ओंजळ – पल्लवी अष्टेकर
कधी-कधी अडाणी, अशिक्षित, लौकिकदृष्ट्या पुस्तकी शिक्षण न घेतलेले लोक आपल्याला आयुष्यात खूप काही चांगले शिकण्याची, करण्याची प्रेरणा देतात. गेली तीस वर्षे काबाडकष्ट करून, कुठल्याही प्रकारचा दिखावा न करता आपल्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सावरणाऱ्या शारदाताईंचे मला विशेष कौतुक वाटते. आपल्या लहान-सहान दुःखांनी सुद्धा माणूस कासावीस होतो. पण खरोखरच कुटुंबाचा आधार हरवलेला, पैशांची चणचण, पतीचा लवकर मृत्यू अशा परिस्थितीतून शारदाताईंनी स्वतःला सावरत, कुटुंबाला उभे केले.
शारदाताई मुळच्या रत्नागिरी येथील. लग्नानंतर त्या मुंबईत आल्या. त्यांना दोन भाऊ आहेत. शारदाताईंची आई लवकर देवाघरी गेल्यामुळे त्यांच्या आईच्या आई-वडिलांनी त्यांच्यावर प्रेमाची पाखर घातली. चांगले संस्कार केले. त्याकाळाच्या मानाने त्यांचे लग्न लवकर झाले. शारदाताईंना दोन मुली व एक मुलगा.
शारदाताईंचा मुलगा चौथीत असताना त्यांच्या पतीचे निधन झाले. तसे शारदाताईंवर जणू आभाळच कोसळले. आता आपल्या पोराबाळांसाठी पैसे कमवून आणण्याची जबाबदारी शारदाताईंवर पडली. त्यांचे शिक्षण फारसे नसल्यामुळे धुण्याभांड्याची, स्वयंपाकाची कामे करण्याशिवाय पर्यायच नव्हता. गेली तीस वर्षे सातत्याने त्या हे कष्ट उपसत आहेत.
माझ्या मावशीकडे कांदिवलीला त्या गेली तीस वर्षे घरकामाला आहेत. कामाचा त्यांना कंटाळा नाही. अनेकदा स्वतः हून त्या घरातील काही कामे करतात. याशिवाय त्या वयस्क, आजारी लोकांची सेवा करण्यास हसतमुखाने तयार असतात. सध्या त्या अशा शंभर वय असलेल्या आजीची सेवा करतात. त्यांची आन्हिक उरकून देतात. चहा करतात.
शारदाताईंचे व्यक्तिमत्त्व प्रसन्न आहे. आपल्या कामांच्या ठिकाणी त्यांना प्रेमाचे, आपुलकीचे नाते निर्माण करायला आवडते. “माझी कामे आहेत, तर मला, माझ्या पोराबाळांना पोटाला मिळणार” या वृत्तीने शारदाताईंनी आपल्या कामांनाच परमेश्वर मानले आहे. यात शारदाताईंच्या स्वभावात स्वाभिमानाची चुणूक दिसून येते.
२०१३ मध्ये घडलेली एक घटना मला शारदाताईंनी सांगितली. त्यांचे पोट उजवीकडे सातत्याने दुखायचे. कधी-कधी त्यांना या कळांनी सुचेनासे व्हायचे. एके दिवशी सकाळी माझ्या मावशीकडे त्या कामाला आलेल्या असताना, पोटाच्या वेदना सहन न झाल्याने त्या अतिशय अस्वस्थ झाल्या. तेव्हा मावशी व तिचा मुलगा डॉ. कौस्तुभ यांनी शारदाताईंना शांत करून झोपवले. त्यांना दूध प्यायला दिले व थोडा वेळ विश्रांती देऊन-सोनोग्राफी व एम.आर.आय. साठी त्यांना घेऊन ते मेडिकल सेंटरमध्ये गेले. त्यावेळी शारदाताईंचे वजन केवळ पंचवीस किलो इतकेच होते.
डाॅ. कौस्तुभ यांनी शारदाताईंचे पोटाच्या टी.बी.चे निदान केले व त्यांच्यावर उपचार सुरू केले. ‘विद्या ताम्हाणे यांच्या कुटुंबाचे प्रेम, वेळेला मदतीचा दिलेला हात मी कधी विसरू शकणार नाही’, असे शारदाताई म्हणतात.
शारदाताईंना तीन महिने सक्तीची विश्रांती घेणे जरूरीचे होते. तेव्हा त्या जिथे जिथे काम करायच्या, तिथल्या सर्व कुटुंबीयांनी शारदाताईंना सहकार्य केले. त्या बऱ्या होऊन पुन्हा कामावर रूजू झाल्या. या मोठ्या आजारातून शारदाताई जिद्दीने सावरल्या.
“व्यवस्थित निदान झाल्यामुळे मला जणू पुनर्जन्मच मिळाला” असे शारदाताई म्हणतात. सध्या सकाळी साडेसात ते रात्री दहा वाजेपर्यंत त्या वेगवेगळ्या घरांमध्ये राबतात. आपल्या घरातील कामे करताना आपण अनेकदा थकतो, मग दिवसा अंदाजे सात-आठ घरातील कामे करत असताना शारदाताईंना किती काबाडकष्ट करावे लागत असतील?
दर माघी गणपती उत्सवात शारदाताई एकवीस उकडीचे मोदक हौसेने ताम्हाणे कुटुंबाकडे आणून देतात. त्यांचा मुलगा आपली उपजीविका, बांधकाम व्यवसायात कामे करून सांभाळतो, त्यांच्या दोन मुली आपल्या सासरघरी सुखाने नांदताना पाहून शारदाताईंना समाधान वाटते.
पै-पै साठवून, निर्धाराने, कष्टाने आपल्या संसारासाठी उभ्या राहिलेल्या शारदाताईंचे कर्तृत्व नक्कीच कमी नाही. पण त्यात कुठेही प्रसिद्धीची हाव अथवा ‘मी’ पणाचा मोठेपणा नाही.
आपल्या नातवंडांना मनापासून सांभाळायचे, त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलायचा व त्यासाठी जमेल तितकी कामे चालू ठेवायची अशा विचारांनी शारदाताई आपली दैनंदिन कामे सांभाळून व इतर घरांमधील कामेही करतात. त्यांच्याकडून जिद्द, चिकाटी, परिस्थितीशी मिळते-जुळते घेण्याची अफाट क्षमता या गोष्टी शिकायला मिळतात. स्वतःचे ब्युटी पार्लर अतिशय आवडीने, आत्मविश्वासाने चालविणाऱ्या सीमा सापळे यांच्याशी माझ्या मनसोक्त गप्पा झाल्या. सीमाताईंचा जन्म मुंबईतला व बालपण कोकणात गेले. त्यांचा विवाह वयाच्या २३ व्या वर्षी झाला. त्यांच्या पतीची नोकरी सुरुवातीला खाजगी होती. अगोदर त्यांचे मामे सासरे व सासूबाई त्यांच्यासोबत राहायचे.
सीमा यांना सारखे वाटायचे की,“घरी बसून काय करायचे?” उद्योग-व्यवसाय करण्याची जिद्द त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. मग विचार करून त्यांनी ‘ब्युटीपार्लर’मध्ये आपले करिअर करायचे ठरविले. त्यांच्या पतींचा त्यांना या कामासाठी पूर्ण पाठिंबा मिळाला. मग सीमाताईंनी मागे वळून पाहिलेच नाही. त्यांनी तीन वर्षे माया परांजपे यांच्याकडे ब्युटीपार्लरचे शिक्षण घेतले. त्यांचे मृदू बोलणे, ब्युटीपार्लरमधील टापटीप, स्वच्छता, आपल्या कामाविषयी आस्था व चोखपणा यातून त्यांच्या व्यवसायाचा आवाका वाढत गेला. त्यांनी आपल्या घरातच हा व्यवसाय सुरू केला. या कामाचा त्यांना गेली १९ वर्षे अनुभव आहे. दर महिन्याला त्यांच्या ब्युटीपार्लरमध्ये अंदाजे पन्नास ते साठ महिला येतात. सीमाताईंच्या घरी त्यांच्या सासूबाई व आई असतात. त्यांच्या पतींचा त्यांना या व्यवसायासाठी पूर्ण पाठिंबा आहे. सीमाताईंच्या आई त्यांना घरकामात भरपूर मदत करतात, त्यामुळे त्यांना आपल्या व्यवसायाकडे व्यवस्थित लक्ष देता येते.
“नोकरी करणाऱ्या महिला असोत किंवा सणसमारंभ असोत वा घरगुती कार्यक्रम. महिला, तरुणी माझ्या पार्लरमध्ये येतात”, असे सीमाताई म्हणतात.
गणेशोत्सवाच्या वेळेस तर सीमाताई सोळा-सतरा तास ब्युटीपार्लरच्या कामात व्यस्त असतात. तेव्हा त्यांचे पार्लर रात्री एक वाजेपर्यंत चालू असते. नववधू ते आजी अशा वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यातील स्त्रियांचे मेकअपही त्या करतात. त्या हर्बल, आयुर्वेदिक प्राॅडक्टस स्वतः खरेदी करतात.
मुख्य म्हणजे त्यांना आपल्या पार्लरची जाहिरात कधी करावी लागली नाही. याला कारणीभूत सीमाताईंची आपल्या कामावरील निष्ठा आहे. त्यांच्या हाताखाली त्यांनी कुणाला मदतीला घेतलेले नाही. या व्यवसायात काम करणाऱ्या तरुणींबाबत एक महत्त्वपूर्ण संदेश सीमाताई देऊ इच्छितात.
“प्रामाणिक राहा, प्रेम करा, घाबरू नका. यश आपोआप तुमच्याकडे येईल.”
“अर्थार्जन हा माझा मूळ हेतू नसला तरी कामातून मिळणारे समाधान व कुटुंबासाठी मी अर्थार्जन करू शकते, हा आत्मविश्वास मला माझ्या कामातून मिळतो.” असे त्या म्हणतात.
तात्पुरत्या समस्यांनी स्त्रियांनी खचून न जाता मानसिक उभारी ठेवल्यास त्या विविध उद्योग-व्यवसायात सक्षमपणे काम करू शकतात. माणसे जोडण्याची कला व आपल्या कामाप्रती निष्ठा सीमाताईंकडे असल्यामुळे त्यांच्या फ्लॅट बाहेर ब्युटीपार्लरची पाटीही नाही. शारदाताई व सीमाताई यांच्या जिद्दीला माझे मनोमन नमन.