कथा – प्रा. देवबा पाटील
एका दिवशी जयश्री खेळून झाल्यावर जरा लवकरच घरी आली. ती लवकर आल्याचे बघून आईलाही थोडे आश्चर्य वाटले. ‘‘खेळ संपला असेल म्हणून आली असेल थोडी लवकर’’ असा विचार करून आईने तिला काही विचारले नाही. घरी आल्यावर आधीच हातपाय धुवून, रुमालाने कोरडे करून आली व स्वयंपाकघरात आईच्या जवळ जाऊन बसली व आईला विचारू लागली.
‘‘आपल्याला वेदना कशा होतात गं आई? आज खेळताना आमची एक मैत्रीण ठेच लागून पडली होती. तिचा पाय मुरगळला होता. खूप वेदना होत होत्या तिला. म्हणून आज आम्ही खेळणे बंद करून तिला घरी पोहोचवून दिले होते. आई मग या वेदना कशा होतात गं?’’
‘‘हो, कोणत्याही लहान-सहान इजेमुळे झालेल्या क्षणिक वेदना हीसुद्धा गुदगुल्यांसारखी तशीच, आपला ताबा नसणारी एक प्रतिक्षिप्त क्रियाच आहे. आपणास काही लागले, आपले काही दुखले-खुपले म्हणजे आपणास आपोआपच वेदना होतात. ज्या अवयवाला मार लागला तेथील पेशींवर काहीअंशी ताण येतो. त्या पेशींशी निगडित मज्जातंतूंद्वारा तो संदेश त्या अवयवाच्या मज्जाकेंद्रापर्यंत जातो व त्या मज्जाकेंद्रातर्फे त्वरित जो प्रतिसाद दिला जातो त्यानेच आपणास वेदना जाणवतात; परंतु मोठ्या गंभीर इजेमुळे झालेल्या वेदना मात्र मेंदूद्वारे नियंत्रित होत असतात. बरे तुला आठवते का गं अशी एखादी आपोआप घडणारी प्रतिक्षिप्त क्रिया?’’ आईने विचारले.
‘‘हो आई, एखाद्या गरम वस्तूला चुकूनही आपला हात लागला किंवा हातापायाचा स्पर्शही झाला तरी आपला हात चटकन आपोआप मागे घेतला जातो किंवा पाय आपसूकच बाजूला सारला जातो. बरोबर ना आई?’’ हुशार जयश्रीने प्रश्नार्थक उत्तर दिले व पुढे ताबडतोब प्रश्नही केला, ‘‘पण हे कसे घडत असावे गं आई?’’
‘‘त्याचे कारण असे आहे की, गरम वस्तूला हाताचा स्पर्श होताबरोबर आपल्या हाताची आग होताक्षणीच आपल्या हातातील चेतातंतूंकडून त्वरित आपल्या मज्जासंस्थेकडे एक संदेश पाठविला जातो. त्या संदेशाला प्रतिसाद म्हणून त्या मज्जाकेंद्राकडून त्वरित चेतातंतूंद्वारा त्या अवयवाला हात मागे घे, असा प्रत्युत्तरी स्वरूपाचा आदेश पाठविला जातो. त्यामुळे आपला हात आपोआप चटकन मागे जातो, दूर सारल्या जातो. कोणतीही प्रतिक्षिप्त क्रिया ही ऐच्छिक क्रियेपेक्षा जलद होते. त्यामुळे ही क्रिया क्षणार्धातच घडते.’’ आईने सांगितले.
‘‘म्हणजे डोळ्यांच्या पापण्यांची हालचाल हीसुद्धी प्रतिक्षिप्त’’, ‘‘जयश्रीचे वाक्य मध्येच तोडत आई म्हणाली,’’ ‘‘नाही, ती अनैच्छिक क्रिया असते; परंतु डोळ्यांत कचरा गेला की तो कचरा बाहेर फेकण्यासाठी पापण्यांची वेगाने आपसूकच उघडझाप होते. कधी कधी थकल्यामुळे आपले डोळे आपसूक मिटतात, जोराच्या हवेमुळे, धुरामुळे, धूळ उडताना किंवा भीतीमुळे डोळे आपोआप बंद होतात. या सगळ्या प्रतिक्षिप्त क्रियाच आहेत.’’
मग पायात कधी कधी पेटकेसुद्धा असेच येतात का? जयश्रीने प्रश्न टाकला.
आई म्हणाली, ‘‘पेटके सहसा पायाच्या पोटरीच्या स्नायूंमध्ये जास्त प्रमाणात येतात. ही एक प्रकारची विकृती आहे. अर्थात शरीरातील कोठल्याही स्नायूंच्या आक्रसण्यामुळे किंवा संकोचनामुळे पेटके येऊ शकतात. जे स्नायू कार्यरत असताना त्यांना काही कारणांमुळे रक्तपुरवठा पुरेशा प्रमाणात न झाल्यास ते स्नायू आकुंचन पावतात व त्यामध्ये एकाएकी वेदना निर्माण होतात. त्यालाच पेटके म्हणतात. ते ठिकाण चोळल्याने त्या स्नायूंना रक्तपुरवठा नीट झाल्याने पेटके जातात. पण तरीही पेटके न गेल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणेच योग्य असते.’’
‘‘आई जास्त चालण्याने पाय का आंबतात?’’ जयश्रीने प्रश्न केला.
‘‘जास्त चालण्याने पायांच्या स्नायूंना जरी व्यायाम होतो, तरी त्यांच्या आकुंचनामुळे तेथे लॅक्टिक अॅसिड नावाचे आम्ल तयार होते.
जास्त चालण्यामुळे जरी अभिसरण वाढते तरी हे जास्तीचे तयार झालेले आम्ल तेथून त्वरित वाहून नेणे शक्य होत नसते. त्यामुळे ते तेथेच साचून राहते. त्याच्या संचयामुळे तेथील स्नायू आंबल्यासारखे होतात. चांगले चोळल्यावर किंवा गरम पाण्याने शेकल्यावर ते आम्ल वाहून नेणे शक्य होते व हलके वाटते.’’ आईने उत्तर दिले.
‘‘आई मी आता माझा अभ्यास करून घेते. पण उद्या मी तुला आणखी काही शंका विचारीन.’’ जयश्री तिच्या आईला म्हणाली. ‘‘जरूर बाळा.’’ तिची आई उत्तरली.