Wednesday, March 19, 2025
Homeक्राईमCrime : बदलापुरचा उद्रेक! दोन चिमुकल्यांवरील अत्याचारानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट

Crime : बदलापुरचा उद्रेक! दोन चिमुकल्यांवरील अत्याचारानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट

शाळेच्या गेटवर मोठी गर्दी; शेकडो पालकांचा ठिय्या

मुंबई : बदलापुरमधून (Badlapur Crime) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बदलापुरमध्ये एका नामांकित शाळेत दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी परिसरातील नागरिकांमधून तीव्र संतापाची लाट उसळली आहे. यामुळे बदलापुरकर आक्रमक झाले असून त्यांनी आज बदलापूर बंदची हाक दिली आहे. ज्या शाळेत ही दुर्दैवी घटना घडली, त्या शाळेच्या बाहेर आज सकाळपासूनच संतप्त पालकांची मोठी गर्दी जमली असून ठिय्या आंदोलन (Agitation) सुरु केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बदलापुरात एका नामांकित शाळेत चार वर्षाच्या दोन चिमुकल्यांवर शाळेतील कर्मचाऱ्याने अत्याचार केले होते. याप्रकरणी शाळा प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्यामुळे शाळा प्रशासनाच्या विरोधात बदलापूरकर आक्रमक झाले आहेत. ‘शाळेने मुलींच्या सुरक्षिततेची हमी घ्यावी, आमच्या मुली इथे सुरक्षित नाहीत’ अशा पालक आणि बदलापुरकरांच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बदलापूर पोलिसांचा शाळेच्या गेटवर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच ज्या शाळेत हा प्रकार घडला आहे त्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या मुख्याध्यापिका, वर्गशिक्षका, मुलांची ने आण करण्याची जबाबदारी असणाऱ्या दोन सेविकांना निलंबित करण्यात आले आहे.

नेमके प्रकरण काय?

बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. सफाई कर्मचाऱ्यानेच मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्यानंतर मुलींच्या पालकांनी याविरोधात पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेण्यास १२ तास लावले, असा आरोप पालकांनी केला. आता या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणी शाळेने माफीनामादेखील दिला आहे.

बदलापूरमध्ये पालकांना ताटकळत ठेवणाऱ्या अधिकाऱ्याची बदली

बदलापूर पूर्वेला असणाऱ्या एका नामांकित शाळेतील चार वर्षांच्या दोन मुलींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकारानंतर स्थानिक नागरिक प्रचंड संतापले आहेत. सुरुवातीला शाळा प्रशासन आणि पोलिसांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. जेव्हा पीडित मुलींचे पालक पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेले तेव्हा त्यांना तेथील महिला पोलीस अधिकाऱ्याकडून तब्बल १२ तास ताटकळत ठेवण्यात आले. मात्र, या प्रकरणावरुन गदारोळ निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. पोलिसांकडून याप्रकरणात चालढकल केल्याचे समोर आल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांची ठाणे नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आली. मात्र, यानंतरही पालक आणि बदलापूरमधील नागरिकांचा रोष शमलेला नाही.

बदलापूरमधील नागरिकांनी मंगळवारी शहरात बंदची हाक दिली आहे. या घटनेनंतर शाळेच्या मुख्याध्यापिका, संबंधित वर्गशिक्षिका आणि दोन सहायक कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकण्यात आले आहे. मात्र, शाळा प्रशासनाने अद्याप याबाबत पालकांसोबत समोरासमोर चर्चा केलेली नाही. शाळेचे प्रशासन बोलायला तयार नसल्याने पालक सध्या प्रचंड संतापले आहेत. त्यांना शहरातील नागरिकांची साथही मिळाली आहे. मंगळवारी सकाळी बदलापूरमधील संतप्त नागरिकांचा मोर्चा शाळेच्या गेटवर धडकला. याठिकाणी नागरिकांकडून प्रचंड घोषणबाजी करण्यात आली. मात्र, शाळा चालवणाऱ्या प्रशासनातील कोणत्याही व्यक्तीने पालकांना सामोरे जाण्याचे धारिष्ट्य दाखवलेले नाही. नागरिकांचा जमाव शाळेच्या गेटवर धडकून तीन तास उलटले तरी शाळा प्रशासनाकडून कोणीही चर्चेला आलेले नाही. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

याप्रकरणात पोलीस कोणावर कारवाई करणार, हेदेखील बघावे लागेल. शाळा प्रशासनाकडून केवळ एक माफीनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. मुलींवर अत्याचार करणाऱ्या सफाई कर्मचारी पुरवणाऱ्या कंत्राटदारासोबतचा करार रद्द करण्यात आला आहे. सर्व पालक वर्गाची शाळेने जाहीर माफी मागितली आहे. घडलेला प्रकार दुर्दैवी, घृणास्पद आणि निंदनीय आहे. संबंधित कर्मचाऱ्यावर कठोर शिक्षा व्हावी यासाठी संस्थेचा आग्रह आहे. आरोपीविरोधात पूर्ण क्षमतेने संस्थेने पोलिसांना आम्ही सहकार्य केले, असे शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -