मुंबई : सध्या अनेक तरुण भरघोस पगारासह सरकारी नोकरीच्या (Government Job) शोधात असतात. अशाच तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. खरं तर सरकारी नोकरी मिळण्यासाठी अनेक परीक्षा द्याव्या लागतात. केंद्रिय लोकसेवा आयोगाकडून (UPSC) लॅटरल एंट्री साठी अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये नोकरी मिळवण्यासाठी कोणत्याही परीक्षा द्यावी लागणार नाही. यूपीएससी परीक्षा ही देशातील सर्वात अवघड परीक्षा असते. या परीक्षेत पास होण्यासाठी अनेक वर्ष मन लावून जिद्दीने अभ्यास करावा लागतो. परंतु अनेकांना सरकारी नोकरी करण्याची इच्छा असते. त्यामुळे आता तरुणांची सरकारी नोकरी करण्याची इच्छा पूर्ण होणार आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) ४५ पदांसाठी जाहिरात दिली, ज्यामध्ये १० सहसचिव आणि ३५ संचालक/उपसचिव पदांचा समावेश आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ सप्टेंबर असून उमेदवार www.upsconline.nic.in या अधिकृत वेबसाईटवरुन अर्ज करु शकतात.
वयोमर्यादा आणि वेतन
४० ते ५५ वयोगटातील उमेदवार संयुक्त सचिव पदासाठी अर्ज करु शकतात. या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार, १४व्या वेतन स्तरानुसार पगार देण्यात येईल. त्यांचे मासिक उत्पन्न २,७०,००० रुपये आहे. याशिवाय प्रवास भत्ता आणि घरभाडे भत्ता दिला जातो.
३५ ते ४५ वयोगटातील उमेदवारांची निवड संचालक पदासाठी केली जाणार आहे. त्यांना १३ व्या वेतन स्तरानुसार पगार देण्यात येईल. त्यांचे मासिक उत्पन्न २,३०,००० रुपये असेल. तर उपसचिव पदासाठी १,५२,००० रुपये पगार दिला जाईल.
कोणते उमेदवार अर्ज करु शकतात?
केंद्र सरकारमध्ये काम करणारा कोणताही कर्मचारी या नोकरीसाठी अर्ज करु शकत नाही. परंतु राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये काम करणारे, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, स्वायत्त संस्था, विद्यापीठे, खाजगी कंपन्या, आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणारे लोक लॅटरल एंट्रीअंतर्गत अर्ज करु शकतात.