Friday, March 21, 2025
Homeसाप्ताहिककोलाजमन करा रे प्रसन्न...

मन करा रे प्रसन्न…

विशेष – लता गुठे

मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण!” असे संत तुकाराम महाराज म्हणतात. मन कशासाठी प्रसन्न ठेवायचे? याचे उत्तर संतांच्या भाषेत द्यायचे झाल्यास…
मनाचे संकल्प पावतील सिद्धी।।
जरी राहे बुद्धी तयाचे ठायी।।

आपले मन म्हणजे एक कल्पवृक्षच आहे. जसा एखादा वाटसरू कल्पवृक्षाच्या खाली बसून इच्छा प्रकट करतो आणि त्याची इच्छा पूर्ण होते. तसेच आपण जे विचार करतो ते सकारात्मक किंवा नकारात्मक विचार असतात. सकारात्मक विचार यशाकडे घेऊन जातात आणि नकारात्मक विचार अपयशाकडे. यश मिळाले की, आनंद होतो, सुखाची अनुभूती होते आणि अपयश मिळाले की, दुःख होते आणि या दोन्हीही क्रिया मनाच्या ठिकाणी घडतात. सुख मिळाले की, मन प्रसन्न होते. त्या प्रसन्न मनामध्ये चांगले सकस विचार जन्म घेतात. म्हणून जाणीवपूर्वक आपल्या विचारांची दिशा ही सकारात्मक असायला हवी याची काळजी आपणच घेऊ शकतो. आपले मन म्हणजे विधात्याने निर्माण केलेली अशी विलक्षण गोष्ट आहे की, ज्यामध्ये आपल्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचे सामर्थ्य आहे.

आता मन हे कुठे आहे? ते कसे आहे? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करूया. मनाच्या स्वरूपाचा विचार करताना ज्ञानेश्वरांनी मनाला सहावे इंद्रिय असे म्हटले आहे. मन अतिशय सर्जनशील, सृजनशील, प्रतिभा संपन्न असल्यामुळे त्यामध्ये नवनिर्मितीची क्षमता असते. आपण केलेल्या सर्व गोष्टींना ते साक्ष असते. मन हा आपल्या शरीराचा सारथी आहे. सुरत कितीही चांगला असेल आणि जर सारथी कुशल नसेल तर रस्ता भटकण्याची शक्यता जास्त असते. त्याला जे विचार आपण देतो त्या विचाराप्रमाणे ते वागते.

सोप्या भाषेत सांगायचे तर खूप विचार केला की, आपले डोके दुखायला लागते किंवा जास्त टेन्शन आले, तर विचार थांबतात. मनावर एखादा आघात झाला, तर आपण शून्य अवस्था अनुभवतो, तेव्हा आपण म्हणतो मन बधीर झाले. म्हणजेच सुखदुःखाची अनुभूती ज्या ठिकाणी होते ते ठिकाण म्हणजे मन. मनाचा संबंध हा मेंदूशी असला पाहिजे असे म्हणता येईल.

मन आहे तरी कसे? जेव्हा याचा विचार आपण करतो त्यावेळेला बहिणाबाई चौधरी यांच्या मन कवितेतील ओळी आठवतात…
मन पाखरू पाखरू
त्याची काय सांगू मात ?
आता व्हतं भुईवर,
गेलं गेलं आभायात!

असे हे मन पाखरासारखे चंचल आहे. क्षणात जमिनीवर तर, क्षणात आकाशात जाणारे ते दिसत नाहीत, पकडता येत नाही, तरीही ते आहे. अशा मनाचा विचार अनेक शास्त्रज्ञांनी केला आहे. कारण संवेदनाची जाणीव प्रत्येकालाच होते.
सतराव्या शतकात फ्रेंच तत्त्वज्ञ रेने देकार्त याने प्रथम मनाविषयी सुसंगत मांडणी केली. त्याला आज ‘माइंड बॉडी प्रॉब्लेम’ असे म्हटले जाते. देतार्त हा द्वैतवादी होता म्हणजे मन आणि शरीर या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत असे त्याचे म्हणणे होते. विज्ञानाकडे जाणिवेचे कोणतेही स्पष्टीकरण नसल्याने या विषयाला अनेक शतके हात घातला गेला नाही. विसाव्या शतकात वर्तणूक शास्त्राचा विज्ञानावर पगडा होता; पण यातून मनाचा कोणताच थांगपत्ता लागत नव्हता. पुढे न्यूरो सायनचा व आधुनिक इमेजिंग तंत्राचा जन्म झाल्यानंतर मेंदूचा सखोल अभ्यास झाला. वेगवेगळे विचार, भावना, हरकती मेंदूत कुठे उगम पावतात याची सखोल माहिती मिळाली. मनाचा संबंध आपल्या वर्तणुकीशी आहे आणि ती वर्तणूक विचारांवर अवलंबून असते. विचार हे मनात जन्म घेतात.

मी नेहमी म्हणते…‘विचार बदलला की, जगण्याची दिशा बदलते आणि दिशा बदलली की, जीवनाची दशाच बदलून जाते.’ ज्यांच्या वाट्याला जास्त दुःख येते तोच सुखाचा शोध घेतो. सुखाचा शोध घेताना अनेक वेदनेच्या पायघड्यांवरून चालावे लागते. माणूस विचार करायला लागतो. स्वतः चुका  शोधत अंतर्मुख होऊन तो स्वतःला प्रश्न विचारतो, तेव्हाच विचार बदलू शकतो. दुःखाचे कारण  शोधल्याशिवाय सुखाचा  शोध  घेता येणार नाही. असे अनेक संतांच्या व महान पुरुषांच्या चरित्रातून, आत्मचरित्रातून आपल्या लक्षात येते. तुकारामाचे अभंग आपल्याला खूप काही शिकवून जातात.
तुकाराम महाराजांच्या एका अभंगातील या दोन ओळी किती समर्पक आहेत पाहा…

शांति परते नाही  सुख ।
येर अवघेचि दुःख।।
मनःशांती हा खऱ्या  सुखाचा पाया आहे. मन अशांत असेल आणि आजूबाजूला कितीही  सुख सुविधा असतील तर ते सुख  मनाच्या अंतस्थापर्यंत जात नाही. गाडी, बंगला असेल, तर मुले चांगली निघत नाहीत. मुले चांगली असतील, तर गाडी, बंगला नसतो. कोणती ना कोणती कमी कायमच मनाला अशांत करते आणि तीच गोष्ट चिंता  निराशेचे कारण होते आणि  चिंता ही चित्तेसमान समजली जाते. दुःखात माणसांचे विचार खुंटतात. म्हणून जेव्हा दु:ख असते त्याचवेळी  सुख  हरवून  जाते. त्यामुळे आहे त्याच्यात समाधान मानायला शिकावे.  कायमस्वरूपी  सुख  त्यांच्याच  वाट्याला कसे येईल याचा विचार करायला हवा. कर्म करताना सजग असायला हवे. उदाहरणार्थ लिंबाच्या झाडाच्या बिया लावल्या, तर त्याला आंबे येणार नाहीत. आंबे येण्यासाठी आंब्याच्या कोया लावायला लागतील. हा निसर्गाचा इतका साधा नियम आहे; परंतु कर्म करताना आपण त्याचा विचारच करत नाही. याचे कारण म्हणजे मन हे कंट्रोलमध्ये नसते. त्यामुळे ते काही आपले ऐकत नाही. मन हे राजासारखे असावे; पण त्यावर विचारांचे नियंत्रण असले पाहिजे असे म्हणतात, कारण मन हे खट्याळ माकडासारखे आहे. मनाचा जेव्हा मी विचार केला त्या वेळेला खालील ओळी जन्माला आल्या…

मन‌ सैताना माकड
नाही त्याचा ठाव पत्ता
त्याला जाते शोधायला
देहावर त्याची सत्ता
असे हे मन सैतान माकडासारखे कुठे-कुठे भटकते, नाही-नाही ते विचार मनात येतात आणि तेच विचार निराशेला जन्म देतात.

अष्टांग योग साधनेमध्ये पतंजली यांनी मन आणि शरीर निरोगी राहण्यासाठी यम आणि नियम सांगितले आहेत. मुळात योगक्रियेचा अर्थच शरीर आणि मनाला जोडून घेतो तो योग. जोडून घेण्यासाठी प्राणायाम आणि योग असणे या दोन गोष्टी सांगितल्या आहेत.

तसेच विपश्यनेच्या माध्यमातून स्वतःचा शोध घेणे शक्य होते. हा शोध घेत असताना जाणीवपूर्वक विचारांना काबूत आणण्यासाठी प्रयत्न केला जातो. मनाला आपल्या कंट्रोलमध्ये ठेवायचे असेल तर जप, तप, ध्यान, धरणा या चार गोष्टींना जीवनात माणसाने स्थान दिले पाहिजे. जीवन जगता-जगता माणसाने जे भावले ते घ्यावे. चांगल्या गोष्टींचा सतत  शोध  घ्यायला हवा. माणसातला चांगूलपणा आपण टिपत राहावा त्यातून मानवी मूल्य आपोआप अंगीकारली जातात. मान्य आहे सुख  परिस्थितीवर अवलंबून असते. वास्तवाला सामोरे जाताना त्याकडे तटस्थ दृष्टीने पाहिले आणि आहे त्या परिस्थितीचा स्वीकार केला, तर जगणे जास्त सोपे होते, असा माझा अनुभव आहे. एक सकारात्मक विचार शंभर पावले पुढे घेऊन जातो; परंतु एक नकारात्मक विचार हजारो पावले मागे घेऊन जाईल.

अंधाराकडून प्रकाशाचा मार्ग  शोधणारी माणसे सदैव सकारात्मक ऊर्जेने जगतात. तीच ऊर्जा त्यांना आनंदाच्या दिशेने घेऊन जाते. यासाठी काही गोष्टी जाणूनबुजून आत्मसात केल्यास जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो त्यामध्ये पतंजलीची अष्टांग योग साधना, चांगली पुस्तके, मदर टेरेसा, बराक ओबामा,अब्दुल कलाम यांची आत्मचरित्र ही खऱ्या अर्थाने ऊर्जा स्रोत आहेत. त्यांची एक एक वाक्य विचार करायला लावतात. एका ठिकाणी मदर टेरेसा म्हणतात, “एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करताना मदतीच्या हाताबरोबर काळीजही द्यायला शिकले पाहिजे.” किती महत्त्वाचे आहे वाक्य… अशी वाक्ये विचार परिवर्तन करतात.

सकाळी एखादे आवडते गाणे, गझल्स किंवा भजन ऐकले की, ही ऊर्जा दिवसभर तुम्हाला चैतन्य देते. सकाळी सकाळी निसर्गाच्या सान्निध्यात जरा फेरफटका मारून आले, पक्ष्यांचा किलबिलाट ऐकला, रंगीत पान फुले सकाळच्या वाऱ्याची गार झुळूक या सर्व गोष्टीचा मनसोक्त आनंद घ्यायला शिकले पाहिजे. आनंदाचे सरोवर आपल्याभोवती निर्माण करायला खूप पैसा लागत नाही. फक्त जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला की, आपले मन प्रसन्न राहते. हीच तर खऱ्या जगण्याची गुरुकिल्ली आहे. आपण केलेल्या सर्व गोष्टींना मन हे साक्षी असते. म्हणूनच म्हणतात की, तुम्ही जगाला फसवू शकता, स्वत:ला कसे फसवणार? मन हे सर्व गोष्टींना साक्षी असते.

आपल्या नकळतपणे आपण अनेक नकारात्मक गोष्टी मनात कोंबत असतो. मनातल्या अनेक विकारांकडे आपण कधी सजगपणे पाहतच नाही. त्यामुळे मनातली जी सकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्यापर्यंत पोहोचत नाही. विकारांचा कचरा साफ केला तरच आपण मन प्रसन्न ठेवू शकतो आणि जर मन प्रसन्न ठेवले, तर ते आपल्या सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण करू शकते. जर इच्छा-आकांक्षा पूर्ण झाली, तर आनंदाचे सरोवर आपोआपच निर्माण होते.

सत्कर्म करून, तसेच गरजूंना मदत करून मानसिक  सुख  मिळते. ते जास्त महत्त्वाचे असते. जीवनातील आनंद नाहीसा होण्याआधी, सावध असायला हवे. कारण  सुख  आणि दुःख दोन्ही गोष्टी सतत बदलत असतात. कायमस्वरूपी काहीच नसते. तुकाराम महाराज परमेश्वराला सांगतात तसे आपणही सांगायला हवे…

देवा आता ऐसा करी उपकार ।
देहाचा विसर पाडी मज।।
तरीच हा जीव सुख पावे माझा ।
बरे केशी राजा कळो आले ।।
देहाचा विसर पडण्यासाठी बहुतेक लोक व्यसनाच्या आहारी जातात; परंतु या व्यसनामुळे जास्त नुकसान होते. ते टाळण्यासाठी संतांसारखे आपल्यासारख्या संसारी माणसाला अखंड हरिनाममध्ये मन गुंतवून व परमेश्वराचे निर्गुण निराकार रूपाचे दर्शन घेण्याचा ध्यास घेऊन चालणार नाही. त्यासाठी एक सोपा मार्ग आहे तो म्हणजे सावधपणे कर्म करून सत्कर्माची इंद्रियांना सवय लावली, तर बऱ्यापैकी आपण सुखाचे सरोवर निर्माण करू शकतो. यासाठी पतंजलीची योग साधना आणि मेडिटेशन या दोन्ही गोष्टी आत्मजागृतीसाठी फार सोप्या आणि चांगल्या आहेत. शेवटी जाता जाता माझ्या कवितेतील चार ओळी…

सुख  मागून मिळेना
दुःख जाळून सरेना
भोग भोगल्याशिवाय
हाती काहीच उरेना
असे जरी असले तरी मनाला प्रसन्न ठेवण्यासाठी जाणून बुजून विचारांना दिशा द्यावी लागते हेच खरे. म्हणूनच संतांनी म्हटलं असेल…
      मन करा रे प्रसन्न
        सर्व सिद्धीचे कारण !

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -