नॉस्टॅल्जिया – श्रीनिवास बेलसरे
आजपासून ७७ वर्षांपूर्वी तत्कालीन भारतीय नेत्यांनी भारताचे तीन तुकडे करून पाकिस्तान नावाचा धर्मांध देश अस्तित्वात आणला. त्यानंतर लाखो हिंदूंच्या हत्या करून त्यांची प्रेते रेल्वेतून पाकिस्तानी दंगेखोरांनी भारतात पाठवून दिली. त्या अमानुषतेच्या भयानक दृश्यांनी देश हळहळला. आय. एस. जोहर यांनी या फाळणीच्या पार्श्वभूमीवर एक कथा रचून त्यावर सिनेमा काढला. त्यात फाळणीच्या वेळी सर्वस्व गमावून आलेल्या निर्वासितांच्या डॉक्युमेंटरीतील काही खऱ्या चित्रफिती वापरण्यात आल्या! एवढाच फाळणीच्या भयंकर घटनेशी सिनेमाचा संबंध. बाकी कथा पूर्णत: काल्पनिक होती.
एस. मुखर्जी यांनी निर्मिलेल्या १९५४ साली आलेल्या त्या सिनेमाचे नाव होते ‘नास्तिक’. प्रमुख भूमिका होत्या अजित, नलिनी जयवंत, आय. एस. जोहर, लीला मिश्रा, राज मेहरा, रूपमाला, मुमताज बेगम, मेहबूब आणि राज हक्सर यांच्या. गाणी कवी प्रदीप यांची आणि संगीत होते सी. रामचंद्र यांचे. सिनेमातील ९ पैकी ९ गाण्यांत लतादीदी होत्या. दोन गाण्यांत त्या हेमंतकुमार आणि सी. रामचंद्र यांच्याबरोबर गायल्या, तर एक गाणे स्वत: कवी प्रदीप यांनी गायले. तेच सर्वात जास्त गाजले. नलिनी जयवंत नायिका होत्या, तर अजितने यात चक्क नायकाची भूमिका केली.
अनिलला (अजित) फाळणीत फार भयंकर दु:खाला सामोरे जावे लागते. पाकिस्तानी दंगेखोर काहीही दोष नसताना त्यांच्या आई-वडिलांची डोळ्यांसमोर हत्या करतात. आपला भाऊ आणि धाकट्या बहिणीला घेऊन, कसाबसा जीव वाचवून, तो भारतात पळून येतो, एका मंदिरात आश्रय घेतो. धाकटा भाऊ आजारी पडल्याने अनिल पूजाऱ्याकडे मदत मागतो. पूजाऱ्याने ती न दिल्यामुळे भावाचा मृत्यू होतो. एका पाठोपाठ कोसळत गेलेल्या संकटांमुळे अनिल नास्तिक बनतो. संतापलेला अनिल पूजाऱ्यावरच हल्ला करतो, पुजारी त्याला तुरुंगात टाकतो. आय. एस. जोहर यांनी कथा जरी फाळणीच्या भयंकर घटनांपासून सुरू केली, तरी ऐतिहासिकदृष्ट्या भयंकर अशा त्या घटनेवर किंवा पाकिस्तानी लोकांनी केलेल्या अमानुष अत्याचारांच्या विषयावर न वाढवता भारतात आलेल्या हिंदू निर्वासितावर हिंदू पूजाऱ्याचा लोभीपणामुळे बेतलेल्या प्रसंगांच्या घटनाक्रमावर बेतली. अनिल दोन भावंडासह निर्वासित बनून भारतात आल्यावर हिंदू पुजारी त्याला मदत करायला कसा नकार देतो, त्यातून कसा त्याच्या भावाचा मृत्यू ओढवतो, इतर लोक कसे त्याच्या बहिणीला वाममार्गाला लावतात आणि त्यातून अनिल कसा नास्तिक बनतो या काल्पनिक विषयावर कथानक उभे होते.
तुरुंगातून सुटल्यावर त्याच्या बहिणीची भेट होते. आपण काय होतो आणि काय झालो हे भावाला कळल्याचे लक्षात आल्यावर ती अति दु:खाने आत्महत्या करते. पूजाऱ्यावरील अनिलचा संताप अजूनच वाढतो. पूजाऱ्याचा सूड घ्यायचा म्हणून तो पूजाऱ्याच्या मनाविरुद्ध त्याची मुलगी रमाशी (नलिनी जयवंत) प्रेमसंबंध स्थापन करून लग्न करतो. मग बोटीतून जाताना ते दोघे पाण्यात पडतात. रमा वाचते पण ती गर्भार असते आणि अनिलचा पाण्यात बुडून मृत्यू होतो असा सर्वांचा समज होतो. जेव्हा तिचे बाळ आजारी पडते तेव्हा ती त्याला एका बाबाजीकडे घेऊन जाते. तो बाबा म्हणजेच साधू बनलेला अनिल असतो. ती त्याला ओळखते आणि बऱ्याच घटनांनंतर, सिनेमाच्या शेवटी त्याचा देवावरचा उडालेला विश्वास पुन्हा बसतो अशी ही ‘नास्तिक’ नावाची कथा!
तत्कालीन केंद्र सरकारच्या, कोणतेही गैरसोयीचे सत्य जनतेला शक्यतो कळू नये अशी दक्षता घेण्याच्या धोरणामुळे, सुरुवातीला सिनेमावर बंदी आली होती. ती उठल्यावर मात्र तो तब्बल ५० आठवडे चालून प्रचंड गाजला. अनेक दृश्यांचे चित्रीकरण द्वारका, रामेश्वर, पुरी, वाराणसी आणि वृंदावन या पवित्र तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी झाले होते. हेही लोकप्रियतेचे एक कारण असू शकते. लोकप्रियतेमुळे तो १९६२ मध्ये ‘मदाधीपती मगल’ या नावाने तमिळमध्ये डबही करण्यात आला.
यातले कवी प्रदीप यांचे अत्यंत हृदयापासून आणि भावनाविवश होऊन लिहिलेले आणि त्यांनीच गायलेले एक गाणे खूप गाजले. कवी आपल्या लेखणीने लोकांना कसे हलवून सोडू शकतो ते या गाण्याने सिद्ध केले. दुर्दैवाने अजून कित्येक दशके तरी भारतीय उपखंडात ते गाणे संदर्भहीन बनणार नाही, अशी साधार भीती सध्याची बांगलादेशातील आणि आपल्याच प. बंगालमधील स्थिती पाहता वाटते. प्रदीप यांचे शब्द होते –
‘देख तेरे संसार की हालत
क्या हो गयी भगवान,
कितना बदल गया इन्सान, सूरज ना बदला,
चाँद ना बदला, ना बदला रे आसमान,
कितना बदल गया इन्सान!
फाळणीत पाकिस्तानमधील धर्मांध लोकांनी हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले. कालपर्यंत शेजारी असलेल्या, प्रेमाचे मैत्रीचे संबंध असलेल्यांनाही ठार केले, स्त्रियांची अब्रू लुटली. त्याचा परिणाम म्हणून भारतातील लोकांनीही सुडापोटी तशा कृती केल्या. दोन्ही समाज साधी माणुसकीही विसरले. हे सगळे पाहून प्रदीपजींचे कविमन अतिशय अस्वस्थ झाले होते. तरी त्यांनी आपला संताप किती संयत शब्दांत व्यक्त केला –
आया समय बड़ा बेढंगा,
आज आदमी बना लफंगा,
कहींपे झगड़ा, कहींपे दंगा,
नाच रहा नर होकर नंगा,
छल और कपटके हांथों अपना बेच रहा ईमान,
कितना बदल गया इन्सान!
खास भारतीय समंजस मानसिकतेमुळे कवी केवळ राक्षस बनलेल्या पाकिस्तानी लोकांचा निषेध करत नाही. तो त्याही वेळी दोन्ही समाजाना दोष देतो. दोन्ही समाजाच्या चुकांमुळे, क्रूरतेमुळे आज देशच एक स्मशान बनला आहे हे कवीचे दु:ख आहे.
रामके भक्त, रहीमके बन्दे,
रचते आज फरेबके फंदे,
कितने ये मक्कार ये अंधे,
देख लिए इनके भी धंधे,
इन्हींकी काली करतूतोंसे,
हुआ ये मुल्क मशान,
कितना बदल गया इन्सान!
संवेदनशील कवीला हिंसेचा अतिरेक, प्रचंड नरसंहार पाहिल्यावरही अजून आशा आहे. तो समजावणीच्या सुरात श्रोत्यांना विचारी बनवण्याचा प्रयत्न करताना म्हणतो, ‘आपण अत्याचारी इंग्रजांच्याविरुद्ध लढण्यापेक्षा उलट आपसातच भांडलो नसतो, तर भारतीयांची एकी तुटली नसती. लाखो गोरगरीब बेघर झाले नसते. दंगलीत लहान-लहान मुले आई-वडिलांपासून वेगळी होऊन अनाथ झाली नसती. हिंदू-मुस्लीम एकतेचे स्वप्न पाहणाऱ्या गांधीजींना स्वप्नभंगामुळे हमसून हमसून रडावे लागले नसते –
जो हम आपसमें ना झगड़ते,
बने हुए क्यूँ खेल बिगड़ते,
काहे लाखो घर ये उजड़ते,
क्यूँ ये बच्चे माँसे बिछड़ते,
फूट-फूट कर क्यों रोते प्यारे बापू के प्राण,
कितना बदल गया इन्सान… कितना बदल गया इन्सान.
समाजाने कितीही हिंसाचार पाहिला, त्याचे निरपराध व्यक्तींवर आयुष्यभर होणारे भयंकर परिणाम पाहिले तरीही माणसांतली पाशवी प्रवृत्ती संपत नसते, हे परवाच्या बांगलादेशातील आणि आपल्याच संदेशखालीतील घटनांनी सिद्ध केले. पण कवी प्रदीप यांच्यासारखे संततुल्य सश्रद्ध कवी, साहित्यिक, हे माणसाच्या परिवर्तनशीलतेवर विश्वास ठेवून त्यांचे प्रयत्न सोडत नाहीत, हाच सगळ्या मानवजातीसाठी दिलासा असतो. त्याची परवाच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने झालेली ही आठवण.