क्राइम – अॅड. रिया करंजकर
आर्थिक परिस्थितीवर व्यक्तीचा मानसन्मान अवलंबून असतो ही आजची परिस्थिती सांगते. ज्याची आर्थिक परिस्थिती सुलभ नाही त्याला समाजातही मानसन्मान मिळत नाही. जो आर्थिक परिस्थितीने भक्कम असेल व गुंड प्रवृत्तीचा जरी असेल तरी त्याला समाजात मान दिला जातो. उलट परिस्थिती समाज माध्यमात बघितली जाते. माणसाची आर्थिक परिस्थिती मजबूत नसेल, तर पदोपदी त्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे माणूस हतबल होऊन टोकाच्या भूमिकाही घेत आहे.
गरीब कुटुंबांमध्ये जन्माला आलेली सुरेखा ही जेमतेम शिकलेली. जन्माला आल्यापासून गरिबी तिच्या नशिबी पुजली गेलेली होती. घरामध्ये खाणारी तोंडं जास्त आणि कमावणारे फक्त वडील अशा परिस्थितीमध्ये थोरली असल्यामुळे सुरेखाचे लग्न लवकर करण्याचा निर्णय तिच्या आई-वडिलांनी घेतला. जेणेकरून ती चांगल्या घरात जाईल आणि चांगले आयुष्य जगेल. त्यामुळे तिचे लग्न अनिलशी करून देण्यात आले. तोही घरचा श्रीमंत नव्हता, पण आपल्या कुटुंबाला पोसेल अशी त्याची मिळकत होती. आपल्या एका मुलीचा तरी प्रश्न मिटला. या काळजीतून सुरेखाचे आई-वडील सुटले असे त्यांना मनापासून वाटू लागले. पण सुरेखाचे सासरी आल्यावरही कष्ट काही संपले नाहीत. सुरेखा आणि अनिल दोघेही कष्ट करत आपल्या संसाराचा गाडा चालवत होते. या संसारवेलीवर त्यांना दोन मुलेही झाली. दोन मुले झाल्यानंतर खाणारी तोंडं वाढली. जी परिस्थिती सुरेखाला आई-वडिलांकडे वाटत होती, तीच आता या सासरच्या घरी वाटू लागली. त्यामुळे अनिल आणि सुरेखा यांच्यात वाद वाढू लागले. अनिल दारू पिऊन सुरेखा, मुलांना मारू लागला. तरीही सुरेखा आपल्या मुलांसाठी तिथे राहात होती. पण अनिलचे अत्याचार दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे तिने आपल्या आई-वडिलांकडे मुलांसह जाण्याचा निर्णय घेतला. दररोजच्या भांडणांपासून तरी मुले लांब राहतील. असा विचार तिने केला आणि ती आपल्या आई-वडिलांकडे आली. लग्नाअगोदर आई-वडिलांकडे खाणारे सुरेखाचे एक तोंड होते पण आता तीन तोंडं खाणारी झाली होती. आपल्या मुलांचा आई-वडिलांवर भार नको म्हणून तीही धुणी-भांडी करून हातभार लावू लागली. आपला नवरा आज ना उद्या सुधारेल या आशेवरती होती.
एक दिवस दूरच्या नातेवाइकाकडून सुरेखाला समजले की, अनिलने लग्न केले असून त्याला एक मूल आहे. हे समजतात सुरेखा आणि तिच्या आई-वडिलांची पायाखालची जमीन सरकली. म्हणून सुरेखाचे नातेवाईक जाब विचारण्यासाठी अनिलच्या घरी गेले, तर अनिलच्या घरातील लोकांना या गोष्टीची कल्पना नव्हती. शेवटी मिळालेल्या माहितीनुसार पुरावे दिल्यावर अनिलने ते कबूल केले. तुम्हाला जे काय करायचे ते करून घ्या अशी धमकी दिली. तुमची पोरगी नांदत नाही, त्याला मी काय करू. तेव्हा अनिलने उलट उत्तर देऊन म्हणाला की, तुमच्या मुलीने सगळे सहन करत इथे राहायचे होते, तिला तिथून जायला सांगितले नव्हते. बाईच्या जातीने मार मुकाट्याने सहनच करायचा असतो असे तो उलट नातेवाइकांना उत्तर देऊ लागला. सुरेखा अनिलच्या दुसऱ्या बायकोकडे गेली असता तिलाही धक्का बसला. कारण तिलाही माहीत नव्हते की, अनिलचे अगोदर लग्न झाले असून त्याला दोन मुले आहेत. सुरेखाची गरीब परिस्थिती होती म्हणून तिच्या आई-वडिलांनी लग्न करून दिले. तसेच अनिलची दुसरी बायको लता हिच्याही बाबतीत झाले होते. ती गरीब घरची मुलगी होती. तिच्याही आई-वडिलांनी आपली मुलगी कुठे सुखात राहील म्हणून लग्न करून दिले होते.
पण लग्न करताना त्याने आपले कोणी नातेवाईक नाही असे सांगितले होते. दुसरी बायको केली हे समजल्यावर तिच्यासोबत राहत होता त्या ठिकाणाहून त्यांनी पळ काढला होता. सुरेखा आणि लता दोघीही अशिक्षित आणि गरीब घरच्या मुली होत्या. त्या दोघींची फसवणूक केली होती. गरिबीमुळे दोघींच्या आई-वडिलांनी मुली लग्न केले की, सुखात राहतील पण त्या दोघींच्या पदरात काही सुख मिळाले नाही. दोघींना आता न्याय पाहिजे होता. न्यायासाठी त्या वकिलांना भेटू इच्छित होत्या. पण वकिलांची फी त्यांना जमेल का? हा विचार त्यांच्या मनात होता. कोर्ट आपल्याला न्याय देईल का? कारण गरीब परिस्थितीमुळे आपण कुठे कमी पडू का? असा विचार करणाऱ्या आज अनेक महिला अनेक समस्यांना सामोरे जात आहेत.
अशिक्षित आणि गरीब घरच्या मुलींना असे अनेकजण आहेत जे फसवून लग्न करतात. मुले झाली की मात्र त्यांना सोडून देतात. अशिक्षितपणा आणि गरिबीमुळे ते न्याय मागू शकत नाहीत. म्हणून अनिलसारखे असे अनेक गुन्हेगार आज मोकाट फिरत आहेत. म्हणूनच गरिबीला वाली कोण? हा नेहमीच प्रश्न समोर उभा राहतो.
(सत्यघटनेवर आधारित)