मुंबई : मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
याबाबत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार एकत्र बसलो. आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावले. प्रत्येक बैठकीला देवेंद्र फडणवीस होते. मराठा आरक्षणासाठी जो कायदा केला त्यात फडणवीसांची मोलाची भूमिका होती. अजित पवारही सहभागी होते. मनोज जरांगेंच्या मागणीनुसार मराठवाड्यात ज्यांच्या कुणबी नोंदी ते आम्ही देऊ लागलो. मराठा समाजाला ज्या सवलती होत्या त्या दिल्या. मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले त्याला विरोध करायला कोर्टात कोण गेले ते आधी बघा असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
मराठा आरक्षणाच्या निर्णयात देवेंद्र फडणवीसांची मोलाची भूमिका आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना देखील त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम केले होते. त्यावेळीही मी मंत्री होतो, त्या समितीमध्ये होतो, त्यामुळे देवेंद्रजी मराठा समाजाला विरोध करतात असं म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे. त्यामध्ये, कुठलंही तथ्य नाही, हा खोटा आरोप आहे, असे म्हणत मनोज जरांगे यांच्याकडून होत असलेल्या आरोपावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही रोखठोक भूमिका मांडली. तसेच, मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीसह इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, ही आमची भूमिका काल, आज आणि उद्याही कायम आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.