रामदास कदमांच्या टीकेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सावध उत्तर
मुंबई : भाजपाला जर राक्षसी महत्त्वाकांक्षा असेल तर युती तोडावी तुम्ही तुमचे लढा, आम्ही आमचे लढू, असे वक्तव्य करणा-या रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्या टीकेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सावध भूमिका घेत चोख उत्तर दिले आहे. आम्हीही माणसं आहोत, आमचीही मनं दुखावतात. याबाबत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याशी बोलणार असल्याचे फडणवीस यांनी म्हटले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या प्रकारचे आरोप करणे हे कुठल्या युती धर्मात बसते. त्यामुळे जर रामदास भाईंचे काही म्हणणे असेल तर त्यांनी अंतर्गत ते मांडले पाहिजे. प्रत्येक वेळी भाजपाला, भाजपाच्या नेत्यांना अशा प्रकारे वेठीस धरणे यातून एक चांगली भावना तयार होत नाही, असे मला वाटते. तरी मी भाईंचे काय म्हणणे आहे हे समजून घेईल आणि त्यातून मार्ग काढेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
तर रामदास कदम यांनी भाजपाला जर राक्षसी महत्त्वाकांक्षा असेल तर युती तोडावी तुम्ही तुमचे लढा, आम्ही आमचे लढू, असेही म्हटले. याबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, रामदास भाई असे वारंवार टोकाचे बोलतात. त्याने आमचे मनं देखील दुखावले जातात. शेवटी आम्हीही माणसं आहोत. ५० गोष्टी आम्हालाही त्याच्या उत्तरावर बोलता येतील. जे मोठे नेते आहेत त्यांनी काहीतरी पथ्य पाळावे. वारंवार भारतीय जनता पक्षाला असे बोलणे हे आम्हाला मान्य नाही. याबाबत मी स्वतः एकनाथ शिंदे यांच्या सोबत बोलेल, असे उत्तर त्यांनी रामदास कदम यांच्या टीकेवर दिले आहे.