कथा – रमेश तांबे
आज श्रावणी सोमवार होता. सकाळी लवकर उठून शंकराच्या मंदिरात जायचे ही माझी कित्येक वर्षांची सवय. आजही मी लगबगीने उठलो, आणि घराबाहेर पडलो. वातावरणात बऱ्यापैकी गारवा होता. नुकताच पाऊस पडून गेला होता. रस्ता, झाडांची पानेफुले पावसात मनसोक्त भिजलेली दिसत होती. पूर्व दिशा लाल रंगाने नटली होती. घरापासून दहा मिनिटांवरच शंकराचे मंदिर होते. मंदिर पुरातन होते. दीडशे-दोनशे वर्षांचे ते असावे. सगळे दगडी बांधकाम. अगदी मंदिराच्या कळसापर्यंत! गाभाऱ्याबाहेरचा प्रशस्त मंडप आणि गाभाऱ्यात मोठी पिंडी. श्रावणाचा पहिला सोमवार असल्याने मंदिरात भाविकांची चांगलीच गर्दी जमली होती. मंदिराच्या बाहेर बेलाची पाने, फुले, फळे आणि प्रसादाची दुकाने ओळीने थाटली होती. विक्रेत्यांच्या कलकलाटाने मंदिराची शांतता भंग होत होती. मंदिराबाहेर भली मोठी रांग लागली होती. मीही भक्तिभावाने रांगेत उभा राहिलो.
तसे देवाला जाताना मी कधीही हार, फुले, फळे वगैरे गोष्टी नेत नाही. कारण त्याने मंदिराची स्वच्छता बिघडते असे मला वाटते. त्यामुळे काहीही न घेताच मी रांगेत उभा होतो.
पण मी रिकाम्या हातानेच उभा आहे हे दिसताच; अनेक फुलविक्रेते मला हाराफुलांचे, बेलाचे ताट घेण्यासाठी आग्रह करीत होते. पण मी मात्र तसाच उभा होतो. तेवढ्यात माझे लक्ष दूरवर बसलेल्या एका मुलीकडे गेले. ती टोपलीभर बेलाची पाने घेऊन बसली होती. साधेच पण स्वच्छ कपडे तिने घातले होते. सफेद रिबिनींच्या फुलांनी तिने केसाच्या वेण्या बांधल्या होत्या. ती कुणालाही आग्रह करत नव्हती. कुणा ग्राहकाच्या मागे लागत नव्हती. तिच्या भरलेल्या टोपलीकडे बघून तिचे बेल विकले गेले नसावेत असे दिसत होते. तिला बघताच माझ्या मनात कालवाकालव झाली. एवढी टोपलीभर बेलाची पाने ती कधी विकणार? अन् तेही अशी शांत बसून! माझे मन विचारात पडले.
मग मी स्वतःहून त्या मुलीजवळ गेलो. तिने माझे हसून स्वागत केले अन् “बेल देऊ का काका?” असा सवाल केला. मी म्हटले,”कसे दिले?” ती उत्साहाने म्हणाली, “काका बेलाची पाने विकण्यासाठी नाही ठेवलीत!” हे ऐकून मी चकितच झालो आणि उत्स्फूर्तपणे ओरडलो, “काय विकायची नाहीत? मग इथे का बसली आहेस टोपली घेऊन?” त्यावर ती मुलगी म्हणाली, “नाही काका विकण्यासाठी नाहीत ही पाने! पण तुम्ही घेऊ शकता कितीही. अगदी पैसे न देता!” आता मात्र मला वेड लागायची पाळी आली. “तू बेलाची पाने फुकट वाटण्यासाठी आली आहेस अन् तेही एवढ्या सकाळी!” मुलगी बोलू लागली, “काका, आई म्हणते देव देवळात नसतो तर तो माणसात असतो. आता हेच बघा ना एवढी माणसे रांगेत उभी आहेत. प्रत्येकजण देवळात शिरण्यासाठी आतूर झाला आहे. एवढ्या गर्दीपासून मी दूर आहे. पण माझ्याकडे कुणाचेच लक्ष नाही. तुम्ही सहृदयी आहात, दयाळू आहात. तुमच्या मनात माझ्याबद्दल सहानभूती आहे. माझी टोपली भरून बेलाची पाने कधी अन् कशी संपणार याची तुम्हाला काळजी वाटली आणि म्हणूनच तुम्ही माझ्याकडे आलात!
ज्याचे हृदय सहानुभूतीने भरलेले असते त्यांच्या हृदयात देव असतो असे आई म्हणते. अशाच लोकांना मी बेलाची पाने देते हवी तितकी!” त्या मुलीचे बोलणे ऐकून माझे मन भरून आले. माझ्या डोळ्यांत चटकन पाणी आले. मग भानावर येत मी त्या टोपलीतले एक बेलाचे पान उचलून त्या मुलीच्या डोक्यावर ठेवले अन् म्हणालो, “बाळ खरंच आज मलाही कळले देव नक्की कुठे असतो!” तुला माझ्यात देव दिसला तसेच मलाही तुझ्यात देव दिसतो आहे.” असे म्हणून माझे पाय मंदिराच्या दिशेने वळण्याऐवजी तडक घराकडे वळले, अगदी नकळत!
त्या दिवसानंतर मी देवळात देव शोधण्यापेक्षा माणसात देव शोधू लागलो अन् जागोजागी ते मला दिसू लागले. या घटनेनंतर मी पूर्णपणे बदलून गेलो… अगदी कायमचाच!