Thursday, March 27, 2025
Homeताज्या घडामोडीDevendra Fadnavis : ...तर मी राजीनामा देईन आणि राजकारणातून संन्यास घेईन!

Devendra Fadnavis : …तर मी राजीनामा देईन आणि राजकारणातून संन्यास घेईन!

जरांगे पाटलांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांचं प्रत्युत्तर

मुंबई : राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा (Maratha Vs OBC reservation) मुद्दा चांगलाच पेटला आहे. दोन्ही समाजांनी केलेल्या परस्परविरोधी मागण्यांमुळे राज्य सरकार कोंडीत सापडलं आहे. त्यातच मराठा आंदोलनातील नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) सातत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप करत असतात. त्यांनी सगेसोयरेंची मागणी लावून धरली आहे आणि फडणवीस त्यात अडथळा आणतात, असा आरोप त्यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षणाबाबत काम करुन इच्छितात पण देवेंद्र फडणवीस त्यांना हे काम करु देत नाहीत, असंही ते म्हणाले आहेत. यावर आज देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मनोज जरांगे पाटलांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे. पण हे देखील मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे की राज्याचे सगळे अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे असतात, इतर सगळे मंत्री मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अधिकारांवर त्या ठिकाणी काम करत असतात. मी तर त्याच्या पुढे जाऊन म्हणेन, कारण शिंदे साहेब आणि मी एकत्रितपणे काम करतो. शिंदे साहेबांना पूर्ण पाठिंबा आणि पाठबळ माझं आहे. त्यामुळे त्यांनी शिंदे साहेबांना विचारावं आणि शिंदे साहेबांनी जर असं म्हटलं की मराठा आरक्षणाकरिता कुठलाही निर्णय घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मी थांबवला, तर त्या क्षणी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातून देखील निवृत्त होईन.

पुढे ते म्हणाले, एक लक्षात ठेवा आजपर्यंत मराठा समाजाकरता जे काही निर्णय झाले ते एक तर मी केले, किंवा शिंदे साहेबांनी केले. शिंदे साहेबांच्या पाठीशी मी ठामपणे उभा राहिलेलो आहे. त्यामुळे अशा प्रकारे जाणीवपूर्वक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न अतिशय अयोग्य आहे. मी पुन्हा एकदा सांगतो शिंदे साहेबांनी जर या ठिकाणी सांगितलं की मराठा आरक्षणाकरता त्यांना निर्णय घ्यायचा आहे आणि त्या निर्णयामध्ये मी अडथळा निर्माण केलाय, तर मी राजीनामा देईनच, पण राजकारणातून देखील संन्यास घेईन, असा पुनरुच्चारही फडणवीसांनी केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -