नवी दिल्ली : एकीकडे माणसाला दैनंदिन जीवनात गरजेपयोगी लागणाऱ्या वस्तूंचे दर वाढत चालले असताना आता प्रवासदेखील महाग होत चालल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्या सणासुदीचा काळ सुरू झाला असून याचा चांगलाच फायदा विमान कंपन्यांनी घेतला आहे. गणेशोत्सव, ओनम, दिवाळी अशा सणांच्या कालावधीत प्रवासासाठी आत्तापासून विमानाच्या तिकीटांचे आरक्षण सुरू झाले आहे. त्यातच आता विमानप्रवासात शुल्कवाढ (Flight Ticket Price Hike) झाल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे ऐन सणांच्या काळात नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री बसत आहे.
प्रमुख देशांतर्गत मार्गावरील वन-वे तिकीट दर १० ते १५ टक्क्यांनी वाढले आहेत. तर केरळ शहरांमध्ये काही फ्लाइटचे भाडे २० ते २५ टक्के वाढवण्यात आले आहेत. इक्सिगो या ट्रॅव्हल पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार, ३० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत दिल्ली-चेन्नई मार्गावरील थेट फ्लाइटसाठी इकॉनॉमी क्लासचे सरासरी वन-वे भाडे २५ टक्क्यांनी वाढून ७ हजार ६१८ रुपये झाले आहे. तर मुंबई- हैदराबाद मार्गावरील तिकीट दर २१ टक्क्यांनी वाढून ५ हजार १६२ रुपये झाले आहेत. दिल्ली-गोवा आणि दिल्ली- अहमदाबाद मार्गावरील भाडे १९ टक्क्यांनी वाढून अनुक्रमे ५ हजार ९९९ रुपये आणि ४ हजार ९३० रुपये झाले आहेत.