‘विशाल पाटील यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे’, ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
सांगली : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) वेळी सांगलीच्या (Sangali) जागेवरुन महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) चांगलीच बिघाडी झाल्याचे पाहायला मिळाले. मित्रपक्षांशी चर्चा न करता ठाकरे गटाने (Thackeray Group) या जागेवरुन थेट आपला उमेदवार जाहीर केल्यामुळे काँग्रेस आक्रमक झाली. यातूनच विशाल पाटील (Vishal Patil) यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा विजय झाला. त्यामुळे ठाकरे गट तोंडावर आपटला शिवाय मविआवरही विपरित परिणाम झाला. यानंतर आता विधानसभा निवडणुकीतही ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाद रंगण्याची शक्यता आहे. लोकसभेला काँग्रेसने साथ न दिल्यामुळे आता विधानसभेला जिल्ह्यामध्ये काँग्रेसशी युती नकोच, अशी थेट मागणी सांगलीचे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभुते (Sanjay Vibhute) यांनी केली आहे.
संजय विभुते यांनी काँग्रेसचे सहयोगी खासदार विशाल पाटील यांच्यावर थेट टीकास्त्र उपसले आहे. त्यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असल्याची टीका विभुते यांनी केली आहे. तसेच सांगली जिल्ह्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून पुन्हा विश्वासघात होणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत, त्यामुळे सांगली जिल्ह्यात काँग्रेस सोबत आघाडी नको, अशी मागणी देखील संजय विभुते यांनी केली आहे. त्यांच्या मागणीमुळे आगामी काळात काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये जोरदार वाद रंगण्याची शक्यता आहे.
दरम्यान, खासदार विशाल पाटलांनी खानापूर-विटा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे संभाव्य उमेदवार सुहास बाबर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यावरून शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. तसेच उद्धव ठाकरेंच्या निदर्शनास देखील विशाल पाटलांची भूमिका आणून देणार असल्याचे संजय विभुतेंनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता सांगली विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस असा संघर्ष पुन्हा उफाळून येणार आहे.