Tuesday, April 22, 2025
Homeसाप्ताहिककोलाजउषा आणि अनिरुद्धचा विवाह...

उषा आणि अनिरुद्धचा विवाह…

विशेष – भालचंद्र ठोंबरे

भक्त प्रल्हादाचा नातू व बळी राजाचा पूत्र हा राक्षस कुळातील एक पराक्रमी राजा होता. त्याला सहस्त्र हात होते. त्याने शिवाची खूप तपश्चर्या व भक्ती केली. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन शिवाने त्याच्या राज्याचे (शोणितापूरचे) रक्षण करण्याची जबाबदारी स्वतःहून स्वीकारली. बाणा सुराला उषा नावाची एक अत्यंत सुंदर मुलगी होती. बाणा सुराला त्याचे हात तोडण्यास तुझा जावई कारणीभूत होईल असा वर दिला होता. त्यामुळे त्याने मुलीवर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवले. एके दिवशी उषाला स्वप्नात एक सुंदर पुरुष दिसला. ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले व त्यांनी विवाह केल्याचे स्वप्नात दिसले. तसेच या विवाहाला पार्वती मातेनेही आशीर्वाद दिल्याचेही दिसले. सकाळी उठताच उषा स्वप्नातील गोष्ट आठवून अस्वस्थ झाली. स्वप्नात पाहिलेल्या व्यक्तीला तिने कोठेही पाहिले नव्हते. तिची अस्वस्थता तिची जीवलग सखी चित्रलेखाच्या नजरेत आली. चित्रलेखाने यासंदर्भात तिला विचारले असता उषाने स्वप्नातला प्रकार तिला सांगितला. तो पुरुष कोण? त्याला कोठे शोधणार? वगैरे शंका उपस्थित केल्या.

चित्रलेखाला नारदमुनींकडून अनेक विद्या प्राप्त झाल्या होत्या. त्यात चित्रलेखाला चित्रकला व अवकाशात त्वरेने कोठेही जाण्याची पण कला अवगत होती. तिने उषाला अनेक राजा, राजपुत्राची चित्रे काढून दाखविली. यदू वंशातील प्रद्युम्नाचे चित्र पाहून थोडाफार असा आहे असे उषा म्हणाली. तेव्हा तिने अनिरुद्धचे चित्र काढून दाखवताच हाच तो म्हणून उषाने संमती दिली. हा कोण? असे उषाने विचारल्यावर हा कृष्णाचा नातू व प्रद्युम्नाचा मुलगा अनिरुद्ध असल्याचे चित्रलेखाने सांगितले. पण याची भेट कशी होणार या विचाराने उषा चिंतित झाली. तेव्हा चित्रलेखाने तिला आश्वस्त केले व उद्या अनिरुद्ध तुझ्यापाशी असेल असे सांगितले. चित्रलेखेने आकाशमार्गे द्वारकेला जाऊन झोपेत असलेल्या अनिरुद्धला उषाच्या महालात आणले. सकाळी उठताच आपण एका अनोळखी ठिकाणी सुंदर युवतीच्या समोर असल्याचे आढळून आल्याने अनिरुद्ध आश्चर्यचकित झाला. उषाने त्याचे स्वागत करून त्याला आपले स्वप्न व पार्वतीमातेने लग्नाला दिलेला आशीर्वादही सांगितला. अनिरुद्धलाही उषा आवडली व त्यांनी गांधर्व विवाह केला. अशाप्रकारे उषा व अनिरुद्ध गुप्तपणे महालात राहू लागले. एक दिवस उषा आणि अनिरुद्ध महालात बोलत असताना सेवकांनी पाहिले व बाणासुराला जाऊन सांगितले. बाणासुराने त्वरित महालात जाऊन अनिरुद्धला कैद केले.

इकडे द्वारकेत अनिरुद्धच्या नाहीसे झाल्याने गोंधळ उडाला होता. अनिरुद्ध बाणाकडे कैदेत असल्याचे नारदाकडून कळताच श्रीकृष्ण, बलराम, सात्यकी, प्रद्युम्न आदी रथी महारथी सैन्य घेऊन शोणितापूरला निघाले. हे कळताच बाणाने भगवान शंकराची आराधना केली व त्यांना रक्षणासाठी येण्याचे आवाहन केले. शिव आपल्या नंदी कार्तिकेय व सैन्य गणासह बाणासुराच्या रक्षणासाठी दाखल झाले. कृष्ण व शिवामध्ये तुंबळ युद्ध झाले. हे युद्ध स्वर्गातून देव आणि देवता आश्चर्याने पाहत होते. एकमेकांवर विविध शस्त्राचे वार पलटवार करीत शेवटी श्रीकृष्णाने निद्रा आणणारा बाण मारला. त्यामुळे शिवाला निद्रा आली. तेव्हा श्रीकृष्णाशी युद्ध करायला बाणासूर पुढे आला.

श्रीकृष्णाने त्याचे धनुष्य तोडून सुदर्शन चक्राच्या साह्याने त्याचे हात तोडले. तेच महादेव निद्रेतून जागे झाले व बाणासूर माझा भक्त आहे, त्याने माझ्याकडे संरक्षण मागितले आहे, तेव्हा त्याचा वध करू नये असे विष्णूला सांगितले. विष्णू म्हणाले, मी प्रल्हादाला वचन दिले आहे की, त्याच्या वंशातील कोणालाही मारणार नाही. त्यामुळे मी त्याचा वध करणार नाही. पण बाणाला आपल्या हातांचा अहंकार झाला होता म्हणून त्याचे हात कापले. बाणासुराने श्रीकृष्णाची क्षमा मागून उषा व अनिरुद्धला श्रीकृष्णासोबत आनंदाने रवाना केले. आजपर्यंत लग्नासाठी पुरुषांनी स्त्रिला पळवून नेल्याची अनेक उदाहरणे आहेत; परंतु स्त्रीने पुरुषाला पळवून आणल्याचे हे एकमेव उदाहरण असावे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -