सिंधुदुर्ग : नुकतेच आपण ७७ वा स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा केला. एकीकडे असा जल्लोष साजरा होत असताना दुसरीकडे कोलकातामध्ये एका महिला डॉक्टरवर अत्याचार होऊन तिची हत्या करण्यात आल्याची दुर्दैवी घटना घडली. या हत्याकांडाबाबत देशभरात तीव्र संताप पसरला असून आरोपींना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी केली जात आहे. याप्रकरणी अनेक ठिकाणी निषेध मोर्चे आणि रॅली काढून निषेध केला जात आहे. तसेच आज कुडाळमधील बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था आणि विविध डॉक्टर्स संघटनांच्या माध्यमातून कुडाळ पोलीस ठाण्यावर निषेध रॅली काढण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, कुडाळची बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था आणि डॉक्टरांच्या विविध संघटना यांनी एकत्र येत या अमानवी घटनेविरोधात कुडाळ शहरात निषेध रॅली काढली. कुडाळमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा इथून या रॅलीला सुरुवात झाली. ‘गुन्हेगारांना फाशी द्या, नो सेफ्टी नो ड्युटी’ अशा अनेक घोषणांनी विद्यार्थी आणि डॉक्टर्सनी आसमंत दणाणून सोडला. ही रॅली कुडाळच्या मुख्य रस्त्यावरून थेट कुडाळ पोलीस ठाण्यात आली. त्या ठिकाणी सुद्धा घोषणाबाजी करण्यात आली. त्याचबरोबर अमानवीय अशा या कृत्याबद्दल दोषींना फाशीची शिक्षा दिली नाही आणि डॉक्टरांवरचे हल्ले असेच सुरु राहिले तर मात्र आम्हाला स्टेथोस्कोप खाली ठेवावे लागतील, असा इशारा डॉक्टर्स आणि वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिला.
दरम्यान, कोलकाता मध्ये जे घडलं ते अमानवीय होते. माणुसकीला काळीमा फासणारे होते. त्यामुळे महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्याला जोपर्यंत फाशी होत नाही तो पर्यंत हा लढा सनदशीर मार्गाने चालू राहणार आहे, असाच सूर या निषेध रॅलीतून उमटत होता. तसेच दोषींना लवकरात फाशीची शिक्षा देऊन पीडितेला न्याय द्यावा, अशा आशयाचे निवेदन यावेळी पोलिसांना देण्यात आले.