निसर्गवेद – डॉ. महालक्ष्मी वानखेडकर
या विश्वातील या अद्भुत जीवसृष्टीत विविध प्रकारचे सृजनात्मक असे जीव आहेत. त्यातीलच कीटक हासुद्धा एक. आपण सध्या या लेखांमधून ॲमेझॉनच्या शृंखलेत आहोत. मागील लेखात आपण वृक्ष, वनस्पती, आदिवासी जमाती पाहिल्यात. आज आपण ॲमेझॉनमधील कीटकांच्या राज्यात जाऊया. सूक्ष्म जीवांपासून ते अजस्त्र कीटकांपर्यंत कोण जाणे किती प्रजाती या जंगलात असतील. येथे एवढ्या प्रकारच्या अविश्वसनीय कीटकांच्या प्रजाती आहेत की, त्यांची नक्की संख्या आपल्याला समजू शकत नाही. अॅमेझॉनच्या खोऱ्यात २.५ दशलक्ष कीटकांच्या प्रजाती असाव्यात असा अंदाज आहे. वातावरण पूरकतेमुळे कीटकांची संख्या ही जास्त असणारच. येथे जगातील अनेक शोधकर्ता, जीवशास्त्र तज्ज्ञ, पर्यटक यांच्या भेटी सतत देत असतात. साओ पाउलो या विश्वविद्यालयाचे शोधकर्ता यांच्या मते ४०० मिलियन वर्षापूर्वीपासून या कीटकांचे इथे वास्तव्य आहे आणि यांनी इथे सर्व वातावरण संतुलित करण्यात फार मोठा हातभार लावला आहे.
दिसायला आकर्षक पण प्रत्येकाची जगण्याची पद्धत वेगळी. वर्षावणांची रचना ही चार स्तरांमध्ये असते. उदयोन्मुख, छत, अंडरस्टोरी आणि फॉरेस्ट फ्लोर. त्यामुळे कीटकसुद्धा त्यांना पूरक अशा भागातच राहतात. जास्तीत जास्त म्हणजे ६० टक्के कीटक छत या स्तरांमध्ये राहतात. अगदी जमिनीपासून ते आकाशापर्यंत विविध प्रकारच्या कीटक रचनांची येथे भरमसाा रेलचेलच आहे. खरंतर ॲमेझॉन जंगल या कीटकांसाठी एक पर्वणीच आहे. काही विषारी तर काही बिनविषारी,आश्चर्यकारक, आक्रमक, अविश्वसनीय, रहस्यमय, सौंदर्यपूर्ण, रंगीबेरंगी आणि गूढ. कीटक, किडे, फुलपाखरे, मुंग्या, मच्छर, कोळी, भुंगे, माशा यांच्या अनेक प्रजाती येथे आहेत. पान कीटक म्हणजे झाडांवर बसणारे आणि पानांवर बसणारे विविध प्रकारचे कीटक आहेत. डान्सिंग ज्वेल डैम्सेल्फाई, हत्ती भुंगा, विशाल मुंगी, गोलियथ बिटल इ. कीटकांच्या जीवन क्रमात अंडी, लारवा किंवा आणि मग वयस्कर असे भाग असतात. कीटकांना दोन सोंड, दोन ते सहा पाय, पंख आणि शरीराचे तीन भाग-सेंटीपीड, मिलीपिड, माइटस असतात हे आपल्या सर्वांना माहीतच आहे.
माझ्या निरीक्षणानुसार फक्त जंगलातीलच हे कीटक स्वतःसारख्या दिसत नसलेल्या वनस्पतींवर सुद्धा बसू शकतात. कारण या जंगलात हे सुरक्षितच असतात. जिथे त्यांना स्वतःच्या असुरक्षिततेची जाणीव होते तिथेच ते त्यांच्यासारख्या दिसणाऱ्या वनस्पतींवर, फुलांवर, दगडांवर, फळांवर बसतात. तसे तर बारा महिने एकच वातावरण, हवामान या वर्षावनाचे असले तरी विविध प्रकारचे दमट वातावरणाचे, दलदलीचे असे अनेक भाग पाहायला मिळतात. तरीही थोड्याफार फरकाने त्या वातावरणानुसारच ढळणारी कीटक रचना येथे निर्मित आहे. प्रत्येकाचे आयुर्मान वेगळे कारण नैसर्गिक जीवन चक्रसाखळी. कीटक जास्तीत जास्त झाडांची पाने खातात. येथे बाराही महिने गर्द वृक्षवल्ली फुललेलीच असते. त्यामुळे कायमच यांना खाद्य मिळत असते आणि तेही पौष्टिक. येथे जास्तीत जास्त फुलपाखरे आणि मुंग्यांची संख्या आढळून येते.
पूर्वीच्या लेखात पारदर्शक, धुमकेतू, अजस्त्र (जायंट) फुलपाखरे आणि बुलेट, झोंबी मुंग्या इत्यादींची विविध माहिती दिलेली होती. येथील फुलपाखरे तर इतक्या विविध पद्धतीची असतात की, त्यांच्यासाठी शब्दच नाहीत. झाडांच्या खोडांसारखी, दगडांसारखी, तंतूंसारखी, फुलांच्या परागांसारखी, सुकलेल्या पानांसारखी, फुलांसारखी, अक्षरशः चिखलात बसली तर तीही दिसत नाहीत. फुलपाखरू या चिखलांमध्ये, दलदलीमध्ये सुद्धा (आपल्या रंगाच्या विरुद्ध असणारी) दलदल असली तरी पण ही किती सहज निर्धास्थपणे वावरताना दिसतात. झुंडीच्या झुंडी झाडांवर बसून पान खातात, फुलांमधील मध पितात. मग एक गोष्ट लक्षात आली की, ही फुलपाखरे या चिखलात असणारी खनिज द्रव्ये, सूक्ष्मजीव आणि लार्वा झुंडीने टिपत असतात. एक अतिशय सुंदर फुलपाखराचीच प्रजाती फ्लेनेल माॅथ. याची अळी मुलायम पिवळ्या फरची. पण हिच्या सौंदर्याला बळी पडायचे नाही कारण तिला स्पर्श जरा जरी झाला तरी हिच्या फरमध्ये असणारे विषारी काटे आपला रंग दाखवायला लागतात. म्हणजेच आपल्या अंगातील एखादे हाड तुटल्यासारख्या वेदना शरीरात व्हायला लागतात. या अळ्यांच्या फर अतिशय आकर्षक, मुलायम, नक्षीयुक्त, रंगीबेरंगी असे दिसतात.
या वर्षावनात बारा महिने डास नसतात. काही विशिष्ट वेळेतच यांची उत्पत्ती होते. ज्या वनस्पतींवर कीटक बसत नाही अशा वनस्पतींचे रंग, रस आदिवासी शरीराला लावतात. ज्यामुळे कीटकांपासून त्यांचे संरक्षण होते. एनोफिलीस डार्लिंगी हा मलेरिया वाहक डास आहे. ब्राझीलमध्ये यांच्या ६१ प्रजाती आहेत. ॲमेझॉनमध्ये जंगलतोडीमुळे डास वाढायला लागलेत याचे कारण आधीच ते वर्षावन त्यात दलदलीचा भाग. साहजिकच डासांच्या प्रजाती वाढण्यास पोषक. एडीज एजिप्टी या मच्छरांमुळे डेंग्यू होतो आणि हे शहरात सुद्धा आढळतात. ॲमेझॉनमधील सर्व डास रोगवाहक नाहीत तरी पण त्यांच्यामुळे डेंग्यू, मलेरिया चिकनगुनिया, पिवळा ताप, झिका असे आजार होतात.
येथील अनेक प्रकारच्या कीटकांमध्ये नाकतोडे सुद्धा खूप आहेत. त्यात डार्क ड्रॅगन फ्लाईट जो ऑस्ट्रेलिया जवळील जंगलात आढळतो. निळ्या चमकत्या रंगाचा काळ्या अंगाचा हा नाकतोडा. यांच्या दोन शक्तिशाली पंखांद्वारे हे ५० किलोमीटर प्रति तास उडू शकतात. नाकतोडा हा मच्छर आणि लार्वा खात असल्यामुळे मलेरिया,फ्लूसारखे आजार नियंत्रण करण्याचे खूप मोठे कार्य करतो. हा जेमतेम चार ते सहा सेंटीमीटरचा लहान नाकतोडा आहे. वॉकिंग स्टिक हा न चावणारा असा कायम झाडांवर दिसतो. पक्षी, सरपटणारे प्राणी (सरडे, पाल) कोळी काही माकडांसारखे प्राणी यांचे हे खाद्य आहे.
बुलेट मुंग्या या अमेरिकेच्या वर्षावनामध्ये छताच्या स्तरात जास्त आढळतात. बुलेट मुंग्यांचा आक्रमक हल्ला माणूस सुद्धा सहन करू शकत नाही. हत्यारा बग कीटक मुंग्यांची शिकार करण्याच्या आधी मृत मुंग्यांनी स्वतःला झाकून घेऊन लपून राहतो. आसपास मुंग्या आल्यास त्यातून बाहेर येऊन लगेच तो त्यांची शिकार करतो. भुंग्यांमधील एक उपजाती टायटन बिटल. हा जगातील सर्वात मोठा कीटक आहे. प्रभावशाली आकार असणारा. याची लांबी साडेसहा इंचापर्यंत असू शकते.
सडलेले लाकूड खाणारा, हानिकारक नसणारा असा. टायटन बीटल हे विद्युत रोषणाईला आकर्षित होतात. त्यामुळे त्यांना रात्रीच पकडले जाते. मेलेले प्राणी आणि सडलेली झाडे हे खातात. म्हणजेच पर्यावरण संतुलन करण्यात मोठा हातभार लावतात. पूर्वी येथे असंख्य शेणखडे होते. शिंगे असलेला शेणखिडा हा स्वतःच्या हजार पटीने वजन खेचू शकतो. २०१६ मध्ये “अल निनो” या महाघटनेमुळे ७.४ मिलियन एकर जंगलात वणवा पेटला. त्यात शेणकिड्यांची संख्या १४.००० वरून ३.७०० वर आली. लाँग हाॅर्न बीटल यांच्या डोक्यावर अँटिनासारख्या मोठ्या दोन सोंड असतात तर कैनोपी भुंगे हे फक्त फुलांच्या झाडांवर दिसतात. हे भुंगे पराग कण विखुरण्याचे कार्य खूप मोठ्या प्रमाणात करतात. निसर्गाची अद्भुतरचना आपले कार्य अगदी चोखपणे बजावते.
dr.mahalaxmiwankhedkar @gmail.com