Friday, March 28, 2025
Homeसाप्ताहिककोलाजउपदेशोहि मूर्खानाम्...

उपदेशोहि मूर्खानाम्…

संवाद – गुरुनाथ तेंडुलकर

आपल्याकडे पंचतंत्रात एक गोष्ट आहे.
घनदाट जंगलातील एका झाडावर चिमणीचे एक घरटे होते. त्या घरट्यात चिमणा चिमणी आपल्या इटुकल्या पिटुकल्या पिल्लांसह आनंदाने राहात होती. एकदा थंडीच्या मौसमात एका रात्री चिमणीने शेजारच्या फांदीवर बसलेली काही माकडे पाहिली.

कडाक्याच्या थंडीत कुडकुडणारी ती माकडे पाहून चिमणीला त्यांची दया आली अन् ती म्हणाली, ‘अरे, तुम्ही असे थंडीत नेहमी कुडकुडता. त्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या बचावासाठी घरटे का नाही बांधत? आम्ही पक्षी असून देखील घरटी बांधतो. आम्हाला तुमच्यासारखे हात पाय नाहीत तरी देखील आम्ही फक्त चोचीच्या सहाय्याने काडी काडी जमवून घरटी बांधतो… अन् तुम्ही चांगले हात पाय असून केवळ सारा दिवस या झाडावरून त्या झाडावर उड्या मारीत भटकता, येणाऱ्या जाणाऱ्यांच्या टिंगल टवाळ्या करता, दिवसभर उनाडक्या करता, नी रात्री थंडीत कुडकुडता… उद्यापासून ही टिंगल टवाळी थोडी बंद करा,नी आमच्यासारखी छानशी घरटी बांधा…’

चिमणीने सद्भावनेने माकडांना उपदेश केला. पण…
पण माकडांनी काय केले?
दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी घरटी तर बांधली नाहीतच, पण उलट, ‘आम्हाला शहाणपणा शिकवते काय ?’ असे म्हणून त्या चिमणीच्या घरट्यावरच हल्ला केला नी ते घरटे पार मोडून तोडून टाकले…
बिचारी चिमणी…
काडी काडी जमवून मोठ्या कष्टाने उभे केलेले घरटे पार उध्वस्त झाले. अजून पंखात बळ नसलेली पिल्ले झाडावरून खाली पडली आणि जखमी झाली. घरट्यातली अंडी खाली पडून फुटली. आजवर मोठ्या उमेदीने उभ्या केलेल्या संसाराची पार वाताहत झाली. आणि हे सर्व करणारी माकडे?
ती तर मोठ्या फुशारकीने आरोळ्या ठोकून विजयोत्सव साजरा करीत होती नि म्हणत होती ‘कशी जिरवली.’
लहानपणी पंचतंत्र किंवा हितोपदेशासारख्या पुस्तकात वाचलेली ही कथा…
आजही जेव्हा जेव्हा मला कुणाला सल्ला देण्याची वेळ येते, त्या त्या वेळी ही कथा मला आठवते. याच कथेच्या आनुषंगाने एक संस्कृत सुभाषितही आठवते.
उपदेशोहि मूर्खानाम् प्रकोपाय न शांन्तये।
पयःपानं भुजंगानाम् केवलम् विषवर्धनम् ।।
अर्थ : मूर्खांचा राग उपदेशाने शांत होत नाही. उलट वाढतो. सापाला जेवढे जास्त दूध पाजाल तेवढे त्याचे विष वाढतच जाते.

या श्लोकातील सापाचा दृष्टांत केवळ उपदेशाने काहीही साध्य होत नाही ह्या विधानाला पुष्टी देण्यासाठी असला तरीही त्यातून एक त्रिकालबाधीत शाश्वत सत्य सुभाषितकाराने सांगितले आहे. आणि हे सत्य म्हणजे ‘मूर्खांना उपदेश करू नये.’
उपदेश कुणाला करावा? कधी करावा? कुणी करावा? किती करावा? आणि कसा करावा? याचे काही नियम आहेत…
सर्वात पहिला नियम म्हणजे कधीही, कुणालाही, कोणत्याही विषयावर उपदेश करू नये.
होय. कधीही कुणालाही उपदेश करू नये. सल्ला देऊ नये.

अर्थातच हीच अत्यंत कठीण गोष्ट आहे. सल्ला देण्यापेक्षा सल्ला न देणे ही फार अवघड गोष्ट आहे, कारण सल्ला देण्याचा मोह आवरणे फार कठीण असते.

मानसशास्त्रीय दृष्या विचार केला तर, प्रत्येकाला आपण परिपूर्ण आहोत असे वाटत असते. आपण आपल्या आजूबाजूला नेहमी पहातो, त्यातून आपल्याला वाटत असते की, माणसे चुकताहेत, त्यांना काही कळत नाही. त्यांना सुधारायला हवे.
समर्थ रामदासांनी सांगीतलेच आहे की, ‘जे जे आपणांस ठावे, ते ते दुसऱ्यास शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन।’
सर्व जणांना शहाणपणा शिकवण्याची जबाबदारी समर्थांनी जणू आपल्याच शिरावर टाकलीय, अशा थाटात आपल्यापैकी प्रत्येकजण दुसऱ्याला शहाणपणा शिकवत असतो. त्याचा परिणाम म्हणजे दुसरा कुणी शहाणा तर होत नाहीच, पण आपला मूर्खपणा मात्र उघड होतो.

आपण सर्वज्ञानी आहोत अन् जग मूर्ख आहे. असा स्वतःबद्दल गैरसमज असणारी फार मोठी जमात आपल्या आजूबाजूला वावरत असते. कोणताही प्रसंग असो ही माणसे मोठ्या तोऱ्यात नेहमी म्हणतात, ‘मी सांगतो…
‘अरे बाबा, तुला कुणी विचारलंय का?’
पण नाही. कुणी विचारा किंवा नका विचारू आमचा सल्ला तयार…
एक घडलेली घटना सांगतो.
शंभर माणसांच्या एका शिबिरात कुणी एक माणूस आजारी पडला. जरासे पोटात दुखायला लागले नी झाले…
बाकीचे शिविरार्थी लागलीच डॉक्टर बनले.
कुणी म्हणाला,‘अजिर्ण झाले असणार … आल्याचा रस घ्या.’
कुणी म्हणाला,‘अॅसिडिटी झाली असणार… लिंबू पाणी द्या. ‘
कुणी म्हणाला,‘फूड पॉयझन झाले असेल… पाणी पिऊन उलटी करायला हवी.’
तर कुणी म्हणाला, ‘बहुतेक पोटातल्या आतड्यांना सूज आलेली दिसतेय. गरम पाण्याच्या पिशवीने पोट शेकायला हवे.’
तर कुणी म्हणाला की ‘पायाच्या तळव्यांना तिळाच्या तेलाने मालीश करा…’
प्रत्येकजण आपापल्या अकलेनुसार अंदाज बांधत होता, अन् उपाय सुचवत होता.
या सर्व कोलाहलात एक माणूस मात्र शांतपणे खुर्चीवर बसून आरामात ही सगळी गंमत पहात होता. कुणाचे तरी लक्ष त्याच्याकडे गेले नी म्हणाला, आपण काहीच बोलत नाही?
त्यावर तो शांत बसलेला माणूस उद्गारला ‘मी डॉक्टर आहे. पेशंटने विचारल्याशिवाय मी कधीही सल्ला देत नाही.’
उपस्थित सर्वजणांचे चेहरे फोटो काढण्याजोगे झाले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -