Saturday, May 10, 2025

मनोरंजनताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Big Boss Marathi : 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनने रचला इतिहास!

Big Boss Marathi : 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनने रचला इतिहास!

मुंबई : तो आला... अन् त्यानं जिंकलं, असं म्हटलं की डोळ्यासमोर एकच चेहरा येतो तो म्हणजे 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनचा होस्ट आणि महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार रितेश देशमुख. 'बिग बॉस मराठी'चं नवं पर्व रितेश देशमुख होस्ट करणार असल्याची घोषणा झाल्यापासून चाहते नव्या सीझनबद्दल खूप उत्सुक होते. 'बिग बॉस मराठी'च्या (Big Boss Marathi) ग्रँड प्रीमियरचा मंच रितेश भाऊने (Riteish Deshmukh) दणाणून सोडला. त्याची स्टाईल 'बिग बॉस' प्रेमींच्या चांगलीच पसंतीस उतरली. टीआरपी रेटिंगवर होत असलेल्या वर्षावाने याची कबुली दिली आहे.


'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनने इतिहास रचला आहे. मराठी मनोरंजनाचा बॉस असणाऱ्या या कार्यक्रमाच्या 'भाऊच्या धक्क्या'ने या आठवड्यात 3.2 TVR मिळवत टीआरपीचे सर्व रेकॉर्ड्स तोडले आहेत. शाळा, कॉलेज, ट्रेन, भाजीमार्केट कुठेही जा सर्वत्र फक्त 'बिग बॉस मराठी' आणि रितेश भाऊच्या कमाल होस्टिंगची चर्चा होताना दिसत आहे. या नव्या सीझनच्या ग्रँड प्रीमियरने आतापर्यंतचा रेकॉर्ड ब्रेक करत 2.4 TVR मिळवला आहे. वीकेंडचं सरासरी रेटिंग 2.8 TVR आहे. संपूर्ण महाराष्ट्राला 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनचं वेड लागल्याचे हे पुरावे आहेत.


'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमधील 'भाऊचा धक्का' रितेश देशमुख चांगलाच गाजवत आहे. 'भाऊच्या धक्क्या'वर सदस्यांची शाळा घेणं असो, आठवड्याभरातील सदस्यांच्या वागणुकीवर त्याने घेतलेली हजेरी असो किंवा आपल्या हटके स्टाईलने सदस्यांचं भरभरून केलेलं कौतुक असो...या साऱ्याच गोष्टी 'बिग बॉस मराठी'चा प्रेक्षकवर्ग वाढवण्यात कारणीभूत ठरत आहेत. एक भाऊचा धक्का संपल्यावर दुसऱ्या भाऊच्या धक्क्यावर काय होणार याची 'बिग बॉस'प्रेमींमध्ये असणारी उत्सुकता हेच या नव्या सीझनच्या यशाचं गुपित आहे. नव्या सीझनमधील नावीन्य आणि तरुणपण प्रेक्षकांना जास्त आकर्षित करत आहे.


'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनच्या यशाबद्दल बोलताना रितेश देशमुख म्हणाला, "बिग बॉस मराठी'च्या यशामध्ये आपल्या प्रेक्षकांचा सगळ्यात मोठा वाटा आहे. रेटिंगचा चढता आलेख पाहणं खूपच सकारात्मक आणि प्रेरणादायी आहे. भाऊच्या धक्क्यासह सर्वच एपिसोडवर महाराष्ट्रभरातील प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. आम्ही संपूर्ण महाराष्ट्राचे ऋणी आहोत. मला ही संधी दिल्याबद्दल कलर्स मराठी वाहिनीचे मी खूप आभारी आहे".

Comments
Add Comment