Friday, March 28, 2025
Homeसाप्ताहिककोलाजवो फिर नही आते...

वो फिर नही आते…

हलकं-फुलकं – राजश्री वटे

गुलजार यांनी… काय समर्पक लिहिले आहे ना…
वो फिर नही आते…… आयुष्यभर अगदी कशीही, कुठेही आपल्याला अनेक माणसे भेटतात, आपलीशी वाटतात, मनात घर करतात, आयुष्याचा अविभाज्य भाग होतात. काळ आपली गती स्वीकारतो आणि या रामरगाड्यात ती एकाएकी हरवून जातात.

आयुष्याचा सुवर्णकाळ आपण ज्यांच्यासोबत घालवला ती माणसे आता कदाचित संपर्का पलीकडे पोहोचलेली असतात. मोबाईलमध्ये त्यांचा नंबर असूनही “मीच का?” अशा या आपल्या अहंकाराला बळी पडलेली असतात.
कोणे एकेकाळी आपल्या प्रत्येक क्षणावर आपलेपणाचा अधिकार गाजवणारी, आपल्या आनंदात आनंद मानणारी, मनातले सगळंच आपल्याला सांगणारी, काहीही बोलले तरीही आपल्यालाच येऊन बिलगणारी हीच माणसे आता नजरेलाही दिसेनाशी झालेली असतात. त्यांना आपण कायम आपल्या चालू वर्तमानकाळात ठेवायला हवे…… संपर्कात राहायला हवे.

अहो वाद घालायलाही संवादाची गरज असतेच ना?… तो संवाद अविरत चालू राहायला हवा.
कधी आपल्या नावाचा एखादा फोन…, एखादा मेसेज… नाहीतर स्व-लिखित पत्रच त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवे.
ही माणसे काळी का गोरी, श्रीमंत का गरीब, आपली का परकी अशी नसतात. त्या सुवर्ण मुद्रा असतात. नियतीने दिलेला आशीर्वाद अन् प्रसाद म्हणून भरभरून वाटलेला.

त्यांच्यामुळे तुमच्या आयुष्यात आलेला तो सुवर्ण काळ तुम्ही आजही जगताय का? ती माणसे आजही संपर्कात असतील आणि तो काळही तुम्ही उपभोगत असाल, तर तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच. कारण तो काळ किंवा ती माणसे परत येत नाहीत हो…… “वो फिर नहीं आते……”

आयुष्याची गाडी वेगाने पुढे हाकताना अशीच लाभलेली काही जीवाभावाची माणसे “मी”पणाचा पडदा थोडा बाजूला करून वेळ काढून, पुन्हा निरखून पाहायला हवीत. त्यांची विचारपूस करायला हवी, त्यांना समजून उमजून आपल्या आयुष्यात ठरवून आणायला हवं. एकदा का ती काळाच्या पडद्याआड गेली की, ती परत येत नाहीत हो…
माणसे ही अत्यंत महत्त्वाची असतात. त्यांना मनापासून जपायला हवे. भावनाशून्य या जगात जगताना आपण थोडे भावनाप्रधान व्हायला हवे. ओळख जितकी जुनी तितकी मैत्री घट्ट होत जाते. नात्यात सहजता येते.

या मनापासून जपलेल्या नात्याला जेव्हा आपण बुद्धीच्या जोरावर तोलून पाहतो तेव्हा काहीतरी खटकते, अनेक तर्क-वितर्क निघतात, शंका उत्पन्न होतात, राईचा पर्वत होतो, गुंतागुंत वाढवणारे गैरसमज निर्माण होतात आणि… ही मैत्री नावाची ‘नाव’ अनेक विचारांच्या सागरात हेलकावे खाताना दिसते. वेळीच हे सगळे विचार पुसून टाकून मनाची पाटी ज्याला कोरी करता आली तो तरलाच म्हणायचे.

आपल्या सगळ्यांचेच आयुष्य फार गजबजलेले आहे. कुणालाही जराही उसंत नाही. आपल्याला सगळ्यांनाच यशस्वी व्हायच आहे, पुढे जायचं आहे,… ठरवलेले ध्येय गाठायच आहे. पुढे जाताना गवसलेली ही आपली माणसे, आपल्या जवळची ही माणसेच नसतील तर…यशाचे शिखर गाठल्यावर  मिळालेले यश साजरे करायला, तोंडभरुन कौतुक करायला, शाबासकी म्हणून पाठीवर थाप द्यायला जवळ आपले असे कुणीतरी हवे ना…. आयुष्य खरंच खुप सुंदर आहे.
कायमची आपल्याशी बांधता आली पाहिजेत. आपल्या मनापासून त्यांच्या मनापर्यंत. शरीरावरच्या जखमा दिसतात हो, मनावरच्या दिसत नाहीत एवढंच.

उत्तरार्धात मागे वळून पाहताना पुढे येणाऱ्या प्रत्येक टप्यावर दिसली पाहिजेत हीच ती सुंदर माणसे…तुमच्या पाठीशी वटवृक्षासारखी अगदी खंबीर उभी, सुंदर, निखळ, हसऱ्या चेहऱ्याची.
सच लिखा है लिखा है ‘गुलजार’जी ने…

…वो फिर नही आते…
असे हे किशोर कुमार यांनी गायलेले सुंदरसे गीत…
“ वो फिर नही आते…”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -