सातारा : साताराकरांसाठी (Satara) एक आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाकडून प्रवाशांच्या सेवेसाठी नव्या ई-बस (Electric Bus) सेवा सुरु करणार असल्याची घोषणा केली होती. त्यापासून कित्येक दिवस ई-बसची वाट पाहणाऱ्या नागरिकांची आता प्रतिक्षा संपली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये ई बसेस गाड्या दाखल झाल्या आहेत. त्यामुळे साताराकरांचा आता वातानुकूलित (Air Conditioning) बसमधून आरामदायी प्रवास होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच एसटी महामंडळाच्या खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ई-बस सेवा सुरु केली आहे. साताऱ्यातील एसटी स्टँड मध्ये पहिल्या टप्प्यात पाच गाड्या दाखल झाल्या असून एसटी महामंडळाच्या आवारात ई-बस साठी आवश्यक असणारी चार्जिंग पॉईंटसुद्धा तयार करण्यात आली आहेत. या सर्व गाड्या वातानुकूलित असून ऑटोमॅटिक स्वरूपाच्या आहेत. या गाड्यांमध्ये साधारण ३५ प्रवासी वाहतूक करण्याची क्षमता आहे.
दरम्यान, प्रवाशांचा प्रतिसाद आणि गरज लक्षात घेता या गाड्यांची संख्या देखील वाढवण्यात येणार आहे. तसेच या बसेसमुळे आता इंधनाचा खर्चही कमी होणार असल्याची शक्यात वर्तवण्यात येत आहे.