कोकणी बाणा – सतीश पाटणकर
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सातेरीची मंदिरे सर्वाधिक असून त्यातील काही मंदिरांमध्ये वारुळाबरोबरच देवी म्हणून मूर्तीची देखील पूजा केली जाते. कोकणात वारुळ आणि सातेरी देवस्थान असे समीकरण दिसून येते. सातेरी देवी ही नागकन्या असल्याने कोकणात सातेरी देवीच्या मंदिरात मोठी वारुळे आढळतात. वेंगुर्ला तालुक्यातील मातोंडच्या सातेरी माऊलीची लोटांगणाची जत्रा प्रसिद्ध आहे. कार्तिक शुद्ध पौर्णिमेला होणाऱ्या वार्षिकोत्सवाच्या दिवशी मंदिराभोवती सातेरीला नवस करणारे भाविक लोटांगण घालतात, अशी प्रथा आहे. या दिवशी मंदिरात सकाळपासून नवस फेडणे, ओटी भरणे आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सायंकाळी गावकर मंडळी व अन्य मानकऱ्यांच्या उपस्थित तरंगकाठीसहित उत्सव मूर्त्या मंदिरात वाजत-गाजत आणल्या जातात. यानंतर दीपमाळ पणत्यांची सजवली जाते. रात्री लोटांगण पाठोपाठ देवी सातेरीची पालखी निघते. लोटांगण कार्यक्रमानंतर गावातील स्थानिक दशावतारी यांचा नाट्यप्रयोग संपन्न होतो. देवीच्या उत्सवाचे नयनरम्य क्षण डोळ्यांत साठवून भाविक आपल्या घरी परततात. या मंदिराच्या गाभाऱ्यात वारूळ आहे. आदिशक्ती आदिमाया देवीची विविध रूपे आपल्याला पाहायला मिळतात. अशाचप्रकारे दक्षिण कोकणातील स्वयंभू व जागृत देवस्थान म्हणून वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड गावच्या श्री देवी सातेरीची ख्याती आहे. वारूळ रूपात प्रकट झालेल्या या आदिशक्तीचा जत्रोत्सव म्हणजे भक्तांसाठी पर्वणीच असते.
श्री देवी सातेरी हे मातोंड गावचे प्रमुख देवस्थान आई सातेरीच्या मायेच्या सावलीत वाढलेल्या व श्री देव घोडेमुख, रवळनाथ यांच्या कृपाशीर्वादाने पावन झालेला निसर्गसंपन्न मातोंड गाव. श्री देवी सातेरीचा दक्षिण कोकणातील जागृत देवस्थान म्हणून लौकिक आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक राज्यातील असंख्य भाविक या देवीच्या दर्शनासाठी हजेरी लावतात. देवीची मूर्ती ही स्वयंभू आहे.
कोकण म्हटले की, आपल्या तिकडच्या नारळाच्या बागा, हापूस आंबे, फणस, त्याचबरोबर तिथले समुद्रकिनारे इत्यादी आठवतात. याच कोकणच्या भूमीला परशुरामाची भूमी असे संबोधले जाते. पण याच कोकणात अनेक देवींची पण जागृत देवस्थाने आहेत आणि अशा प्रत्येक देवस्थानांची काही ना काही कथा आणि त्याच्यामागे इतिहास देखील आहे. जर तुम्ही कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भटकंती करीत असाल आणि एखाद्या मंदिरामध्ये जर वारुळ दिसले, तर आश्चर्यचकित नका होऊ. ती वारुळे नुसती वारुळे नसून, मंदिराचाच अविभाज्य भाग, म्हणजेच देवी आहे. देवीचे वास्तव्य त्या वारुळात आहे. या गावात देवीची प्रकट होण्याची आख्यायिका ही प्रसिद्ध आहे. फार वर्षांपूर्वी गावाच्या मध्यावर असलेल्या मंदिर परिसरात दाट राई होती. या राईत असलेल्या वारूळावर येथील एका गावकऱ्याची गाय जाऊन रोज पान्हा सोडत असे. हा प्रकार लक्षात आल्यावर येथील अन्य गावकऱ्यांच्या कानावर त्यांनी ही बाब घातली. मग त्या राईत शोध घेतला असता या ठिकाणी देवीचे वास्तव्य असल्याचे लक्षात आले. याठिकाणी नियमित पूजाअर्चा सुरू झाली. काही दिवसांनी याठिकाणी छोटे मंदिर उभे राहिले. आज श्री देवी सातेरीचे भव्य देवालय थाटात उभे आहे.
सातेरी पंचायतन देवस्थानात सातेरी मंदिर प्रमुख असून बारापाचाच्या राठीचे मेळेकरी, भूतनाथ व पावणाई अशी तरंगकाठी सातेरी मंदिरात असतात. कोकणात वारुळ आणि सातेरी देवस्थान असे समीकरण दिसून येते. सातेरी देवी ही नागकन्या असल्याने कोकणात सातेरी देवीच्या मंदिरात मोठी वारुळे आढळतात. या वारूळ महिम्यावर एक टाकलेला प्रकाशझोत. काय आहेत ती वारूळ? आणि मंदिरांच्या आतमध्ये कशी काय आहेत वारुळे? लोक त्या वारुळाची पूजा का करतात? त्याचाच शोध आपण या लेखाच्या माध्यमातून घेणार आहोत. अशी एक-दोन नाही तर तब्बल ७९ मंदिरे सातेरी नावाने सिंधुदुर्गात आहेत.
लोकसंस्कृतीमध्ये सुरुवातीला ग्रामदेवता आकाराला आल्यानंतर त्यांच्या पूजेचे विधी अस्तित्वात आले आणि त्यानंतर हे विधी कुणी व का, कशासाठी करावेत, याची कारणे म्हणून त्या संदर्भातील कहाण्या, आख्यायिका, कथा निर्माण झाल्या, असे मिथकशास्त्र सांगते. अशा प्रकारच्या कथा देवतेच्या महात्म्यासोबतच स्थानाचे महात्म्यदेखील वाढवताना दिसतात. कोकणात देवतांसमोर घातल्या जाणाऱ्या गाऱ्हाण्यामध्ये अनादिकालापासून चालत आलेला मार्ग असेल त्याप्रमाणे कार्य घडवून घे, अशी केली जाणारी विनवणी देवतांच्या प्राचीनत्वाविषयी सहज सांगून जाते. बारा पाचांचा संाप्रदाय, वेताळ, सातेरी, रवळनाथ वगैरे ग्रामदेवता तसेच तरंग किंवा खांब ही कोकणाची ओळख प्राचीन काळापासून होती. त्याच्या मूळच्या स्वरूपात, आचारात कालपरत्वे भर पडत जाऊन त्यांना आजचे रूप प्राप्त झाले आहे. किंबहुना इथल्या देवतांचे मूळ हे वसाहतींइतकेच प्राचीन असल्याचे मत पु. रा. बेहेरे यांनी व्यक्त केलेले आहे.
देवीच्या कौलाने गावातील सर्व धार्मिक विधी व सलाबात मार्ग पार पडतात. श्री देव घोडेमुख, रवळनाथ, रामेश्वर, गिरोबा, बामणादेवी, वेतोबा आदी देवस्थाने या परिवारात येतात. कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला अर्थात त्रिपुरारी पौर्णिमेला सातेरीचा जत्रौत्सव साजरा होतो.
(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)