प्रासंगिक – संतोष वायंगणकर
महाराष्ट्रात तसे म्हटले तर सर्वच सण अतिशय उत्साहाने साजरे करतात, मग तो कोणताही सण असो, यात महाराष्ट्रातील कोकणप्रांत तर फारच वेगळा. निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेले सृष्टीचे रूप विधात्याने या कोकणाला दिले आहे. कोकणाची कोणालाही भुरळ पडावी, प्रेमात पडावे असे हे कोकण आहे. जूनपासून साधारणपणे डिसेंबरपर्यंत कोकण हिरव्या शालूने नटलेले असते. कोकणात एक वेगळेच वातावरण आणि डोळ्यांना सुखावणारा, आनंद देणारा माहोल असतो. श्रावण महिना सुरू झाला की, एकापाठोपाठ एक असे सर्व मराठी सण रांग लावून उभे असतात.
कोकणातील माणसांनी, महाराष्ट्रातील राजकारण्यांनी खेकड्याची उपमा दिली असली तरीही इथल्या माणसांमध्ये सणांच्या बाबतीत अमाप उत्साह असतो. सर्वसाधारणपणे महाराष्ट्रातील इतर प्रांतात गोडधोड आजच्या जमान्यातील स्वीट डिश म्हणून पुरणपोळीचा बेत करतात; परंतु कोकणातील प्रत्येक सणाला वेगवेगळ्या पदार्थांची रेलचेल असते. तांदळाची खीर, पातोळे, रस शेवया, खंटोळी, मोदक, रस घावणे, आंबोळी काळ्या वाटण्याची उसळ, आणि वाटाण्याचे सांबार आणि वडे केव्हा कोणत्या सणाला बनवायचे याचं सणांप्रमाणे कोकणातील कुटुंबात मेन्यूकार्ड ठरलेले असते.
ज्याला जे शक्य असेल ते करण्याचा प्रयत्न प्रत्येक घरात केला जातो. कोकणात सण साजरा करण्यात कोकणातील माणसांचा हात कोणी धरू शकणार नाही. इतर वेळी जमिनीच्या एक फूटभर जागेवरून न्यायालयात वर्षानुवर्ष एका दुसऱ्यासमोर केस लढवणारा कोकणी माणूस गणेशोत्सवात किंवा श्रावणातील सोमवारी गावाच्या मंदिरातील भाजनांमध्ये त्याच न्यायालयीन लढणाऱ्या शेजाऱ्यासोबत मांडीला मांडी लावून बसलेला दिसला, तर कुणाला आश्चर्य वाटण्याचे कारण नाही, इतकी कोकणातील माणसे सणांच्या बाबतीत उत्साही असतात. कोकणातील नारळी पौर्णिमा सण गावोगावी त्यांच्या त्यांच्या चालीरीती पद्धतीप्रमाणे साजरा केला जातो. कोकणातील सणांचेही एक वैशिष्ट आहे. कोकणातील त्या त्या भागाची जशी एक बोली भाषा आहे त्या बोलीभाषेलाही एक वेगळा टच आहे. तसेच सण साजरा करतानाही त्यात प्रत्येक भागातील वैशिष्ट्यपूर्णतेने सण साजरे होतात. कोकणातील विशेषतः कोकणच्या किनारपट्टीवर नारळी पौर्णिमा उत्साहाने साजरी केली जाते. रक्षाबंधन म्हणजे बहिणीने भावाच्या हाती रक्षेचा एक धागा बांधणे. नारळी पौर्णिमेच्या दिवशीच रक्षाबंधनाचा सणही असतो. नारळी पौर्णिमेला कोकणात किनारपट्टीवर मच्छीमार बांधव-भगिनी समुद्राला नारळ अर्पण करतात आणि समुद्राला नारळ अर्पण करून देवाला गाऱ्हाणेही सांगतात की, आमचे रक्षण कर. दरवर्षी शासकीय नियमाने १ ऑगस्टपासून मासेमारीचा हंगाम जरी सुरू झालेला असला तरीही खऱ्या अर्थाने कोकणातील मासेमारीला नारळी पौर्णिमेपासूनच सुरुवात होते. नारळी पौर्णिमेला मासेमारी करणाऱ्यांकडून समुद्राला नारळ अर्पण करण्याची प्रथा-परंपरा आहे. अगदी शिवकालीन विचार केला तरीही कोकणातील मालवणमधील सिंधुदुर्ग किनाऱ्यावरून समुद्रात नारळ अर्पण करण्याची पद्धत होती. त्याकाळी सोन्याचा नारळ समुद्राला अर्पण करण्याची रित होती असे म्हणतात. मालवणच्या सिंधुदुर्ग किनाऱ्यावरून समुद्राला नारळ अर्पण केल्यावर त्यानंतर किनारपट्टीवरील लोक समुद्राला नारळ अर्पण करतात.
रत्नागिरी जिल्ह्यातही समुद्राला नारळ अर्पण केला जातो. रत्नागिरीच्या पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली नारळी पौर्णिमेला सवाद्य मिरवणुकीने नारळ अर्पण करण्याची परंपरा आहे. रायगड जिल्ह्यातही नारळी पौर्णिमेला किनारपट्टी भागात समुद्राला नारळ अर्पण करण्याचीच पद्धत आहे. कोकणात एकीकडे परंपरागत पद्धतीने श्रद्धापूर्वक नारळी पौर्णिमेचा हा उत्सव साजरा केला जात असताना गेल्या काही वर्षांत जसा अनेक सणांचा आता ‘इव्हेंट’ होऊ लागलाय तसेच काहीसे स्वरूप या नारळी पौर्णिमा उत्सवाला देखील येऊ लागले आहे. नारळ वाढवण्याच्या स्पर्धा आता होत आहेत. शहरी भागात नारळ वाढवण्याच्या स्पर्धा असायच्या अर्थात पूर्वी त्याचे स्वरूप हे दोन-पाच नारळ वाढवण्यापर्यंत असायचे. आता मात्र सर्वाधिक नारळ वाढवणाऱ्या व्यक्तीला लाखाचे बक्षीसही दिले जात आहे. या नारळी पौर्णिमेला महिलांच्या मिरवणुकाही निघत आहेत. महिला मिरवणुकीने जाऊन समुद्राला, त्या त्या भागातील नद्यांनाही नारळ अर्पण केले जातात. काही भागांत रिक्षाचालकही मिरवणुकीने त्यांच्या भागात असणाऱ्या नदी किंवा समुद्राला नारळ अर्पण करतात. कोकणातील काही भागांत नारळांची मिरवणूक काढण्यात येते. नदी किंवा समुद्राला नारळ अर्पण करण्याची प्रथा-परंपरा आहे.
आता त्याचे स्वरूप फारच बदलत चालले आहे. या नारळी पौर्णिमेला कोकणात ओले खोबरे, साखर आणि तांदूळ एकत्र करून हा नारळीभात बनवला जातो. नारळी पौर्णिमेच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधण्याचा एक कौटुंबिक सोहळा, तर सर्वच कुटुंबातून होत असतो. कोकणात काही भागांत नारळी पौर्णिमा आणखी काही वैशिष्ट्यांनी साजरी केली जाते. दापोली पाजपांढरी येथे तेथील महिलांचा पुरुषांचा एकाच रंगातील पेहराव असतो. त्या पेहरावात तिथे मिरवणुकीने नारळ अर्पण केला जातो. समुद्र वर्षभर किनारपट्टीवरील मासेमारी करणाऱ्यांना सांभाळतो, अशी एक मनभावना असल्याने श्रावण महिना सुरू झाला की, शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला समुद्राचे पाणी घरी आणून त्याचे मनोभावे पूजन केले जाते. नारळी पौर्णिमेच्या दिवशी सागरपुत्र समुद्राला नारळ अर्पण करत समुद्राचे आणलेले ते पाणी विसर्जित केले जाते. कोकणातील अनेक भागांमध्ये समुद्राचे पूजन केले जाते. स्वाध्याय परिवारामध्ये या पद्धतीने नारळी पौर्णिमा सण साजरा केला जातो.
कोकणातील लोकं सण कोणताही असला तरीही तो त्याच उत्साहाने साजरा करतात. ऋण काढून सण साजरा करणारा कोकणी माणूस आपल्यातील उत्साहीपणा तसूभरही कमी होऊ न देता सण साजरा करून आपला आणि कुटुंबाचाही आनंद द्विगुणित करीत असतो.