माझा भारत देश,
मला आवडतो खूप
त्याच्या वैभवात दिसे, एकतेचे रूप
पश्चिमेचा किनारा, खुणावितो मला
हिमालयाच्या रांगा पाहून , जीव हा फुलला
मधोमध उभे जणू,
भव्य हे पठार
आनंदाने साद घाली,
रान हिरवेगार
खळाळून नद्या येती, आपल्या भेटीला
समृद्धीचे वरदान,
देती या भूमीला
धर्म, पंथ, जाती येथे, बोलीभाषा किती
मानवतेची भाषा सारे, हृदयातून बोलती
संतांचे विचार येथे,
आलेत रुजून
भूमी झालीय पावन, वीरांच्या त्यागातून
माझ्या या देशाचे,
सदा गाऊ गुणगान
ज्ञान-विज्ञान-श्रमाने, वाढवू त्याची शान
काव्यकोडी – एकनाथ आव्हाड
१) आझाद हिंद सेनेचे
नेतृत्व केले
‘फॉरवर्ड ब्लॉक’ संघटनेचे
कामही पाहिले
‘चलो दिल्ली’ घोषणेने
देश जागा केला
‘जय हिंद’चा नारा
कोणी घुमविला?
२) सार्वजनिक गणेशोत्सवाची
सुरुवात यांनी केली
केसरी व मराठा ही
वृत्तपत्रे काढली
स्वराज्याचा लढा दिला
जहाल होऊनी
‘गीतारहस्य’ग्रंथ
लिहिला बरं कोणी?
३) सर्वधर्मसमभावाची
शिकवण सदा देतो
विविधतेतून एकतेचे
दर्शन घडवितो
‘सत्यमेव जयते’ हे
ब्रीदवाक्य त्याचे
कमळ हे राष्ट्रीय फूल
सांगा कोणाचे?
उत्तर –
१) नेताजी सुभाषचंद्र बोस
२) लोकमान्य टिळक
३) भारत देश