गणेश मंडळांसाठी समन्वय अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येणार
पुणे : गणेशोत्सवात (Ganeshotsav) होणारी कोंडी हटविण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते मदत करणार आहेत. मंडळाचे कार्यकर्ते वाहतूक स्वयंसेवकांच्या भूमिका बजाविणार आहेत. पुणे पोलिसांच्या परिमंडळ एककडून गणेशोत्सव कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत विविध मंडळांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल यावेळी उपस्थित होते.
उत्सवाच्या कालावधीत राज्यासह, देशाच्या वेगवेगळ्या भागातून भाविक मध्यभागात गर्दी करतात. भाविकांची होणारी गर्दी, तसेच वाहतूक नियोजन करण्यासाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी पोलीस उपायुक्त गिल यांनी संवाद साधला. मंडळाचे कार्यकर्त्यांनी उत्सव कालावधीत वाहतूक नियोजन करण्यासाठी पोलिसांना सहाय करावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त गिल यांनी बैठकीत केले. त्यानुसार विविध मंडळांच्या कार्यकर्ते वाहतूक नियोजनासाठी सहाय्य करणार आहेत.
उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांकडून विविध यंत्रणांशी समन्वय साधण्यात येणार आहे. महावितरणशी संपर्क साधण्यात आला आहे. विद्युत तारांची देखभाल ठेवण्यात यावी, तसेच लटकणाऱ्या विद्युत तारा व्यवस्थित कराव्यात, अशा सूचना देण्यात आल्या. गणेश मंडळे, ढोल पथक, पोलीस, स्वयंसेवक यांच्यात समन्वय असणे गरजेचे असल्याचे पोलीस उपायुक्त गिल यांनी नमूद केले. अनेक गणेश मंडळांसाठी समन्वय अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येणार असल्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले.
ढोल पथकांमधील सदस्यांची संख्या निश्चित
गेल्या वर्षी मंडळाच्या मिरवणुकीत ढोल पथकात ५० ढोल आणि १० ताशा अशी संख्या निश्चित करण्यात आली होती. मिरवणुकीत पथकांची संख्या मर्यादित ठेवावी, अशी सूचना करण्यात आली.