कर्जत : भारत देश हा ९० टक्के हिंदूंचा देश आहे. हे हिंदू राष्ट्र आहे. त्यामुळे पहिले हिंदूंचे हित पाहिले जाईल. नंतर बाकीच्यांचे धर्म मोजले जातील. येथे आमच्या मंदिराजवळ अतिक्रमण होत असेल तर तुमच्या ही धार्मिक स्थळांना व्यवस्थित ठेवले जाणार नाही. प्रशासनाने यांचे असले लाड बंद केले पाहिजे. कायदा आणि सुव्यवस्था आम्हालाच शिकवू नये. प्रशासनाने सदरचे अतिक्रमण न काढल्यास त्याचा कार्यक्रम करा. तुम्हाला काही होणार नाही याची शाश्वती आपण देतो, असा इशारा हिंदू धर्म योद्धे आमदार नितेश राणे यांनी दिला.
आमदार नितेश राणे कर्जत येथे हिंदू जन आक्रोश मोर्च्यात बोलत होते. यावेळी मोठ्या संख्येने तरुण युवक आणि युवती उपस्थित होत्या. कर्जत शहरात कापरेवाडी वेस येथील हनुमान मंदिराजवळ आणि अष्टविनायकांपैकी एक असलेल्या सिध्दटेक येथे सिध्दीविनायकाच्या मंदिराच्या बाहेर मुस्लिम धर्मीयांकडून होत असलेल्या अतिक्रमणाविरुद्ध कर्जत येथे सकल हिंदू समाजाच्यावतीने भव्य हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
भांडेवाडी येथील अक्काबाईनगर येथून हिंदू जन आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. संत श्री सदगुरु गोदड महाराज मंदिरात दर्शन घेतल्यानंतर हा मोर्चा कापरेवाडी वेशीतून बाजारतळ येथे आला असता मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी पुढे बोलताना आ. नितेश राणे म्हणाले की, लव्ह जिहाद व लॅन्ड जिहादच्या माध्यमातून कर्जतसह महाराष्ट्रामध्ये हिंदूची संख्या कमी करण्याचे षडयंत्र सुरू आहे. जिहादी आपल्या धर्मासाठी काहीही करायला तयार आहेत. मुस्लिम समाजात जो धर्माबद्दल कडवटपना आहे तोच हिंदू मध्ये यावा हेच या मोर्च्याचे उद्देश आहे.
आपल्या देशात शरिया कायदा लागू करण्याचा यांचा प्रयत्न सुरू आहे. यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान देखील मान्य नाही. यांना आपल्यासाठी स्वतंत्र वक्फ बोर्ड पाहिजे. वेगळे मुस्लिम बोर्ड पाहिजे. आता आपण शांत बसून चालणार नाही. यांनी आपल्या ग्रामदैवत संत सदगुरु गोदड महाराज ज्या ठिकाणी बसून किर्तन करीत होते. त्या ठिकाणी अतिक्रमण करायचे.आणि आपण ते बघत बसायचे का ? सिद्धटेक येथे सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेर अतिक्रमण सुरू करायचे ते पण शांत पाहत बसायचे का? आता हे खपवून घेतले जाणार नाही. प्रशासनाने हे अनधिकृत अतिक्रमणे काढावी. न काढल्यास परत परत मोर्चा काढण्यास मी देखील मोकळा नाही. हा शेवटचा मोर्चा आहे. अयोध्येत जशी कारसेवा करण्यात आली. तशीच कारसेवा पुन्हा करू आणि आम्ही ही अतिक्रमणे काढू. आमच्या धर्माने विचारांची लढाई विचारानेच लढायला शिकवले आहे. पण कोणी शस्राने आमच्या अंगावर येत असेल तर आम्हाला ही आमच्या धर्माने शस्र चालवायची परवानगी दिली आहे. हे समोरच्याने विसरू नये.
नवरात्र किंवा महाआरती १० वाजता बंद करता आणि यांच्या मोहरमच्या मिरवणुका पहाटे तीन वाजेपर्यंत चालू ठेवता. हा कुठला न्याय आणला आहे. सर्व धर्म समभावाची पिपाणी आम्हीच वाजवायची का? असे म्हणत हिंदू धर्माचे रक्षण आपणच करायला शिका, असे तरुणांना उद्देशून राणे यांनी म्हटले.
हिंदू रणरागिनी हर्षदा ठाकूर यांनी आपल्या भाषणात हिंदू समाजातील मुलींना व महिलांना जागृत करीत लव्ह जिहादच्या नावाने मुस्लिम व्यक्ती फसवत असल्याची उदाहरणे देत अत्यंत आक्रमक शैलीत भाषण केले. आता महाभारत होणार नाही.आता द्रौपदीला वाचवायला कृष्ण येणार नाही. तर तिला स्वत:ला स्वत:चे संरक्षण करावे लागणार आहे. तेव्हा यंदा सर्व भावांनी राखी पौर्णिमेला आपल्या बहिणीला एक छोटा चाकू भेट द्या, असे आवाहन केले. माझ्यासारख्या आक्रमकपणे काम करत असलेल्यांवरही हल्ला झाला आहे. हाथ मोडला आहे. पण अद्याप पोलिस ठाण्यात एक ही गुन्हा या जिहाद्यांवर दाखल झाला नाही, ही शोकांतिका आहे. आज बांगलादेशात हिंदू महिलांवर अत्याचार केले जात आहेत. त्यामुळे आपल्याला एकत्र येत लढा उभा करावा लागेल, असे उपस्थितांना त्यांनी आवाहन केले.