जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे निर्देश
अलिबाग : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना (Mazi Ladki Bahin Yojana) हा राज्य शासनाचा क्रांतिकारी निर्णय आहे. महिलांचे आरोग्य, पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. जिल्ह्यात या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही, यासाठी यंत्रणांनी दक्ष राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे (Kishan Jawale) यांनी शनिवारी येथे दिले.
या योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ होरायझन सभागृह अलिबाग येथे पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. योजनेच्या अंमलबजासाठी शासनाकडून निर्देश प्राप्त होताच तात्काळ जिल्ह्यातील विविध विभागांच्या बैठकीचे आयोजन करुन या योजनेची अंमलबजावणी करण्याच्या सुचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रामध्ये उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी पिवळे किंवा केसरी रेशनकार्ड हा पुरावा ग्राह्य धरावा अशी शासनाला विनंती केली होती. त्यानुसार या योजनेच्या लाभासाठी पिवळे किंवा केसरी रेशनकार्ड हा पुरावा ग्राह्य धरावा असा शासनाचा निर्णय झाला, तसेच अधिवास प्रमाणपत्राबाबतही शासनाने पंधरा वर्षांचा पुरावा ग्राह्य धरण्यात यावा हा चांगला मार्ग काढला. त्यामुळे ही योजना एकदम सोपी झाली आहे. अंगणवाडी सेविकेच्या हातात या योजनेचे काम दिले आहे.
जिल्ह्यात ही योजना विहीत वेळेत, अचूक पध्दतीने राबविली गेली ही अभिमानाची बाब आहे. पहिल्या दोन महिन्यांचे पैसे पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात पोहचले. योजनेच्या अंमलबजावणीत रायगड जिल्हा हा सर्वात पुढे होता. आशा वर्कर व अंगणवाडी सेविका शासनाचे कर्मचारी यांचे यात मोठे योगदान आहे. एक कोटीपेक्षा जास्त लोकांना लाभ देणारी ही योजना यशस्वीपणे राबविली गेली. या योजनेचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करावयाचे आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी तसेच आमदारांच्या हस्ते महिलांना प्रातिनिधिक स्वरुपात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. या जिल्हास्तरीय कार्यक्रमासाठी आमदार महेंद्र दळवी, माजी आमदार अनिकेत तटकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी सत्यजित बडे, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) रविंद्र शेळके, उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, तहसिलदार विक्रम पाटील, जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी विनित म्हात्रे, जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी जि.प.निर्मला कुचिक आदि उपस्थित यावेळी होते.
काय म्हणाले किशन जावळे?
जिल्ह्यात या योजनेसाठी ३ लाख ५२ हजार लाभार्थी महिला पात्र ठरल्या आहेत. अजून ९० हजार अर्ज पात्र करण्याचे काम सुरु आहे. जिल्ह्यात जवळजवळ साडेचार लाखाचा आकडा आपण नक्कीच पार करु. पात्र असलेली कुठलीच भगिनी या योजनेपासून वंचित राहणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी जिल्ह्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी व त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी पात्र महिलांसाठी मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना शासनाची क्रांतीकारी योजना आहे. ही योजना सर्व धर्मियांसाठी असून, सर्व समावेशक योजना आहे. ज्या माती-भगिनी अजूनही या योजनेचा लाभ मिळाला नाही, त्यांनाही या योजनेचा लाभा द्यावा असे सांगितले.
आमदार महेंद्र दळवी यांनी जिल्ह्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना लागू केल्याबद्दल राज्य शासनास मन:पूर्वक धन्यवाद देत महिलांच्या सर्वांगीण विकासाचा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून ही योजना तयार करण्यात आली आहे. हे राज्य शासन महिलांना आर्थिक व सामाजिकदृष्टया सक्षम करण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. राज्य शासनामार्फत महिलांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविण्यात येत असून, मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व माता-भगिनींना देण्यात यावा असेही ते म्हणाले.