सांस्कृतिक समृद्धीची गरज

  109

मायभाषा - डॉ. वीणा सानेकर


'ऋचा’ या अनियतकालिकांचा कवी अरुण कोलटकर विशेषांक, या अंकाचे एक संपादक रमेश पानसे यांनी माझ्या हाती ठेवला, तो निश्चितच माझ्याकरिता अविस्मरणीय क्षण होता. या एका बिंदूतून मग मनात विचारांची आवर्तने
सुरू झाली.


मराठीतील अनियतकालिकांची चळवळ १९६० मध्ये उभी राहिली. हा प्रस्थापित वाड्.मयीन सत्तेला एक जोरदार धक्का होता. या अनियतकालिकांनी साहित्यविश्वात चौकटीबाहेरचा नि नवा विचार करणारे लेखक, संपादक, वाचक घडवले. ही चळवळ उभी राहिली तशी विझलीही!


अनियतकालिके असोत वा नियतकालिके यांनी मराठीत एक सकस वाड्.मयीन वातावरण निर्माण करण्यास मोलाचे योगदान दिले.


नियमित कालावधीनंतर प्रकाशित होणाऱ्या नियतकालिकांची वाट पाहणारा, त्या त्या नियतकालिकांचा वाचकवर्ग होता. १९३५ नंतरच्या काळात नि आजतागायत विविध विषयांना वाहिलेली नियतकालिके प्रकाशित झाली. अस्मितादर्श, नवभारत, समाजप्रबोधनपत्रिका, आलोचना, अनुष्टुभ, ललित, अभिधा, ऐवजी, खेळ, मुक्त शब्द, शब्दरूची, परिवर्तनाचा वाटसरू, साधना अशा विविध नियतकालिकांनी स्वत:चा वाचकवर्ग निर्माण केला.


१९९० नंतर आपण सर्वदूर समाजात फार मोठे बदल अनुभवत आहोत. भौतिक समृद्धीचा टोकाचा अट्टहास हे या काळाचे फार मोठे वैशिष्ट्य होय. या अट्टहासाची अनेक रूपे आहेत. मॉल्स, हॉटेलिंग, रिसॉर्ट, खरेदी एक ना दोन. माणसांच्या वस्तू झाल्या नि वस्तूंनी आयुष्यच ताब्यात घेतले.


अभौतिक व सांस्कृतिक समृद्धीचा आपल्याला जणू काही विसर पडला. सांस्कृतिक खुणांचा मागोवा घेताना वाड्.मयीन नियतकालिके व अनियतकालिकांना वगळता येत नाही. पण आज बंद पडत चाललेल्या मराठी शाळांना जसा वाली उरलेला नाही तसा बंद पडण्याच्या मार्गावरील नियतकालिकांचे कुणाला फारसे सोयरसुतक नाही. बंद पडलेल्या नियतकालिकांकरिता अस्वस्थ झालेली माणसेही आता संपत चालली. सांस्कृतिक समृद्धी ही समाजाची खरी ओळख असते हेही समाज विसरत चालला आहे.


वास्तविक प्रत्येक घरात एक तरी नियतकालिक प्रत्येक महिन्याला यायला हवे, पण त्याकरिता वाचक या नात्याने त्याचे वर्गणीदार वाढायला हवेत. सहजगत्या घरात पिझ्झा मागवला जातो, या किमतीत वर्षभराच्या एखाद्या नियतकालिकाची वर्गणी सहज मावते, पण हा खर्च मराठी माणसाला निरर्थक वाटतो की काय? एका तरी मासिकाची, नियतकालिकाची वर्गणी भरणे, महिन्याला एक मराठी पुस्तक विकत घेणे हे आपल्याला शक्य आहे. त्याची मराठी माणूस म्हणून आतून गरज वाटेल, तो सुदिन!


तूर्तास पुन्हा एकदा ‘ शिक्षणवेध’सारखे अत्यंत गुणवत्तापूर्ण मासिक नव्या रूपात १५ ऑगस्ट २०२४ रोजी वाचकांसमोर आले आहे, याचा अत्यानंद आहे.

Comments
Add Comment

बिहारची “वुमन इलेक्ट्रिशियन” सीता देवी

दी लेडी बॉस : अर्चना सोंडे ही गोष्ट म्हटली तर तशी छोटी पण डोंगराएवढी आहे. ज्या राज्यात आजही महिला पदराआड असतात.

महाराष्ट्रात हक्क मराठीचा!

मायभाषा : डॉ. वीणा सानेकर मराठी भाषा अभिजात आहे म्हणून समाजरूपी ‘कपाटात ती शोभेच्या वस्तूसारखी बंद करून ठेवणार

आणीबाणीचा धडा...

स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर तत्कालीन पंतप्रधान व काँग्रेस पक्षाच्या सर्वोच्च नेत्या इंदिरा गांधींनी देशावर

सुरांचा राजहंस!

मायभाषा : डॉ. वीणा सानेकर काल जागतिक संगीत दिन होता. संगीत निसर्गात ओतप्रोत भरलेले आहे. सृजनशीलतेच्या खुणा

सौंदर्य ब्रँड फॉरेस्ट इसेन्शियल्सलच्या संस्थापिका

दी लेडी बॉस : अर्चना सोंडे वयाच्या २० व्या वर्षी लग्न, ते लग्न फसणं, एकल पालक बनून मुलांना वाढवणं अशा आयुष्याच्या

मदन मंजिरी

माेरपीस : पूजा काळे संस्कृतमधील ‘सुंदर’ हा शब्द मराठी भाषेत आकर्षक, मनमोहक अर्थाने वापरला जातो. भाषेतल्या