सिंधुदुर्ग : आज राज्यभरात रक्षाबंधन आणि नारळीपौर्णिमेचा सण उत्साहात साजरा केला जात असतानाच सिंधुदुर्गातून एक दुर्घटना समोर आली आहे. मासेमारीसाठी गेलेल्या खलाशांची बोट उलटल्यामुळे पाण्यात बुडून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या बोटीतून चार जण प्रवास करत होते. मात्र, समुद्रामध्ये निर्माण झालेल्या धुक्यांमुळे बोट दगडाला आपटून उलटली आणि चारही जण समुद्रात बुडाले. यातील तीन खलाशांचे मृतदेह सापडले आहेत तर एकजण पोहत किनाऱ्याशी आल्याने तो बचावला.
मिळालेल्या माहितीनुसार, आचरा येथील चार खलाशी मासेमारीसाठी रविवारी रात्री सर्जेकोट समुद्रात गेले होते. समुद्रामध्ये निर्माण झालेल्या धुक्यांमुळे बोट दगडाला आपटली. त्यानंतर ही बोट समुद्रात पलटी झाली आणि बोटीवरील चारही खलाशी समुद्रात बुडाले. यामधील ३ खलाश्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला.
या खलाशांपैकी एक खलाशी पोहत पोहत समुद्रकिनारी पोहचला. त्याने घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर समुद्रात बुडालेल्या तिन्ही खलाशांचा शोध घेण्यात आला. या तिन्ही खलाशांचे मृतेदह सापडले असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहेत. रुग्णालयाबाहेर खलाश्यांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे.
या दुर्घटनेमध्ये सर्जेकोट सोसायटीचे चेअरमन गंगाराम आडकर यांचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त बोट गंगाराम आडकर यांचीच होती. आडकर हे चौके विद्यालयातून सेवानिवृत्त झाले होते. या घटनेमुळे आडकर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून नारळी पौर्णिमेच्या दिवशी सर्जेकोट गावावर शोककळा परसरली आहे.