श्रावणामध्ये होणाऱ्या मंगळागौरीचे हे व्रत आणि त्या आनुषंगाने होणारे मंगळागौरीचे खेळ म्हणजे, आपल्या संस्कृतीचा उत्सवच. त्याचबरोबर नात्यांचे बंध जपण्याचा अट्टहास आहे. हे सण म्हणजे आपल्या खाद्य संस्कृतीचा महोत्सव आणि बहरलेल्या निसर्गाचा समृद्ध आविष्कार आहेत.
विशेष लेख – प्रा. मीरा कुलकर्णी
के. जे. सोमैया कला आणि वाणिज्य महाविद्यालय, मुंबई
“हसरा नाचरा… जरासा लाजरा…
सुंदर साजिरा… श्रावण आला…”
अशा सुंदर गीतांच्या ओळी मनामध्ये रुंजी घालतात… भोवतालात हिरवागार निसर्ग, असतो… बालकवींच्या कवितेतला
“क्षणात येते सरसर शिरूनी
क्षणात फिरुनी ऊन पडे”
असा पाऊस असतो. मंदिरांमध्ये होणारे पूजापाठ… घंटानादांसह घुमणारे आरतीचे स्वर, वातावरणात मांगल्य निर्माण करतात. घराघरांत दारातल्या रांगोळीपासून ते देवघरातल्या फुले, पत्री, दुर्वा, आघाडा यांच्यासह दरदिवशी प्रथेप्रमाणे साजरी होणारी व्रतवैकल्य… विविध पाककृतींसह गृहिणींकडून केला जाणारा नैवेद्य…! या सगळ्यांचा मोहक संगम म्हणजे श्रावण मास…!
दीपपूजन झाले की, श्रावणमास असा तनामनात घर करून राहतो… बहरतो… आणि अवघ्या जनमानसावर अधिराज्यही गाजवतो. नागपंचमीच्या सणानिमित्त माहेरी जाणारी नववधू मग अगत्याने वाट पाहते ती उत्साहात साजऱ्या होणाऱ्या मंगळागौरीची.
मंगळागौर…! लग्न झाल्यानंतर नवविवाहितेने पहिले पाच वर्षे करावयाचे हे मांगल्यव्रत. मंगळागौरीचे पूजन म्हणजे साक्षात उमा शंकराची पूजा. लग्नानंतर पहिल्या वर्षी सासर-माहेर अशा दोन्ही ठिकाणी हे व्रत अगदी उत्साहात साजरे करण्याची प्रथा पूर्वापार आहे आणि आजही अनेक ठिकाणी ती जपली जाते.
श्रावणाच्या सुरुवातीपासून सगळ्या घरालाच या मंगळागौरीचे वेध लागतात.नातेवाइकांना आमंत्रण जातात. चकली, करंजी असे फराळाचे जिन्नस होतात… आईला द्यायच्या वाणाची खरेदी हा तर खास कार्यक्रम असतो. सोळा प्रकारची पत्री, केवडा, चाफा, मोगरा अशी विविध प्रकारची सुगंधी फुले, सोबत बेल, तुळशीपत्र, आघाडा, अशा वेगवेगळ्या रंगसंगतीचा निसर्गच जणू पूजेसाठी एकवटतो. मोठ्या चौरंगावर किंवा झोपाळ्यावर चारही बाजूने कर्दळीचे खांब बांधून समोर सुंदर रांगोळी काढून पूजेचे स्थान सजवले जाते. दागिने, नथ परिधान केलेली, केसांमध्ये गजरा माळून जरी वस्त्र परिधान केलेली ही सौभाग्यकांक्षिणी त्या दिवशी अधिकच खुलून दिसते. घरात आप्तस्वकीयांचा मेळा जमतो… मंत्रोच्चारांसह साग्रसंगीत पूजा होते. पूजेला महादेवाच्या पिंडीचा आकार दिला जातो. मागे केवड्याच्या पानांचा नागाचा फणा तयार करून ही पूजा अधिकच आकर्षक केली जाते. खास पुरणवरणाचा नैवेद्य होतो आणि मग जमलेले सगळेच आरतीसाठी सज्ज होतात.
“ जय देवी मंगळागौरी…
ओवाळीन सोनियाताटी…
रतनांचे दिवे…
माणिकांच्या वाती…
हिरेया ज्योती…
जय देवी मंगळागौरी…”
असे आरतीचे स्वर पावित्र्य, उत्साह आणि मांगल्य… अधिकच वृद्धिंगत करतात. आईला वाण देऊन पूजेची सांगता होते आणि मग ताटाभोवती रेखाटलेली सुरेख रांगोळी… उदबत्त्यांचा घमघमाट आणि पंचपक्वांनानी भरलेले ताट… अशा भारदस्त पेशवाई थाटात या मंगळागौरीच्या मुलींची भोजनासाठी पंगत बसते. संध्याकाळी हळदीकुंकवाचा कार्यक्रम असतो. परत रात्री आरती होते. मंगळागौरीची कहाणी वाचली जाते. खिचडी, चकली असे फराळाचे पदार्थ हा रात्रीच्या भोजनाचा खास मेनू असतो. आणि त्यानंतर रंगतात ते मंगळागौरीचे खेळ.
“गौरी मंदी गौर बाई मंगळागौर…
चला गं मंगळागौरीचं या करूया जागर…”
अशा अनेक गाण्यांवर फेर धरला जातो. या फेराच्या मध्यभागी कधी घागर घुमवली जाते… तर कधी सुप नाचवले जाते.
“गोफ विणू बाई गोफ विणू…
अवघ्या रात्री गोफ विणू…”
असं म्हणत वीणला जाणारा गोफ असेल… कधी झिम्मा तर… कधी फुगडी… कधी काटवट कण्या… तर कधी घसरगुंडी असे अनेकविध खेळले जाणारे खेळ म्हणजे स्त्रियांच्या लवचिकतेचा, कौशल्याचा आणि उत्साहाचा साक्षात्कार असतो.
“तुझ्या पिंग्याने मला बोलावलं…
रात जागवलं…पोरी पिंगा…”
असं म्हणत रंगणारा पिंगा तर गाण्यातले कथानक ऐकून हसण्या खिदळण्याने खास होतो. कधी गाण्याच्या भेंड्या, कधी कुणाचे सुश्राव्य गायन तर कधी छोट्या-मोठ्या नाट्यछटा यामुळे ही मंगळागौर अगदी उत्साहाने जागवली जाते आणि या सगळ्याचा सर्वोच्च बिंदू असतो तो म्हणजे उखाणा घेण्याचा खास कार्यक्रम. सगळ्या महिला लाजत, नकार देत, हळूहळू उखाणे घ्यायला सिद्ध होतात आणि
“महादेवाच्या पिंडीला
बेल घालते वाकून.
….रावांचे नाव घेते
सर्वांचा मान राखून”
या उखाण्यापासून अगदी कलात्मकतेने शब्द बांधणी करत घेतलेले उखाणे आनंदाचा परमोच्च बिंदू असतात.
एकूणच अशा सण, व्रताच्या निमित्ताने समूह भावाने स्त्रिया एकत्र जमाव्यात, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हावे, गप्पा आणि वेगवेगळ्या खेळांनी मनावरचा ताण कमी व्हावा आणि त्याला पूजा विधीच्या मांगल्याची, पावित्र्याची जोड देत मनालाही प्रसन्न करावे. हा सगळा या पूजाविधी मागचा मथितार्थ. यानिमित्ताने नात्यांची वीण अधिक घट्ट व्हावी, स्नेहभाव वृद्धिंगत व्हावा, आप्तस्वकीयांच्या भेटीगाठीने रोजच्या दैनंदिन जीवनाला एका नव्या उत्साहाचे वरदान मिळावे. हे किती सखोल चिंतन आहे ना… हे सण-समारंभ साजरे करण्यामागे! यातल्या विविध खेळांमध्ये गायली जाणारी गाणी, या पूजेच्या निमित्ताने सांगितल्या जाणाऱ्या कहाण्या म्हणजे आपल्या लोकसाहित्याचा अस्सल नजराणा आहेत. माहेर किती हौशी… किती सुखाचे ! आणि सासर किती दुःखाचे, कष्टाचे याची रसाळ वर्णन जशी या गीतांमध्ये, कथांमध्ये आहेत, तशीच परमेश्वराबद्दलची नितांत भक्ती, दागदागिन्यांबद्दल वाटणारे कुतूहल आणि नवऱ्याबद्दल वाटणारे अपार प्रेम, मुलांबद्दल वाटणारा वात्सल्यभाव या सगळ्या गीतातून, कथातून पुन्हा-पुन्हा अनुभवायला मिळतो.
आता काळ झपाट्याने बदलला आहे. ध्येयासक्त स्त्रिया आपल्या उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने उंबऱ्याबाहेर पडल्या. चौकटी बाहेरच्या खुणावरणाऱ्या जगात स्वतःला सिद्ध करताना मंगळागौरीसारखे सण, उत्सव साजरे करत या स्त्रिया आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनाला चैतन्याचे एक सुखद वळण देऊ पाहतात…
ऑफिसमध्ये जाताना, नित्याचे व्यवहार करताना, रोजच्या वेशभूषेला आपसूक फाटा देत, नाकावरच्या नथीसह, नऊवारी साडी आणि माळलेला गजरा, ल्यालेले दागदागिने असा अस्सल मराठमोळा साज मिरवण्याची हौस त्या पूर्ण करतात. घरची जागा लहान असेल, ऑफिसमध्ये रजा मिळायला अडचण असेल, तर एखाद्याच मंगळवारी रजा घेऊन एखादं ठिकाण निश्चित करून सासर-माहेरची मंगळागौर एकाच ठिकाणी साजरी करण्याचा समंजसपणा काळाबरोबर आपणही
स्वीकारला आहे.
दुसऱ्या दिवशीच्या नित्याच्या व्यवहारामुळे खूप जागरण शक्य नसेल, तर बाहेरच्या महिला मंडळांना बोलावून मनोरंजनाचे कार्यक्रम करत. मंगळागौरीचे खेळ खेळावेत हाही नवा प्रघात आता रूढ झाला आहे. हौशी आणि उत्साही महिला एकत्र येऊन खास मंगळागौरीचे खेळ बसवले जातात. याच श्रावणाच्या काळात सामाजिक, राजकीय संस्था या मंगळागौरीच्या खेळांच्या स्पर्धाही घेतात. काही ठिकाणी मंगळागौरीच्या वेगवेगळ्या संस्थांची स्नेहसंमेलन होतात. इतकं व्यापक वळण या मंगळागौरीच्या खेळांना आणि सणाला मिळालं आहे.
इथे लेखक पु. ल. देशपांड्यांंची आठवण येते. एकदा त्यांना विचारलं, “भारतीय संस्कृती आणि पाश्चात्त्य संस्कृती यामध्ये फरक काय…?” तेव्हा ते झटकन म्हणाले होते, “आमची संस्कृती रुद्राक्ष संस्कृती आहे आणि पाश्चात्यांची द्राक्ष संस्कृती आहे.”
श्रावणामध्ये होणाऱ्या मंगळागौरीचे हे व्रत आणि त्या अानुषंगाने होणारे मंगळागौरीचे खेळ म्हणजे, आपल्या संस्कृतीचा उत्सवच आहे. यामध्ये धार्मिकता आहे… समूहभाव आहे… स्त्रियांच्या मनाचं मानसशास्त्र जपण्याचा अलोट प्रयत्न आहे… आणि त्याचबरोबर नात्यांचे बंध जपण्याचा अट्टहास आहे. हे सण म्हणजे आपल्या खाद्य संस्कृतीचा महोत्सव आहेत आणि बहरलेल्या निसर्गाचा समृद्ध अाविष्कार आहेत. आता तर अनेक महिला मंडळ, ज्येष्ठ नागरिकांचे समूह वार्षिक उत्सव म्हणून मंगळागौरीचे पूजन आणि विविध खेळांसह अनेकविध कार्यक्रमांचं आयोजन करतात.
आज काळाचे संदर्भ कितीही जरी बदलले, महिलांच्या मागचे व्याप कितीही वाढले, ध्येयासक्त स्त्रिया नवनवीन क्षेत्राकडे कितीही झेपावत असल्या तरी जोपर्यंत त्यांची नाळ आपल्या संस्कृतीशी जोडलेली आहे तोपर्यंत असे सण, उत्सव वेळ काढून साजरे करण्यासाठी त्या आग्रही असतील. कारण लोकोत्सव, आपली लोक संस्कृती आणि आपली भारतीय संस्कृती सन्माननीय आहे. हे या स्त्रिया पक्क जाणतात. म्हणूनच मंगळागौरीच्या निमित्ताने आपल्या लोकवैभवाचे, लोक संस्कृतीचे जतन आणि संवर्धन त्या करतात… पारंपरिक खाद्यपदार्थात जरी बदल झाले तरी समूहाने सहभोजनाचा आनंद घेण्याची संधी त्या अवश्य घेतात.
या परंपरेचा, वेशभूषेचा, साजश्रृंगाराचा सोस स्त्री मनाला जोपर्यंत आहे आणि अशा सण, व्रतांचं पावित्र्य ती जाणते तोपर्यंत या संस्कृतीचं संवर्धन अबाधित ठेवण्याचं काम स्त्रिया नेहमीच करतील हे नक्की.