प्रतिभारंग – प्रा. प्रतिभा सराफ
माझे भाषण चालू झाले, आणि मध्येच मला व्यासपीठावर कुजबुज ऐकू आली. हळूहळू ती वाढत गेली आणि अगदी एकमेकांच्या हातावर टाळ्या देऊन जोरात हसण्यापर्यंत ती गेली. मी माझे भाषण थांबवले. त्यामुळे पोडियमवरील माईकमध्ये बोलणाऱ्या त्या दोघांचे आवाज व्यवस्थित जाऊन, ते समोर बसलेल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचले. आपलाच आवाज स्पीकरमधून ऐकू आल्यासारखे त्यांना जाणवले आणि त्यांनी समोर पाहिले. संपूर्ण सभागृह त्यांच्याकडे पाहत होते. ते दोन दिग्गज साहित्यिक एकदम शांत झाले, आणि समोर पाहू लागले. मी त्यांच्याकडे पाहिले आणि मी त्यांना विचारले, “मी आपले अर्ध्या तासांचे भाषण शांतपणे ऐकले. मला फक्त तीन मिनिटे बोलायचे आहे, बोलू का?”
दोघेही स्तब्ध. तरीही त्यातल्या एकाने पाचही बोटांना वरच्या बाजूला हलवून ‘बोला’ असा इशारा केला. व्यासपीठावर माझ्याआधी आणखी चार जण बोलून गेले होते. त्यांनाही त्यांच्या भाषणाच्या वेळेस, या दोघांच्या बोलण्याचा त्रास होत होता. त्यांचा आवाज बोलणाऱ्यांच्या आवाजाबरोबर माईकमधून प्रेक्षकांपर्यंतही जात होता, पण ते काहीच बोलले नाहीत. त्यामुळे या दोघांनी आपले बोलणे चालूच ठेवले होते. माझ्या कृतीमुळे त्या चौघांनाही मनापासून आनंद झाला, असे त्यांनी मला कार्यक्रम संपल्यावर आवर्जून सांगितले.
हा एक छोटासा प्रसंग. पण या प्रसंगावरून मला कार्यक्रमाच्या संदर्भात खूप काही महत्त्वाचे सांगायचे आहे. जेव्हा निवेदक किंवा सूत्रसंचालक एखाद्याची ओळख करून देत असतो, तेव्हा व्यासपीठावरील माणसांचा काहीतरी टाईमपास चालला आहे असेच जणू वाटते आणि ते आपापली कामे करत राहतात, म्हणजे आपसात बोलणे किंवा मोबाईलवर बोलणे किंवा मेसेजेस टाकणे. निवेदक हा खूपदा अतिशय कमी महत्त्वाचा समजला जातो. त्याच्याकडे काही सांगण्यासारखे आहे, ते ऐकण्यासारखे त्यांना वाटत नाही.
खूपदा तर निवेदकाला कोणताही वक्ता सहज आपल्यापर्यंत बोलवतो आणि तो आपल्या जागेवरून उठून त्यांच्यापर्यंत गेल्यावर, हा वक्ता कधी स्वतःची ओळख, कधी त्याचे भाषण आधी किंवा नंतर घ्यायचे किंवा आणखी काहीतरी सांगतो. कार्यक्रमाचा क्रम लिहिलेला कागद निवेदकाच्या हातात असतो आणि मग त्याच्यात बदल करताना त्याची फरफट होते. क्वचितच एखादी गोष्ट महत्त्वाची असू शकते. तेव्हा कागदावर लिहून तो कागद निवेदकापर्यंत पोहोचवला तर चालूही शकते. परंतु संपूर्ण दोन-तीन तासाच्या कार्यक्रमात सातत्याने निवेदकाला सूचना देणे, हे निवेदकाला त्रासदायक होऊ शकते आणि समोरच्या रसिक प्रेक्षकांनाही कार्यक्रमात व्यत्यय आल्यासारखा वाटतो,कारण बोलणाऱ्या व्यक्तीपेक्षा,या कृतीकडे सहज लक्ष जाते. अचानक कोणी दिग्गज सभागृहात आला, तर निवेदकाला त्याचे नाव सांगून त्याचे स्वागत करायला सांगितले जाते. तो व्यक्ती सामाजिक क्षेत्र, राजकीय क्षेत्र वा ज्यांचा कार्यक्रम आहे, त्यांच्यासाठी महत्त्वाचा असू शकतो, निवेदकाच्या ओळखीचा असतोच असे नाही. कधी अचानक सांगितलेल्या नावामुळे निवेदकाकडून, नाव उच्चारताना एखाद्या शब्दाचा उच्चार चुकू शकतो. म्हणजे उदाहरणच द्यायचे म्हणून सांगते. त्या व्यक्तीचे नाव पेंढरकर असते. ‘पेंढरकर’ हे नाव खूप कॉमन नाव नाही त्यामुळे निवेदक त्या व्यक्तीचा उल्लेख ‘पेंढारकर’ असा करू शकतो. इथपर्यंत ठीक आहे परंतु सभागृहातून हा कोणी पेंढारकर असतो तो उभे राहून सांगतो की माझे नाव पेंढारकर नसून पेंढरकर आहे किंवा खूपदा ज्या व्यासपीठावरच्या व्यक्तीने त्याचे नाव निवेदकाला सांगितलेले असते, तो समोरचा माईक घेऊन नावाचा उच्चार चुकीचा झाल्याचे सभागृहाला सांगतो. अशा वेळेस निवेदक अस्वस्थ होऊ शकतो. मग याला पर्याय काय? एकतर व्यवस्थित कागदावर लिहून त्या व्यक्तीचे नाव देणे किंवा मग आयोजकानेच त्या व्यक्तीचे नाव घेऊन त्याचे स्वागत करणे.
निवेदकाकडून नजरचुकीने, एखाद्या माणसाच्या नावाचा किंवा आडनावाचा उल्लेख चुकला असेल तरी त्या व्यक्तीने भाषणाच्या सुरुवातीला, नमस्कार वगैरे करतानाच स्वतःचे नाव व्यवस्थित सांगावे आणि भाषण करावे. उगाचच ‘या व्यक्तीने माझ्या नावाचा हा उच्चार केला’, असे सांगून भाषणास सुरुवात करू नये असे मला तरी वाटते.
कोणत्याही गोष्टीचे काही अलिखित नियम असतात. ते कोणी कोणाला सांगत नाहीत पण ते पाळले गेले पाहिजे. अलीकडे अनेक कारणास्तव अनेक साहित्यिकांना ‘दीपप्रज्वलन’ करणे आवडत नाही. त्याची वेगवेगळी कारणे आहेत. त्याच्या खोलात मी जात नाही, तर दीपप्रज्वलन हा कार्यक्रमाचा भाग असेल का, हे आधीच विचारून वक्त्याने कार्यक्रम घ्यायचा की नाही ते ठरवावे. तिथे दीपप्रज्वलन चालू असताना भाग न घेणे किंवा ज्या कार्यक्रमासाठी आपल्याला जो विषय दिला आहे तो सोडून,‘दीपप्रज्वलन कसे बरोबर नाही’, याबद्दल उलटेसुलटे बोलून वेळ घालवणे उचित नाही. काही साहित्यिक ‘मी पुष्पगुच्छाचा स्वीकार करत नाही’, हे आधीच सांगतात. काही साहित्यिक ‘मला कोणतीही भेटवस्तू वा मोमेंटो नको’, हे आधीच सांगतात. ‘मला इतकं मानधन हवं’, हेही आधीच ठरवतात. या सगळ्या अटी आयोजकांना मान्य असतील तर त्यांनी, त्यांना बोलवावे. कोणत्याही कार्यक्रमासाठी बोलावलेल्या वक्त्यांनी/ पाहुण्यांनी या सगळ्या अटी आधी ठरवलेल्या नसतील, तर त्याविषयी आपल्या भाषणात बोलू नये, असे मला वाटते. कार्यक्रमाची वेळ ठरलेली असते. कधी कधी काही तासांसाठी आपण सभागृह घेतलेले असते. त्यामुळे आयोजकांनी आधीच त्यांच्या वक्त्यांना सूचित केलेले असते. अशा वेळेस प्रत्येकाने आपल्याला दिलेल्या भाषणाची वेळ पाळावी,जेणेकरून आयोजकांना त्रास होणार नाही किंवा आपल्यानंतर बोलणाऱ्या वक्त्यांना त्यांच्या भाषणासाठी योग्य वेळ मिळेल!
लिहिण्यासारखे खूप आहे परंतु कुठेतरी थांबायला हवे. शिवाय मी हे जे काही लिहिले आहे ते मला काय वाटते याविषयी लिहिलेले आहे हे गृहीत धरून वाचावे, इतकेच!
यातून काही चांगला बोध घ्यायचा असेल तर तो त्यांनी निश्चितच घ्यावा, अशी या लेखाद्वारे मी अपेक्षा बाळगते!
pratibha.saraph@ gmail.com