्ती, इतिहास, भूगोल प्रज्ञाशोध, कापरेकर गणित, होमी भाभा बाल वैज्ञानिक या परीक्षेच्या अानुषंगाने तयारी करून घेतली जाते. वर्षभर एक विषय देऊन त्यावर आधारित स्नेहसंमेलन, माझा देश माझे संविधान, जागर स्त्री शक्तीचा, संगीतातील रागावर आधारित कार्यक्रम होतात. विद्यार्थी दत्तक उपक्रम हा देखील असाच एक वेगळा उपक्रम आहे, मुख्याध्यापिका शुभांगी वांगीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा वाटचाल करत आहे. विद्या प्रबोधिनी प्रशाला इंग्रजी माध्यम शाळा, कोदंडधारी रामाच्या साक्षीने संस्कृती, परंपरा आणि विज्ञान यांच्या अनोख्या संगमाची गोष्ट मोठ्या दिमाखाने मिरवत ही शाळा गेली २९ वर्षे नाशिकच्या शिक्षण क्षेत्रामध्ये घट्ट पाय रोवून उभी आहे.
१९०४ विद्यार्थी संख्या असणारी ही शाळा कला, क्रीडा, रामदंडी प्रशिक्षण, साहसी पर्वतारोहण विद्यार्थिनींच्या मनात आणि मनगटात बळ भरण्यासाठी योजलेले स्वसंरक्षण शिबीर भरवते. विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक सामाजिक, नैतिक विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असते. अर्जुनाची एकाग्रता घेऊन आंतरराष्ट्रीय पातळी गाजवणारा नेमबाज साई पाटील यानी शाळेचं नाव देशपातळीवर नेले. धावपटू स्मितल मोरे आणि धावण्यामध्ये महाराष्ट्र राज्याला ३५०व्या क्रमांकावरून ५१व्या क्रमांकावर नेऊन ठेवणारा राजस देवरे, अन्याय आणि दुर्गुणाला ठोसा मारून शाळेचं मूल्याचं पारडं जड करणारा सिल्वर मेडलिस्ट किक बॉक्सिंग चॅम्पियन आदित्य मेहेर ही सर्व या शाळेची रत्न आहेत. अशा रत्नांना पैलू पाडण्याचं काम शाळेने नेहमी केलं आहे. मॅनेजमेंटसाठी धर्मवीर डॉ. मुंजे इन्स्टिट्युट उभी राहिली. नव्या शैक्षणिक धोरणानुसार एमबीए, एमसीए, पीएच.डीच्या जोडीला बीबीए, बीसीए आणि बीएमएस करण्याची संधी सुद्धा या महाविद्यालयात उपलब्ध आहे. शिक्षणाबरोबरच कॅम्पस इंटरव्यू होतात. त्यातूनच नावाजलेल्या कंपन्या आणि व्यवस्थापन संस्थेत चांगल्या पॅकेजवर नोकरीची संधी ही विद्यार्थ्यांना मिळते. या महाविद्यालयात सध्या प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. या इन्स्टिट्यूटमध्ये पीएच.डी संशोधन केंद्र सारखे विविध उपक्रम राबविले जातात. इन्स्टिट्युटची नॅशनल लेव्हल “ग्रीन कॉलेज क्लीन कॉलेज” स्पर्धेत निवड झाली आहे. भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये नेहमीच्या कला, वाणिज्य, विज्ञान शाखेबरोबरच संगणक, सैनिकी शिक्षण देणाऱ्या स्वतंत्र तुकड्या आहेत. आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राद्वारे अल्प मुदतीचे अभ्यासक्रमही महाविद्यालयात सुरु करण्यात आले आहेत. याशिवाय जर्नालिझम अॅन्ड मास कम्युनिकेशनसारख्या पदव्युत्तर पदवीमुळे विविध माध्यमांचे अद्यावत शिक्षण देण्याबरोबरच आपल्या आवडत्या माध्यमांमध्ये नोकरी उपलब्ध करून दिली जात आहे, जर्नालिझमचे सध्या प्रवेश सुरु असून त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
नव्यानेच अंजनेरीच्या पायथ्याशी सुरू करण्यात आलेल्या भोसला इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हेंचर अॅन्ड स्पोर्टस् (बायस)तर्फे साहसी खेळाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याचबरोबरच अल्प मुदतीचे अभ्यासक्रम हे सुरु करण्यात आले असून त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे, केवळ साहसी खेळाचे शिक्षण देणेच नव्हे तर आपत्ती व्यवस्थापनासारख्या विषयाच्या प्रशिक्षणातही ही इन्स्टिट्युट महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे. याशिवाय भोसला अॅडव्हेंटर फाऊंडेशन हे संस्थेचे युनिट यशस्वीपणे काम करत असून त्याद्वारे सर्व प्रकारचे साहस शिबीर घेण्यात येते. हिमालयन एज्युकेशन ट्रॅक अर्थात समर एज्युकेशनल कोर्सेसद्वारे सर्व मार्गदर्शन केले जाणार आहे. सुरक्षाविषयक जागृती, प्रबोधनाचा नेहमीच प्रयत्न संस्थेने नेहमीच समाजात मोठ्या प्रमाणावर सुरक्षा विषयात जागृती आणि प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे. दरवर्षी सातत्याने एनडीएमध्ये निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. देशभक्तीने भारावलेले वातावरण व राष्ट्रीय विचार बालमंदिरापासूनच इथे शिकणाऱ्या मुलांमध्ये जागृत होतात आणि भविष्यातले चांगले नागरिक घडतात त्यामुळे भविष्यातील चांगला नागरिक घडवणारी आदर्श संस्था म्हणून भोसलाकडे पाहावे लागेल. एक्स १६५ एकरावर पसरलेला हा उपक्रम एकदा तरी प्रत्येकाने पाहायलाच हवा असा आहे.
joshishibani@yahoo. com