माेरपीस – पूजा काळे
आपल्या कलांनी घायाळ करणाऱ्या सुपरमूनच्या अदा काळोख्या रातीला स्वप्नाचे मोहोळ उठवतात. या नभीचा रंग बिलोरी, वेड लावी सुधांशुचे. शब्दसुरांच्या छेडित ताना, उघडते द्वार माझिया मनाचे. दिवाकर पांगेस्तोवर धीर नसतो या जीवाला. शशांकाचे अलवार अवकाशी येणे म्हणजे रोमरोम संचारणे. माझ्या मनाचे पिंपळपान कधीच देऊन बसलेयं मी त्याला. पण वाट पाहण्याची सजा, सहन होण्यापलीकडे जाते, तेव्हा मात्र मन घट्टू होतं. तो येणार ठाऊक असलं तरी, “बावरा मन देखने चला इक सपना.! बावरे मन की हैं, बावरी सी आशा ऽऽऽऽ.” आशा पल्लवित झाल्यानंतरची अवस्था म्हणजे, जीवन फूल गुलबकावलीवर प्रेमाचा मधाळ रस पाझरण्याची वेळ. त्याला पाहताचं, चौफेर पसरत जाणाऱ्या पांढऱ्या शुभ्र रंगात पहुडायला, त्याची नशा झेलायला तयार होते मी. रजनीनाथाच्या प्रेमात पडलेली मी एक चंद्रकला. मोहिनी घालणाऱ्या त्याच्या विविध छटा कायम आकर्षित करतात मला. मनाचं प्रतीक असलेल्या ग्रहमाला जवळच्या सर्वात जवळील चंद्राला प्रेमाचं ते काय उणं..! हे राजसा ऐक ना..! मला तुझ्या सभोवार चांदण्यांचं बीज पेरायचंय. तुझ्याकडून टोपलीभर चांदणं उसनं मिळावं अशी इच्छा प्रदर्शित करते.” चांदण्यांचे कोष माझ्या प्रियकराला पोचवा, हे सुरांनो चंद्र व्हा… हे सुरांनो चंद्र व्हा… या गाण्यातली विवषता तू समजू शकत नाहीस? “मी गात मारवा चांदण्यापरी झुरते, त्या ढगात काळ्या छुप्या साजणा तुज चोरून पाहते. तू येना, ये सखया, हे प्रियतमा त्या वाटेवरती राया, मी शाल बहु प्रेमफुलाची पांघरते. “हे कुमुदबांधव, हे इन्दूं, हे चंद्रमा, हे सुधांशु माझी कोणतीचं हाक तुला ऐकू येत नाहीए का…? रोहिणी नक्षत्रासारखी पूर्तता करण्यास मी आतूरलीयं, हे देखील तुला कळत नाहीए…!
प्रेमात पडलेल्यांना प्रेम हवे असते तसे, प्रेमाला पारखे झालेल्यांना सुद्धा ते हवे असते. तू उधार घेतलेल्या प्रकाशात गुंडाळलेले कोडे आहे. तू चंद्रमा अन् मी रात्र चांदण्यावाणी आहे. तू सगळ्यांचा लाडका आहेस. लहानग्यांचा बालदोस्त, बडबड गीतातला चांदोबा, अंगाई गीतातला चंदामामा. घास भरवायचा आईचा हट्ट काही केल्या संपत नाही. तर तुला पाहिल्याशिवाय छोटं बाळ देखील तोंडात घास घेत नाही. कालचक्र सृष्टीचे जुने तेथे नवीन येते, होई पानगळ येई बहर, बालपण निघून जाते. तुला पहाता-पहाता घास भरवता बालपण निघून जाते. मनावर अधिवास करणाऱ्या हे राजकुमारा तू प्रेमाचं प्रतीक आहेस. थकवा, एकाकीपणा, अपरिचित प्रेम या साऱ्यांचा कर्ता, करविता तू आहेस. तुझ्या प्रकाशाचा प्रभाव शांत आहे, जो थकलेल्या मनाला शांतता देतो. नम्रतेने क्रोध व्यक्त करतोस तेव्हा महासागराला भरती आणण्याची अफाट शक्ती शांततेनं दर्शवतोस. प्रेम प्रकाश आणि अंधार या जीवनाच्या छटा, ज्या कधी स्थिर राहणार नाहीत. तुझे बदलणारे आकार जीवन बदलाचे प्रतीक आहेत जे मनावर शिक्कामोर्तब करतात. काजळतीट लावत, मूर्त भावना अधोरेखित करण्याची तुझी पद्धत जीवाला वेड लावणारी आहे. चंद्र आहे साक्षीला म्हणत, प्रेमी युगुलांवर जादू करणारी तुझी अदा, कलेकलेने वाढणारं तुझं सौंदर्य, घायाळ, कातिल कातिल करत मला. प्रत्येकाला तुझी आसक्ती लागलीयं. तुझी स्वप्न पाहत, तरुणांनी बागडावं, हातात हात घेत, रम्य संध्याकाळी सुख स्वप्नांची झोळी भरून घ्यावी. तुझ्या वचनावर एकमेकांशी बांधिल राहावं. आणाभाकांच्या शपथा तडीस न्याव्या, इतकं तुझं सामर्थ्य आहे. हजारो शब्दफुले अर्पण करत राजरोसपणे तुझ्यावर कविता कराव्यात त्या कवींनी. कवितेंची गाणी व्हावीत. तुझ्यावर बेतलेल्या गाण्यात नायिका होरपळताना पाहिली की, रागे रागे राग भरतो. ह्या सगळ्यांना सगळे अधिकार आणि मला मात्र दुरावा सोळाकला अधिष्ठाता, शारद शशांक चंदेरी. पृथ्वीशी सलगी करे, निशा झाली ग् बावरी. इथं निशेलाही बावरी होऊन व्यक्त होता येतयं आणि मी मात्र उपेक्षित! प्रतिबिंबित हिमांशू लख्ख प्रकाशून येई, प्रीत मिलना संगे मधुक्षीर हाती घेई. मधू मिलनाचा एवढा ही अधिकार मला नाही का रे…? डोळे तुझ्या वाटेवर लागलेत.”रूप माझे चंद्रमोळी चांदण्यात भटकते. ही आभासी दुनिया डोळे भरून पहाते. कधी कविता होऊन येते, कधी मर्मबंध गाते, वाटेतल्या तुझ्या, एका चौकात मी राहाते. आता निक्षून सांगते बरं…! मी जाईन दूर नजरेच्या पल्याड. शोधूनही सापडणार नाही बघ. किनारे पिंजून काढलेसं तरी हाती यायची नाही मी. हा सज्जड दम आहे तुला.” वाट पाहण्याची आस लांबली, सुखांनाही झळ लागली, हजार वेळा दर्शन घेऊनी, तव भेटीची क्षृधा न शमली. लपाछपीचा खेळ संसारात गोडी आणतो. जी गोडी आपण अनुभवत आहोत बरीच वर्षे. तुझ्याशिवाय मी अपूर्ण. माझ्याशिवाय तूही अपूर्ण. ढग भरून आलेल्या आकाशात कितीही लपलास तरी माझी शोधक नजर वेध घेईल तुझा. “चांद छुपा बादलमे ढगात लपून परीक्षा पाहू नको आमची. तुझं पूर्ण रूप पाहायला सगळे अधिर आहेत. उद्याचा सागर उधाणलेला असेल. भेटीगाठीची लगबग सुरू होईल. एक धागा बंधनाचा तुझ्या साक्षीने मंगलमय पावेल. “यह मोह मोह के धागे..
धागे मनाचे, धागे प्रेमाचे, धागे बंधनाचे. धाग्यात बांधलेला सारा संसार उघडेल
नात्याचे द्वार.”
आचार, विचार, संस्कार या धाग्याला गुंफून फुलांची एक सुंदर चादर विणली तर नंदनवन पसरेल. त्या नंदनवनात आपली वीण घट्ट रूतेल. एकमेकांच्या प्रेमापोटी हे रंगीत धागे बांधले जातील, यातच आपल्या प्रेमाची
जीत आहे.
सख्या, मावळतीला भाग्यश्री तुझी आतुरतेने वाट पाहतेय. दिवस मावळून रात्र धरेला आपल्या कवेत घेण्यासाठी अधीर झालीय. दुखरे कोपरे बाजूला सारत, पवित्र नात्याच्या मंडपात नैराश्य सारत ये. प्रवासातील सहप्रवासी चांदण्यांसोबत धरेला आनंद देत, भावना बदलाच्या झोपाळ्यावर झुलवत ये. नभांगणी रूप आलं, पुनवेत धुंद न्हाल. उजळल्या दशदिशा, स्वर्ग-दार खुल झालं. रास-रंग चांदण्यांचा फिक्या तिथं तारकाही विझवून सारे दिवे आसमंती शशी राही.